सर्वसमावेशक अलोट उत्साहाचे, नाशिकमधील २००५ चे साहित्य संमेलन
साहित्य पर्वणी - लेखांक - ३ ,लेखक - डॉ. स्वप्नील तोरणे
डॉ. स्वप्नील तोरणे
दर बारा वर्षांनी कुंभमेळा भरतो परंतु साहित्याचा हा कुंभमेळा भरण्यासाठी तब्बल ६२ वर्षे नाशिककरांना वाट बघावी लागली. त्यामुळे नाशिकमधील दुसरे असलेले ७८ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन एका वेगळया अर्थाने ऐतिहासिक ठरले होते.
नाशिक मध्ये भरलेल्या या संमेलनाला साहित्य रसिकांचा अपूर्व असा प्रतिसाद मिळाला. एकाच वेळी तीन- तीन परिसंवाद असतानाही, तिन्ही ठिकाणी लोकांची उपस्थिती लक्षणीय होती. संमेलनाच्या पहिल्या दिवशी नाशिकमध्ये अभूतपूर्व उत्साहात ग्रंथदिंडी निघाली. या दिंडीत नाशिक मधील सर्व शाळांचा सहभाग होता. रस्तोरस्ती रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या. संपूर्ण नाशिक शहर साहित्य संमेलनमय झाले होते.
अध्यक्ष केशव मेश्राम यांनी जाहीर कौतुक करुन म्हंटले, “अतिशय कल्पक बुद्धीने ही ग्रंथ यात्रा काढण्यात आली. समाजाचे विविध स्तर त्यात सहभागी झाले. साध्या माणसांची यातील गुंतवणूक अत्यंत आनंददायी आहे. यामागील परिश्रमाची जाणीव होतानाच, हा केवळ उत्सव नव्हता तर माणसामाणसातील ओलावा जपण्याचा आबालवृद्धांचा सर्वांग सुंदर कार्यक्रम होता.” असे सांगीतले.
संमेलन सुरु व्हायच्या आदल्या दिवशी जागरण-गोंधळाच्या कार्यक्रमाने काहीसा गोंधळ उडाला होता. परंतु अखेर ते सगळे पेल्यातले वादळ ठरले. संमेलनाच्या पहिल्या दिवशी संमेलनाध्यक्ष केशव मेश्राम यांचे भाषण हे सर्वस्पर्शी झाले. त्यामुळे हे संमेलन खऱ्या अर्थाने सर्वांना कवेत घेणारे ठरले होते.
संमेलनातील प्रत्येक कार्यक्रम अलोट उत्साहाचा ठरला. या संमेलनात सर्वसामान्यांना सहभाग उत्स्फूर्त असा होता. नाशिक मधील सर्व रस्त्यांवरून माणसांचा ओघ केटीएचएम महाविद्यालयाकडे वळत होता. लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत अशा सर्वांचा या गर्दीत समावेश होता होता. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून, जिल्ह्याच्या विविध भागातून लोकांनी येथे गर्दी केली होती. आपल्या घरातील कार्य समजून नाशिककरांनी या उत्सवात भाग घेतला. अनेक वाहिन्यांवरून घराघरातून साहित्य संमेलनाचा प्रत्येक कार्यक्रम दिसत असतानाही, बहुतांश लोकांनी त्याकडे पाठ फिरवून संमेलनस्थळी आपली उपस्थिती नोंदवली. संमेलनातील सांस्कृतिक कार्यक्रमांना जशी उपस्थिती होती, तशीच परिसंवादांना चांगली उपस्थिती होती. कुसुमाग्रज नगरीत भरलेले हे संमेलन अत्यंत नजरेत भरण्यासारखे असे होते. एका परिसंवादात प्राचार्य राम शेवाळकर म्हणाले की, “नाशिककर हे विलक्षण आहेत आणि म्हणूनच नाशिक मध्ये भरलेले हे साहित्य संमेलन अत्यंत विलक्षण ठरले आहे. अखिल भारतीय स्तरावरील भव्य साहित्य सोहळा या नगरीने तीन दिवस मनापासून अनुभवला.
संमेलनातील परिसंवादात महाराष्ट्राच्या जीवनाशी संबंधित बाबींचा उल्लेख झाला. कविसंमेलनाला प्रतिसाद अभूतपूर्व होता. या कविसंमेलनात नवोदित कवींच्या कविता या सध्य परिस्थितीवर परखड भाष्य करणाऱ्या होत्या. या मातीचा हुंकार, सर्वसामान्यांना पडणारे प्रश्न, त्यांचं रोजचं जगणं याचं प्रतिबिंब या कवी संमेलनात उमटले यामुळे खऱ्या अर्थाने हे संमेलन बहुजनांचे ठरले.
संमेलनाला कृषिमंत्री ना. श्री शरद पवार यांचे उद्घाटनपर भाषण हे समस्त मराठी माणसाला विचारप्रवृत्त करणारे आणि प्रेरणा देणारे ठरले. साहित्याकडून समाजाची काय अपेक्षा असते हेच त्यांनी आपल्या भाषणातून अधोरेखित केले. मराठी माणूस हा कर्जबाजारी, पिचलेला, दुर्मुखलेला असे चित्र आहे, त्याला समृद्धीकडे नेण्यासाठी प्रेरणा देणारे साहित्य निर्माण व्हावे असा विचार ना. पवार साहेबांनी दिला. समारोपात कन्नड भाषिक ज्ञानपीठ पुरस्कार विजेते लेखक डॉ. अनंतमूर्ती यांनी प्रमुख अतिथी या नात्याने केलेले भाषण इंग्रजी भाषेतून होते, मात्र परदेशी भाषेतून अतिशय सोप्या रीतीने भाषण कसे करावे याचा वस्तुपाठ श्री अनंतमूर्ती यांनी घालून दिला. त्यांनी सोप्या इंग्रजीतून केलेले परिणामकारक भाषण इंग्रजीचा अगदी मामुली गंध असलेल्या रसिकांनाही कळेल, असे त्यांच्या व्याक्यांवर मिळालेल्या प्रतिसादावरून दिसत होते.
मातृभाषेची महती वर्णन करतांना अनंतमूर्ती यांनी इंग्रजीचा समाजजीवनावर वाढत असलेला प्रभाव चिंताजनक असल्याचे स्पष्ट केले. चांगल्या शैक्षणिक संस्कारासाठी मुलांना त्यांच्या मातृभाषेतूनच प्राथमिक शिक्षण दिले पाहिजे असे विधान त्यांनी केले होते. मुख्यमंत्री ना. विलासराव देशमुख यांचे साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावर केलेले बहारदार भाषण प्रचंड लोकप्रिय ठरले. राज्यशकट हाकणाऱ्यांवर सारस्वतांच्या असलेला अधिकार मोकळेपणाने मान्य करून ना. देशमुख यांनी उपस्थित साहित्यिकांची मने जिंकून घेतली. पण त्याचबरोबर राजकारणातील व्यक्तींनाही आता साहित्य संमेलनाचे व्यासपीठ खुले होत असल्याबद्दल समाधान व्यक्त केले. लोकप्रतिनिधी हे सर्व जनतेचे आणि साहित्यिकांचे देखील प्रतिनिधी असतात, असे स्पष्ट करून ना. देशमुख यांनी साहित्य जगताने राज्यकर्त्यांकडे वेगळ्या नजरेने पाहू नये अशी अपेक्षा व्यक्त केली. राजकारण आणि साहित्य ही दोन क्षेत्रे हातात हात घालून कार्यरत झाली, तर पुढे एक वेगळे वातावरण तयार होईल, असा विश्वासही व्यक्त केला.
संमेलनाचे स्वागताध्यक्ष स्व. डॉक्टर वसंत पवार यांनी अत्यंत कुशलतेने संमेलनाचे संचालन केले. प्रारंभापासून या संमेलनाबाबत अनेक शंका-कुशंका निर्माण केल्या जात होत्या. नाशिककरांनी दिलेल्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे ही जळमटे दूर झाली. मागील चार-पाच संमेलनांना उपस्थित असणाऱ्यांनी देखील या संमेलनाचे भव्यतेने गुणगान केले. संमेलनाची ही यशस्विता नाशिक ही राज्याची सांस्कृतिक राजधानी असल्याच्या भावनेवर शिक्कामोर्तब करणारी ठरली. संमेलन यशस्वी करण्यासाठी हजारो हात दोन महिने रात्रंदिवस राबत होते. स्वागताध्यक्षांपासून असंख्य कार्यकर्ते व यजमान मराठा विद्या प्रसारक संस्थेच्या प्रत्येक कर्मचारी घरचे कार्य म्हणून त्यात रमला होता.
संमेलन चे नियोजन ही एक अवघड जबाबदारी होती. मात्र स्थानिक साहित्य क्षेत्रात काम करणाऱ्यायांसह संस्थेचे सर्व प्राचार्य, प्राध्यापक, संस्थाचालक, शिक्षक व पदाधिकाऱ्यायांनी मिळवलेल्या साहित्यसेवा सेवेच्या संधीचे सोने केले. हे संमेलन अनेक अर्थांनी वैशिष्ट्यपूर्ण ठरले होते.
यापूर्वीच्या संमेलनात १६८ स्टॉल होते त्याची संख्या या संमेलनात २९८ एवढी वाढली होती. सर्वाधिक लोकांचा सहभाग असलेली ग्रंथदिंडीने भव्यतेची मुहूर्तमेढ रोवली. तीन दिवसात सुमारे साडेतीन कोटी रुपयांच्या ग्रंथांची उलाढाल ग्रंथप्रदर्शनातून झाली. उद्योजकांचे साहित्य यासारख्या नव्या विषयावर परिसंवाद झाले. सहा तास चाललेल निमंत्रितांचे कविसंमेलन आणि दोन सत्रातील खुल्या संमेलनात तीनशे कवींचा सहभाग होता. संमेलनाचे विवीध उपक्रम, उद्घाटन व समारोप अशा तीन सत्रात राजकीय क्षेत्रांतील व्यक्तींचा सहभाग असल्याबाबत टीकात्मक चर्चा रंगविण्याचा प्रयत्न केला गेला. पणं तरी त्याला विधायक वळण देत साहित्यिक व राजकारणी यांच्यात समन्वय हवा, असा मतप्रवाह याच साहित्य संमेलनाच्या निमित्ताने पुढे आला.
कुसुमाग्रज नगरीत ग्रंथप्रदर्शन व विविध साहित्यिकांच्या कार्यक्रमांबरोबरच विविध कलाकृतींचे प्रदर्शन हौशी कलाकारांनी भरवले होते. या प्रदर्शनाला रसिक प्रेक्षकांनी चांगलीच दाद दिली.
समारोपाच्या कार्यक्रमात पारंपारिक झालझेंड्यासहित पाहुण्यांना निरोप देण्यात आला. अत्यंत उत्साहात संपन्न झालेले हे साहित्य संमेलन नाशिकला सांस्कृतीक राजधानीचा मान देऊन गेले.
डॉ. स्वप्नील तोरणे
जनसंवाद तज्ज्ञ
9881734838