महाराष्ट्रात ४ जूनला चमत्कार घडणार,अनेकजण परतण्याचा प्रयत्नात-अनिल देशमुख
नागपूरदि,२७ मे,२०२४ – लोकसभा निवडणुकीच्या निकालाच्या दिवशी म्हणजेच येत्या ४ जूनला महाराष्ट्रात चमत्कार घडेल. त्यानंतर आम्हाला सोडून गेलेले अनेक नेते पुन्हा पक्षात परतण्यासाठी प्रयत्न करतील. मात्र, शरद पवार यांना कठीण काळात ज्यांनी धोका दिला त्यांना आम्ही पुन्हा पक्षात परत घेणार नाही.अशी भावना कार्यकर्त्यांमध्ये असल्याचे वक्तव्य राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते अनिल देशमुख (Anil Deshmukh)यांनी केले. ते नागपूरमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
लोकसभा निवडणुकीचा निकाल ४ जूनला जाहीर होणार आहे. यावेळी राज्यात महाविकास आघाडीचे उमेदवार मोठ्याप्रमाणावर निवडून येतील, असा दावा अनिल देशमुख यांनी केला.यंदाच्या लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडी ३५ पेक्षा अधिक जागांवर विजयी होईल, असा दावा अनिल देशमुख यांनी केला. सध्या अजित पवार किंवा त्यांच्या गटाचे कोणतेही नेते माझ्या संपर्कात नाहीत. पण ४ जूननंतर ते प्रयत्न करतील. पण आमच्या पक्षाने ठरवले आहेत की, ज्यांनी शरद पवार यांची साथ कठीण काळात सोडली, त्यांना पुन्हा पक्षात घ्यायचे नाही.
४ जूनला लागणाऱ्या निकालात आम्हाला चांगले यश मिळतील. गेल्या दोन वर्षांपासून महाराष्ट्रातील जनता फोडाफोडीचे राजकारण पाहत आहे. मुख्यमंत्री दुष्काळी परिस्थिती संदर्भात बैठक घेतात. या बैठीकाला पाच पालकमंत्री उपस्थित नव्हते. शेतमालाचा भाव, दुष्काळ, महागाई या मुद्द्यांवर सरकार बोलतच नाही. चार महिन्यांनी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीतही जनतेची नाराजी दिसून येईल, असे अनिल देशमुख यांनी म्हटले.