मुंबई – महाराष्ट्र सरकारने दोन दिवसापूर्वी राज्यातील २५ जिल्ह्यांमध्ये कोरोनाचे रुग्ण कमी झाल्या मुळे निर्बंधांमध्ये शिथिलता दिली होती.यावेळी मुंबईच्या लोकल प्रवासा विषयीही निर्णय होईल अशी मुंबई लोकलमधून प्रवास करणाऱ्या सर्वसामान्यांना आशा होती.मात्र अद्यापही मुंबई लोकलमधून प्रवास करण्यासाठी परवानगी देण्यात आलेली नाही. लोकल सेवा अद्यापही सर्वसामान्यांसाठी बंद असल्याने एकीकडे लोक नाराजी व्यक्त करत असताना दुसरीकडे केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी मोठे विधान केले आहे.
ज्याक्षणी राज्य सरकार सांगेल त्या क्षणी लोकल सुरु करण्याचा निर्णय घेऊ अशी प्रतिक्रिया रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी दिली आहे.राज्य सरकारने आता राज्याने निर्बंध शिथिल केल्याचा आधार घेत केंद्र सरकारला रेल्वे पूर्ववत सुरु करण्याची विनंती केली तर आम्हाला काही अडचण नाही. राज्य आपली भूमिका जाहीर करत नाही तोवर केंद्र सरकार यामध्ये हस्तक्षेप करणार नाही. कारण शेवटी राज्य कोरोनाची स्थिती हाताळत आहे, ज्या क्षणी राज्य सरकार सांगेल त्या क्षणी आम्ही परवानगी देऊ असं त्यांनी सांगितलं.
मुंबई लोकल संदर्भात आज निर्णय ?
दरम्यान लोकल सुरु करण्याबाबत राज्य सरकार मुंबई उच्च न्यायालयात त्याबाबत भूमिका मांडणार आहे.वकिलांच्या संघटनेनं मुंबई उच्च न्यायालयात धाव घेऊन लोकल प्रवासाची परवानगी मागितली होती. त्यावर, कोविड लसीचे दोन डोस घेतलेल्या वकिलांना लोकल प्रवासाची परवानगी द्यावी, असे निर्देश न्यायालयानं राज्य सरकारला दिले होते. तसंच, लसीचे दोन डोस घेतलेल्या इतर नागरिकांचाही विचार व्हावा, अशी सूचना न्यायालयानं केली होती. राज्य सरकारनं त्यावर सकारात्मक प्रतिसाद दिला होता. आज याच संदर्भात राज्य सरकार सविस्तर भूमिका मांडणार आहे. त्यामुळं उच्च न्यायालयातील आजच्या सुनावणीकडं मुंबईकरांचं लक्ष लागलं आहे.त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांसाठी लोकल सुरु होणार का ? हे न्यायालयाच्या निकालावर अवलंबून आहे