हिंगोली,दि,१० जुलै २०२४ –राज्यात विदर्भ आणि मराठवाडा आज (१० जुलै) भूकंपाचे धक्के बसले आहेत.सकाळी बसलेल्या या भूकंपाच्या धक्क्यामुळे या भागातील नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले होते. मिळालेल्या ताज्या माहितीनुसार या भूकंपाच्या धक्क्यांत कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
अचानक जमिनीतून गूढ आवाज येऊन भूकंपाचे धक्के जाणवले. भूकंपाचे हे धक्के मराठवाड्यातील परभणी, हिंगोली, नांदेड तर विदर्भातील वाशीम जिल्ह्यात जाणवले. या घटनेत जीवित तसेच आर्थिक हानी झाली नाही. मात्र, अनेक नागरिक साखर झोपेत असल्याने धक्क्यांमुळे खबडून जागे होऊन जीव वाचवण्याच्या भीतीने घराबाहेर पळत सुटले. या जिल्ह्यात सध्या भीतीचे वातावरण आहे. या भूकंपाची तीव्रता ही ४.२ रिश्टर स्केल नोंदवली गेली.
काही महिन्यांपूर्वी मराठवाड्यातील काही भागात असाच भूकंप झाला होता. त्यानंतर आता पुन्हा एकदा भूकंपाचे धक्के बसल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
हिंगोली जिल्ह्यांमध्ये आज सकाळी ७:१५ च्या सुमारास सर्वदूर भूकंपाचा धक्का जाणवला आहे.हिंगोली जिल्ह्यातील पाचही तालुक्यात या भूकंपाचा धक्का जाणवल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले.