पुणे-ज्येष्ठ साहित्यिक द.मा. मिरासदार यांचे आज वृद्धपकाळाने निधनझालं.पुण्यातील राहत्याघरी त्यांनी अखेरचा श्वासघेतला.ते ९४ वर्षाचेहोते.त्यांच्या जाण्यामुळे साहित्यविश्वावर शोककळा पसरली आहे.
द.मा.मिरासदार यांचे शिक्षण अकलूज, पंढरपूर येथे झाले होते. पुण्यात आल्यावर ते एम्. ए. झाले. काही वर्षे पत्रकारी केल्यानंतर त्यांनी इ. स. १९५२ साली अध्यापनक्षेत्रात प्रवेश केला. पुण्याच्या कॅंप एज्युकेशनच्या शाळेत ते शिक्षक होते. १९६१ मध्ये ते मराठीचे प्राध्यापक झाले.
मराठीतील श्रीपाद कृष्ण कोल्हटकर, राम गणेश गडकरी,चिं.वि. जोशी, आचार्य अत्रे,पु.ल. देशपांडे यांनी जोपासलेली विनोदा लेखनाची परंपरा द. मा. मिरासदारांनी पुढे सुरू ठेवली. मिरासदारांच्या व्यंकूची शिकवणी, माझ्या बापाची पेंड, शिवाजीचे हस्ताक्षर, भुताचा जन्म, माझी पहिली चोरी, हरवल्याचा शोध इत्यादी कथा उत्कृष्ट लिखाण आणि त्याचे इत्तम सादरीकरण यामुळे वाचकांच्या आणि श्रोत्यांच्या मनात कायमच्या कोरल्या गेल्या आहेत. गप्पागोष्टी, गुदगुल्या, मिरासदारी, गप्पांगण, ताजवा, असे २४ कथासंग्रह, १८ विनोदी चित्रपटांच्या पटकथा त्यांच्या नावावर आहेत.
एक डाव भुताचा आणि ठकास महाठक ह्या दोन चित्रपटांच्या संवादलेखनाबद्दल त्यांना पारितोषिके मिळाली आहेत. ‘ व्यंकूची शिकवणी ’ ह्या त्यांच्या गाजलेल्या विनोदी कथेवरून गुरुकृपा हा मराठी चित्रपट काढण्यात आला होता.
मराठी साहित्य क्षेत्रातील कादंबरी, विनोदी कथा, वगनाटय, चित्रपट संवाद, विविध विषयांवर लेख इत्यादी सर्व साहित्य प्रकार प्रा. मिरासदार यांनी लीलया हाताळले आहे. राज्य पुरस्कार, गदिमा पुरस्कार, अत्रे पुरस्कार, अश्या अनेक पुरस्कारांनी त्यांना यापूर्वी गौरविण्यात आले होते.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची ज्येष्ठ साहित्यिक द. मा. मिरासदार यांना श्रध्दांजली
“‘द. मा.म्हणजे ग्रामीण विनोदाची मिरासदारी”
मराठी साहित्यात ग्रामीण विनोदाच्या रंग-ढंगातून रंगत आणणारे आणि लेखन, कथाकथनातून अस्सल गावरान, मराठमोळा बाज सातासमुद्रापार नेणारे साहित्यिक म्हणून द. मा. मिरासदार यांची ‘मिरासदारी’ अबाधित राहील. त्यांच्या निधनामुळे मराठी साहित्य विश्वाने निखळ आणि अलौकिक प्रतिभावान असा साहित्यिक गमावला आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ज्येष्ठ साहित्यिक द. मा. मिरासदार यांना श्रध्दांजली अर्पण केली आहे.
मुख्यमंत्री शोकसंदेशात म्हणतात, द. मा. म्हणजेच दादासाहेबांनी मराठी साहित्यात आपल्या नावाप्रमाणेच मिरासदारी निर्माण केली. मराठीत ग्रामीण जीवनातील पार, कट्ट्यावरचा आणि अशा अनेक इरसाल नमुन्यांचा विनोदी खजिन्याचा पेटाराच दादासाहेबांनी उघडला. विनोदी लेखन, कथाकथन यातून त्यांनी अवघ्या महाराष्ट्राला मनमुराद हसवले. कथाकथनातून त्यांनी ग्रामीण महाराष्ट्राचा मराठमोळा बाज सातासमुद्रापार नेला. तसेच ते महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातही गेले. दादासाहेब उभे राहायचे, खर्जातील आवाजात कथा रंगवून सांगू लागले की त्या गावातले नमुने आरसा दाखवल्याप्रमाणे खळखळून हसू लागायचे. विलक्षण निरिक्षण शक्ती आणि लेखन-सादरीकरणातील निर्भेळपणा यामुळे मिरासदार यांनी आपली अशी ‘मिरासदारी’ निर्माण केली. त्यांच्या निधनामुळे मराठी साहित्याने अलौकिक प्रतिभावान असा साहित्यिक गमावला आहे. ज्येष्ठ साहित्यिक द. मा. मिरासदार यांना भावपूर्ण श्रध्दांजली.
श्रद्धांजलीखुसखुशीत कथांमधून बालचमूंपासून वयोवृध्दांना खदखदून हसविणारे, ज्यांच्या गोष्टी रसिकांना खिळवून ठेवतात ते सर्वांचे लाडके ज्येष्ठ साहित्यिक, कथाकथनकार प्रा. द. मा. मिरासदार यांचे दुःखद निधन झाले. ग्रामीण जीवनातील विसंगतीचे, विक्षिप्तपणाचे आणि इरसालपणाचे दर्शन घडवून त्यातील विनोद मिरासदारांनी आपल्या कथांतून फुलवला. मराठी साहित्यात कथालेखक म्हणून त्यांचे योगदान मोठे आहे. ग्रामीण जीवनावर त्यांनी लिहिलेल्या कथा विशेष गाजल्या. मराठी साहित्यात विनोदी साहित्याची परंपरा मोठी आहे. श्रीपाद कृष्ण कोल्हटकर, राम गणेश गडकरी, आचार्य अत्रे, चिं. वि. जोशी, पु. ल. देशपांडे यांनी निर्माण केलेली विनोदी साहित्याची समृध्द परंपरा मिरासदारांनी पुढे चालवली. त्यांच्या निधनाने साहित्य क्षेत्राची कधीही न भरून निघणारी हानी झाली आहे. मी व माझे कुटुंबीय मिरासदार कुटुंबियांच्या दुःखात सहभागी असून ईश्वर मृताच्या आत्म्यास चिरशांती देवो हीच प्रार्थना.भावपूर्ण श्रद्धांजलीछगन भुजबळमंत्री, अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण,महाराष्ट्र राज्य, तथा पालकमंत्री नाशिक जिल्हा
द. मा.नाव जरी समोर आले तरी मराठी वाचकांच्या चेहऱ्यावर प्रसन्न भाव उमटतात. विनोदी कथेच्या पलीकडेही त्यांची मिरासदारी होती. मराठी साहित्य क्षेत्रातील कादंबरी, वगनाटय, चित्रपट संवाद, विविध विषयांवर लेख इत्यादी सर्व साहित्य प्रकार त्यांनी लीलया हाताळले होते. जेव्हढे नम्र विनोदी त्यांचे लेखन तितकेच कथाकथना द्वारे निखळ सादरीकरण करत मराठी साहित्याची उज्ज्वल परंपरा त्यांनी भक्कम पणे सांभाळली. मिरासदारी प्रत्येक रसिकांच्या मनावर कायमची कोरलेली राहील.जयप्रकाश जातेगांवकर