नाशिक – ‘खादी म्हणजे काय? खादीचे वस्त्र कसे तयार होते?’ अशा अनेक प्रश्नांची उकल जिज्ञासू नाशिककरांना आज झाली. निमित्त होते राष्ट्रपिता महात्मा गांधीजींच्या जयंतीनिमित्त आयोजित ‘कापूस ते कापड’ या प्रदर्शनाचे. गंगापूर रस्त्यावरील मविप्र शिक्षण संस्थेच्या उदाजी मराठा बोर्डिंगच्या प्रांगणातील उदाजी महाराज शैक्षणिक वारसा संग्रहालयाच्या ठिकाणी आज सकाळी या प्रदर्शनाचे मान्यवरांच्या हस्ते उदघाटन झाले. यावेळी मविप्र संस्थेच्या सरचिटणीस श्रीमती नीलिमा पवार, नगरसेवक शशिकांत जाधव, अश्विनी बोरस्ते, माहिती व प्रसारण मंत्रालयाच्या क्षेत्रीय लोकसंपर्क ब्युरोचे अधिकारी पराग मांदले, सर्वोदय परिवाराचे मुकुंद दीक्षित, गौतम भटेवरा, श्रीकांत नावरेकर आदी मान्यवर हजर होते.
नाशिकच्या सर्वोदय व जीवनउत्सव परिवार आणि भारत सरकारच्या क्षेत्रीय प्रचार कार्यालय यांच्या माध्यमातून दिनांक 1 ते 3 ऑक्टोबर दरम्यान ‘कापूस ते कापड’ प्रदर्शन, ‘गांधीजींच्या जीवनावर आधारित चित्र प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. दिनांक 2 ऑक्टोबर, गांधी जयंतीच्या दिवशी दुपारी 3 ते 4 या वेळेत सुतकताई कार्यक्रम आणि सर्वोदयी कार्यकर्त्या सुश्री नलिनी नावरेकर यांचे ‘गांधीजींच्या प्रेरणेने सामाजिक कार्यात महिलांचे योगदान’ या विषयावर व्याख्यान होणार आहे. कोरोनाचे सर्व नियम आणि निर्बंध पाळून नाशिककरांनी या सर्व कार्यक्रमांचा लाभ घ्यावा, असे आवाहन नाशिक सर्वोदय आणि जीवनउत्सव परिवार आणि क्षेत्रीय लोकसंपर्क ब्युरो, माहिती आणि प्रसार मंत्रालय, भारत सरकार यांनी केले आहे.