धरणाचा जिल्हा असलेल्या नाशिक वरील अन्याय दूर व्हावा – मनसे जिल्हाध्यक्ष अंकुश पवार

0

नाशिक : नाशिक जिल्ह्यात लहान मोठी २३ धरणे आहेत. ह्या धरणांमुळे नाशिकला धरणांचा जिल्हा असा लौकिक प्राप्त झाला आहे. नाशिक जिल्ह्यातील दारणा-गंगापूर समूहांतून नाशिक, नांदेड, मराठवाडा असे १३ जिल्ह्यांना, गिरणा समूहातून राज्यातील खानदेश विभाग तर नांदूरमध्यमेश्वर व वैतरणा धरणसमूहांतून मुंबई विभागाला पाणी पुरवठा होतो. राज्यातील ४० टक्के शेतजमिनीला नाशिक मधील धरणांतून पाणी पुरवठा होतो. मात्र जिल्ह्यातील बहुतांश धरणे ही ब्रिटीशकालीन असून ह्या धरणांमध्ये साचलेल्या गाळामुळे धरणांतील पाणी साठवण क्षमता ३० टक्क्यांनी कमी झाली आहे. दरवर्षी पावसाळ्यापूर्वी धरणांतील गाळ काढण्याचे नियोजन होते पण निधी अभावी फक्त कागदोपत्री सूचनांमध्ये तशी नोंद होते.अनेक धरणांच्या देखभाली व दुरुस्तीची तातडीची आवश्यकता असून त्यासाठी शासन स्तरावर निधीची उपलब्धता करण्यात यावी.अशी मागणी मनसे चे नाशिक जिल्हाध्यक्ष अंकुश पवार यांनी केली आहे.  

 

नाशिक जिल्हा दौऱ्यावर असलेले राज्याचे जलसंपदा मंत्री मा. ना. जयंत पाटील यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष अंकुश पवार यांनी नाशिक जिल्ह्यावर पाणीप्रश्नी सातत्याने होत असलेला अन्याय दूर करणेबाबत निवेदन दिले.

 

कश्यपी, इगतपुरी व जिल्ह्यातील इतर धरणांसाठी ज्यांनी आपल्या उपजाऊ जमिनी दिल्या त्या प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना जमिनीच्या मोबदल्यासाठी २०-२५ वर्षांपासून सरकार दरबारी हेलपाटा मारूनही अद्याप न्याय मिळाला नाही. अनेक प्रकल्पग्रस्तांच्या दोन-दोन पिढ्या जमिनीच्या मोबदल्यासाठी शासनाचे उंबरठे झिजवत आहेत. नदीत मिसळणाऱ्या नागरी व औद्योगिक सांडपाण्यांमुळे मोठ्या प्रमाणावर जलप्रदूषण होते. त्याविरोधात असलेले कायदे अपुरे असून त्यात सुधारणा करून अधिक कठोर नियम लागू केल्यास भावी पिढीस प्रदूषण विरहीत जलस्तोत्र मिळू शकेल. राज्यातील शेतीच्या पद्धतीचे पुनरावलोकन करून पाण्याच्या उपलब्धतेनुसार पिक पद्धती राबविण्यात यावी. आज मराठवाड्या सारख्या दुष्काळी भागांतही शेतकरी उस, कापूस असे नगदी पिक घेण्याच्या मागे लागतात. तर औरंगाबाद येथे असलेल्या मद्य कारखान्यांसाठी नाशिक जिल्ह्यातून पिण्याच्या पाण्याच्या आवर्तनाच्या नावाखाली पाणी सोडून नाशिक जिल्ह्यातील जनतेवर अन्याय केला जातो. तसेच उर्ध्ववाहिनी दमण-गंगा व नार-पार सारख्या योजनांच्या माध्यमातून नाशिकच्या हक्काचे पाणी परराज्यात पळविले जात आहे. राज्यातील अतिवर्षा व ढगफुटीमुळे निर्माण झालेल्या भीषण पूर परिस्थितीमुळे सर्वत्र ओल्या दुष्काळाची स्थिती निर्माण झाली आहे. 

 

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अतिवृष्ठीमुळे राज्यातील शेतीच्या नुकसानीच्या पंचनाम्याची वाट न पाहता ५० हजार रुपयांची  तातडीची मदत जाहीर करण्याचे आवाहन केले आहे. मा. ना. महोदयांनी आपल्या  नाशिक जिल्ह्यातील दौऱ्यात येथील भीषण पूर स्थितीची पाहणी करून तातडीने नुकसान भरपाई मिळणे बाबत निर्देश देऊन बळीराजाला दिलासा द्यावा. तसेच नाशिक जिल्ह्यातील प्रकल्प ग्रस्तांच्या प्रश्नावर समितीचे गठन करून प्रकल्प ग्रस्तांना लवकरात लवकर न्याय मिळवून द्यावा अशी मागणी केली. या वेळी जलसंपदा मंत्री मा. ना. जयंत पाटील यांनी मनसे जिल्हाध्यक्ष अंकुश पवार यांच्याशी चर्चा करतांना याबाबत लवकरच योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन दिले.

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.