पहिल्याच पावसात ‘स्मार्ट’नाशिकची बत्ती गुल!
रस्ते खोदले,खड्डे वाढले,वीज गायब;विकासाच्या नावाखाली नागरिकांचा वनवास कायम

नाशिक, दि. २ जून २०२६ : Nashik Power Cut News ज्या पहिल्या पावसाची नाशिककर आतुरतेने वाट पाहत होते, त्याच पावसाने शहरातील विकासकामांचे वास्तव उघडे पाडले. दुपारनंतर अवघ्या काही वेळ पडलेल्या पावसाने नाशिकच्या अनेक भागांतील वीजपुरवठा खंडित झाला आणि “स्मार्ट सिटी”च्या गोंडस फलकामागचे विदारक चित्र पुन्हा एकदा समोर आले.
कुंभमेळ्याच्या तयारीच्या नावाखाली शहरभर सुरू असलेल्या खोदकामांनी आधीच नागरिकांचे कंबरडे मोडले असताना, पहिल्याच पावसात वीज गायब झाल्याने नाशिककरांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम झाले आहे. विकासकामांचा वेग पाहून नागरिकांना भविष्यकाळातील सुविधा दिसण्याऐवजी वर्तमानातील गैरसोयींचाच डोंगर दिसू लागला आहे.
विकासाच्या नावाखाली नागरिकांची परीक्षा (Nashik Power Cut News)
शहरातील अनेक प्रमुख रस्ते सध्या खोदकामामुळे विद्रूप झाले आहेत. कुठे सिमेंटचे ढिगारे, कुठे खडीचे ढीग, तर कुठे उघडे पडलेले खड्डे अशा अवस्थेत वाहनचालक आणि पादचारी जीव मुठीत धरून प्रवास करत आहेत.पावसाच्या पहिल्याच सरींनी या खड्ड्यांचे छोटे-मोठे तलाव बनवले. रस्त्यावरून जाताना खड्डा कुठे आणि रस्ता कुठे, हेच ओळखणे कठीण झाले आहे. प्रशासन मात्र विकासाच्या गप्पांमध्ये रमले असून नागरिकांच्या त्रासाकडे सोयीस्कर दुर्लक्ष करत असल्याची भावना नागरिकांमध्ये निर्माण झाली आहे.
‘स्मार्ट सिटी’ की ‘डार्क सिटी’?
पहिल्याच पावसात अनेक भागांतील वीजपुरवठा खंडित झाल्याने नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. काही भागात तासन्तास अंधाराचे साम्राज्य होते. मोबाईल नेटवर्क, इंटरनेट, घरगुती उपकरणे आणि व्यवसाय यांवर त्याचा परिणाम झाला.”स्मार्ट सिटी”चा किताब मिरवणाऱ्या शहरात काही मिनिटांच्या पावसाने वीज व्यवस्था कोलमडत असेल, तर हा स्मार्टपणा नेमका कागदावर आहे की प्रत्यक्षात, असा सवाल नागरिक विचारत आहेत. शहरातील मूलभूत सुविधा अजूनही पावसाच्या दयेवर अवलंबून असतील तर विकासाच्या दाव्यांना किती अर्थ उरतो, हा प्रश्न उपस्थित होत आहे.
रस्ते एकाच वेळी खोदण्याचा हट्ट; नागरिकांचे हाल मात्र अखंड
शहरातील अनेक प्रमुख मार्गांवर एकाच वेळी सुरू असलेल्या कामांमुळे वाहतूक कोंडी, धूळ, आवाज आणि आता चिखल अशा चौफेर संकटांचा सामना नागरिकांना करावा लागत आहे.एखादा रस्ता पूर्ण झाल्यानंतर दुसरे काम सुरू करण्याऐवजी अनेक रस्ते एकाच वेळी खोदण्याचा प्रशासनाचा हट्ट नागरिकांच्या अंगलट आला आहे. परिणामी, नागरिकांना घरातून बाहेर पडताना कोणत्या रस्त्याने जावे आणि कोणत्या संकटाला सामोरे जावे, याचा विचार करावा लागत आहे.
सोशल मीडियावर प्रशासनापेक्षा नागरिकच अधिक सक्रिय
या परिस्थितीत प्रशासनाकडून ठोस सूचना मिळण्याऐवजी नागरिकांनीच एकमेकांना सावध करण्याची जबाबदारी उचलली आहे. व्हॉट्सअॅप आणि सोशल मीडियावर विविध संदेश मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.”नाशिककर सावधान होऊन रस्त्यावर चाला”, “गाडी सावध चालवा”, “मनपाच्या भरवशावर राहू नका”, अशा संदेशांद्वारे नागरिक एकमेकांना सतर्क करत आहेत. ही बाब प्रशासनासाठी निश्चितच आत्मपरीक्षणाची वेळ असल्याचे मानले जात आहे.
खड्डे, चिखल आणि उघडी गटारे – अपघातांना निमंत्रण (Nashik Power Cut News)
पावसामुळे अनेक ठिकाणी खड्डे पाण्याखाली गेले आहेत. रस्त्यावरील माती चिखलात रूपांतरित झाल्याने दुचाकीस्वारांना विशेष धोका निर्माण झाला आहे. त्यातच काही भागांत गटारींची झाकणे काढलेली असल्याच्या तक्रारी आहेत.पाण्याखाली लपलेले खड्डे, उघडी गटारे आणि निसरडे रस्ते यामुळे अपघातांचा धोका अनेक पटींनी वाढला आहे. नागरिकांनी विशेष काळजी घेण्याची गरज निर्माण झाली आहे.
वीज खांब आणि पडलेल्या तारा ठरू शकतात जीवघेण्या
पावसाळ्यात सर्वात मोठा धोका विजेच्या खांबांपासून आणि तुटलेल्या तारांपासून असतो. नागरिकांनी अशा ठिकाणांपासून दूर राहावे, पाण्यात खेळणे टाळावे आणि संशयास्पद परिस्थिती दिसल्यास तत्काळ संबंधित यंत्रणांना माहिती द्यावी, असे आवाहन करण्यात येत आहे.विशेषतः पाणी साचलेल्या भागांत विद्युतप्रवाहाचा धोका अधिक असतो. त्यामुळे पालकांनी लहान मुलांवर विशेष लक्ष ठेवण्याची आवश्यकता आहे.
नागरिकांचा सवाल – विकास नेमका कुणासाठी?
कुंभमेळ्यासाठी शहराचा कायापालट करण्याचे आश्वासन दिले गेले. मात्र आजची परिस्थिती पाहता नागरिकांच्या मनात एकच प्रश्न घोळत आहे – हा विकास नेमका कुणासाठी?रस्ते खोदलेले, वीजपुरवठा विस्कळीत, वाहतूक कोंडी वाढलेली आणि नागरिक त्रस्त अशी स्थिती असेल तर विकासाच्या दाव्यांवर विश्वास ठेवणे कठीण होत आहे. स्मार्ट सिटीचे स्वप्न दाखवताना किमान मूलभूत सुविधा तरी सक्षम असायला हव्यात, अशी अपेक्षा नाशिककर व्यक्त करत आहेत.
पावसाने आरसा दाखवला
पहिल्या पावसाने नाशिकच्या विकासकामांचा आरसा नागरिकांसमोर ठेवला आहे. पावसाने शहराला थंडावा दिला खरा; मात्र प्रशासनाच्या नियोजनातील उणिवाही तितक्याच स्पष्टपणे दाखवून दिल्या.आता तरी संबंधित यंत्रणांनी नागरिकांच्या संयमाचा अंत पाहू नये. अन्यथा “स्मार्ट सिटी”चा फलक झळकत राहील आणि त्याखाली नाशिककरांचा वनवासही सुरूच राहील, अशी उपरोधिक चर्चा शहरभर रंगू लागली आहे.
नाशिक शहरात विविध ठिकाणी विद्युत यंत्रणेवर झाडे व फांद्या कोसळल्याने वीज पुरवठा प्रभावित
वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी महावितरणची यंत्रणा कार्यरत
आज मंगळवारी दुपारी आकस्मिक आलेला पाऊस आणि जोरदार वाऱ्यामुळे नाशिक शहरातील अनेक भागात झाडे थेट विद्युत वाहिन्यांवर उन्मळून पडल्याने व झाडाच्या मोठ्या फांद्या तुटून विद्युत तारा तुटल्याने तसेच बिघाड झाल्याने विद्युत पुरवठा खंडित झाला आहे. यंत्रणेवर पडलेली झाडे बाजूला करून व फांद्या बाजूला काढून वीजपुरवठा पूर्ववत करण्यासाठी दुरुस्ती करीत महावितरणचे अभियंते जनमित्र व कर्मचारी कार्यरत आहेत. यामध्ये पंचक विद्युत उपकेंद्रातून निघणाऱ्या ३३केव्ही विद्युत वाहिनीवर झाड कोसळल्याने मुक्तीधाम व देवळाली कॅम्प विद्युत उपकेंद्राचा वीज पुरवठा खंडित झाला त्याची दुरुस्ती झाल्यानंतर पुन्हा त्याच वहिनीवर दुसऱ्या ठिकाणी झाडाची फांदी कोसळल्याने दुरुस्तीचे कार्य गतीने सुरू आहे. यामध्ये अनेक भाग सुरू झाला तरी बंद असलेल्या उर्वरित भागातील झाडे आणि फांद्या बाजूला करीत दुरुस्ती करून सोबत बिघाड दुरुस्त करीत वीज पुरवठा पूर्ववत करण्यासाठी महावितरणचे अभियंते व जनमित्र कार्यरत आहेत.


