खेळांमधील होणाऱ्या विविध दुखापती व त्यावरील आयुर्वेद उपचार

0
डॉ राहुल रमेश चौधरी 
खेळ म्हटला की दुखापती ह्या आल्याच.प्रत्येक खेळात काही ना काही दुखापती होतात,काही सौम्य स्वरूपाच्या तर काही गंभीर स्वरूपाच्या दुखापती असतात.यात हात – पाय मुरगळणे,सांध्याना दुखापती होणे,सांध्याचे स्नायू दुखावणे,स्नायू तुटणे,हात-पाय फ्रॅक्चर होणे,मुक्कामार बसणे अश्या एक आणि अनेक प्रकारच्या समस्या उभ्या राहतात.
 
आजकाल जागतीक स्तरावर ,देशस्तरावर खेळणाऱ्या ,आतंरदेश पातळीवर,आंतर जिल्हा,आंतर शहर व शाळा-महाविद्यालये,विद्यापीठे या वेगवेगळ्या स्तरावर खेळणारे अनेक खेळाडू असतात.या खेळाडूंना विशेषत: देश,आंतरदेश,जागतिक स्तरावर खेळणाऱ्या खेळाडूंना विशेष असे वैद्यकीय साहाय्य मिळते,व खालील स्तरांवर खेळणारे खेळाडू देखील विविध प्रकारचे आधुनिक उपचार घेत असतात.बऱ्याच वेळा अनेक खेळाडूंना वारंवार होणाऱ्या दुखापतींमुळे आपले करीयर यश व वेळेआधी संपवावे लागते.या मध्ये या खेळाडूंना आधुनिक उपचारांसह फिजिओथेरेपी चे देखिल उपचार मिळतात.तरी अनेक वेळा हे स्पर्धक वेदनांना सामोरे जातात.
 
परंतु आयुर्वेद हे असे शास्त्र आहे की जे या उपचार पध्दतींसह जोडले गेल्यास खेळाडूंचे करीयर लवकर संपणार नाही.बऱ्याच वेळेला आयुर्वेद म्हणजे उशिरा रिक्व्हरी असे गणित मनात असते पण आयुर्वेद हा देखिल जलद उपचार देतोच याव्यतिरिक्त पुन्हा त्रास होवू नये यासाठी त्या अवयवाला बळ देण्याचे देखिल कार्य करतो.या लेखात आपण खेळाडूंना काय काय दुखापती होवू शकतात व त्यावर आयुर्वेद कसा मात करू शकतो,याविषयी बघूयात.
 
खेळाडूंना कोणकोणत्या समस्या उद्भवू शकतात.
 
१.हात-पाय मुरगळणे-सूज येणे
 
२.स्नायू दुखावणे
 
३.स्नायू तुटणे अथवा स्नायू सांध्यापासून विलग होणे
 
४.हाडांचे फ्रॅक्चर होणे
 
५.मुक्कामार बसणे
 
६.सांधे अस्थिर होणे
 
७.सांधे कमकुवत होणे
 
८.खेळताना डोक्याला मार बसणे
 
९.डोळ्यांना इजा होणे
 
१०.मणक्यांना हिसका बसणे
 
११.तर्पण,पुटपाक 
 
आदी समस्या विशेष करून उभ्या राहतात.वर वर्णन केल्याप्रमाणे वेळोवेळी खेळाडूंना आधुनिक उपचार पध्दतीचा लाभ मिळतो.पण जेव्हा जेव्हा मोठ्या मोठ्या समस्या उभ्या राहतात त्यावेळी मात्र नेहमीच पुर्ण उपचार होतातच असे नाही.पण थोड्या संयमाने व व्यवस्थित आयुर्वेद उपचार केल्यास  जेवढा वेळ आधुनिक उपचार पध्दती व फिजिओथेरेपी ने लागतो तेवढाच वेळ आयुर्वेद उपचार पध्दतीने लागतो किंबहुना व्यवस्थित उपचार झाल्यास लवकर देखील बरे होतो.काय आहे आयुर्वेद उपचार पध्दती हे पाहूयात…….
 
१.लेप
 
२.धारा
 
३.बस्ती
 
४.औषधोपचार
 
५.व्रणोपचार
 
६.भग्नोपचार
 
७.जलौकावचारण
 
८.अभ्यंग
 
१०.पिंडस्वेद-पत्रपोट्टली स्वेद
 
यात वेदना ह्या तीव्र व सौम्य या दोन प्रकारच्या असतात.यात सांध्यापासून स्नायू विलग होणे,हाडे तुटणे ,डोक्याला-डोळ्यांना ईजा होणे या तीव्र स्वरूपातील वेदना तसेच मुक्कामार बसणे,पाय मुरगळणे या सौम्य स्वरूपातील वेदना आहेत.
 
१.लेप-  
 
हात-पाय मुरगळणे,मुक्कामार बसणे ,स्नायूंना इजा पोहोचणे अश्या तक्रारींमध्ये विविध औषधींचा लेप केल्यास लवकरात लवकर योग्य तो परिणाम दिसतो.यात सारिवा,मंजिष्ठा,अश्वगंधा,यष्टीमधु,रक्तचंदन,रक्तरोहीडा,लोध्र इत्यादी अनेक औषधांचा वेदना व दुखापतींनुसार लेप करावा.लेपाचे आयुर्वेद शास्त्रात विशिष्ठ पध्दती व गुणधर्म वर्णन केले आहेत त्यानुसारच लेप व्हायला हवा.
 
२.धारा-
 
धारा हा आयुर्वेदात पंचकर्म व उपकर्मांपैकी एक भाग आहे ज्यात काढे,तेल,औषधी दूध-तूप,ताक,मांसरस याचे कोमट स्वरूपात दुखऱ्या भागावर विशिष्ठ वेळेत एकसमान टाकले जातात.धारा हा उपक्रम सांध्याना बळकटी देणे,सांधे स्थिर करणे,स्नायू मजबूत करणे,स्नायूंना जोडण्याचे कार्य करणे,सूज कमी करणे अशी महत्वाची व तीव्र स्वरूपाची कार्ये केली जातात.
 
३.बस्ती-
 
बस्ती हा पंचकर्मांपैकी मुख्य उपक्रम मानला जातो.आयुर्वेद शास्त्रात मोठे आतडे हे वात दोषाचे महत्वाचे घर मानले जाते व आयुर्वेदाचा सिध्दांतानुसार वात दोष वाढल्यास हाडांची झीज जास्त प्रमाणात होते त्यामुळे या वात दोषाला नियंत्रणात ठेवल्यास किंवा त्याला शांत केल्यास स्नायू दुखावणे,तुटणे,हाड ठिसूळ बनणे,हाडे तुटणे ह्या समस्या लवकर बऱ्या होतात.यात एकदा वात दोषाचे शमन झाल्यानंतर हाडास,स्नायूस बळकटी देण्याचे कार्य देखील वेगवेगळ्या प्रकारच्या बस्ती द्वारे करता येते.
 
४.व्रणोपचार-
 
ज्याप्रमाणे आधुनिक शास्त्रात वेगवेगळ्या प्रकारचे जखमा करीता ड्रेसिंग केले जातात त्याप्रमाणे आयुर्वेदात देखील व्रणाकरीता म्हणजेच फ्रॅक्चर,वेगवेगळ्या जखमा करीता आयुर्वेद पध्दतीने व्रणोपचार वर्णन केले आहे यात आयुर्वेद पध्दतीने फ्रॅक्चर करीता splints बनवल्या जातात,वेगवेगळ्या  प्रकारचे लेप स्वरूपात plasters बनवले जातात.
 
५.जलौकावचारण-
 
जलौकावचारण हा उपक्रम पंचकर्माच्या रक्तमोक्षण या महत्वपूर्ण प्रकारच्या उपप्रकारात मोडते.जखमा तसेच त्यात होणारे वेगवेगळ्या प्रकारचे infections हे मुख्यत: रक्त दुष्टी मुळे होते.याचे निराकरण leech application म्हणजेच जलौकावचारण या उपचारांमार्फत पूर्णत: करता येते.
 
६.अभ्यंग-
 
अभ्यंग म्हणजे वेगवेगळ्या प्रकारची औषधी तेले ही व्रण शुध्द झाल्यानंतर व्रण योग्य रीतीने भरण्याकरीता तसेच त्याची उर्वरीत शुध्दीकरीता औषधी तेलांचा वापर केला जातो,त्या ठिकाणाला बल देण्याकरीता अभ्यंगाचा उपयोग केला जातो.
 
७.पिंडस्वेद –पत्रपोट्टली स्वेद
 
स्वेदन म्हणजे औषधी काढ्यांचा वाफारा होय.यात साध्या वाफाऱ्यासह औषधी वनस्पती तेलात परतून त्याची पुरचुंडी करून त्याने स्वेदन केले जाते किंवा दूधात-काढ्यात औषधे उकळवून त्यात तांदूळ शिजवून तयार केलेला भात पुन: औषधींनी सिध्द केलेल्या दूधात बुडवून शेक दिला जातो.यात दोन्ही शेक स्नायू व हाडे यांच्या वेदना ,कमकुवतपणा ,ठिसूळपणा यात उपयुक्त असतात.
 
८.औषधोपचार
 
हा एक असा भाग की वरील उपचारांसह औषधे सुरु ठेवल्यास लवकर फरक पडतो.अश्वगंधा,सारिवा,मंजिष्ठा,लोध्र,रक्तरोहिडा,हळद,गंध तेल,सहचरादी तेल,यष्टीमधु तेल,बला अश्वगंधादी,बला गुडुच्यादी,पिंड तेल,त्रयोदशांग गुग्गुळ आदी अनेक औषधांचा वापर अवस्थेनुरुप केला जातो,व त्यास हमखास यश देखील मिळते.
फक्त आयुर्वेद शास्त्रावर विश्वास ठेवणे गरजेचे आहे.
 
 
थोडक्यात पण महत्वाचे……….
 
नुकतीचा ऑलिम्पिक स्पर्धा झाली,अपेक्षेनुरुप भारत हळूहळू प्रगती च्या वाटेवर आहेच…..पण आता या खॆळाडूंच्या आरोग्य व दुखापती करीता केंद्र सरकारने आधुनिक शास्त्रासोबत  आयुर्वेदाची जोड द्यायला हवी.याने जास्तीत जास्त तंदुरुस्त व फिट खेळाडू स्पर्धेस पाठवता येतील.बाकीच्या देशात त्या खेळाडूना त्यात्या देशाची प्राचिन आरोग्य शास्त्र सोबत देखील मिळते त्यामुळे सर्वांगीण आरोग्य उंचावण्यास हातभार लागतो.
Dr.-Rahul-Ramesh-Chaudhari
डॉ.राहुल रमेश चौधरी

मोबाईल -९०९६११५९३०

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.