मुंबई– अल्पावधीत लोकप्रिय झालेली स्टार प्रवाह वरील मालिका ‘आई कुठे काय करते’ या मालिकेतील भावनिक वळण सध्या प्रत्येकाच्याच मनाला चुटपुट लावणारं आहे. अनिरुद्ध आणि अरुंधतीचा २५ वर्षांचा संसार अखेरिस मोडला. घटस्फोटानंतर अरुंधतीने देशमुखांचं घर सोडलं. अरुंधतीला घर आणि आपली माणसं सोडताना ज्या वेदना झाल्या त्याच वेदना अनुभवताना प्रेक्षकांनाही अश्रू अनावर होत होते.
मालिकेत अरुंधतीची भूमिका साकारणारी अभिनेत्री मधुराणी गोखले प्रभुलकर यांनी देखिल एक भावनिक पोस्ट करत आपल्या भावनांना वाट मोकळी करुन दिली आहे.
या पोस्टमध्ये मधुराणी म्हणाल्या, ‘२५ वर्षं जो संसार इतका जीव जडवून केला, तो डोळ्यासमोर उन्मळून पडताना पाहणं, जी माणसं जीवापाड जपली त्यांना सोडून जाणं, आपलं आत्तापर्यंतचं अस्तित्व पूर्णपणे पुसून टाकून , नव्याने सुरुवात करणं हे अरुंधतीच्या आयुष्यात आलेलं सगळ्यात मोठं आव्हान आहे. किती वेदनेतून जात असेल ती. हे गेले सर्व एपिसोड आम्ही सगळेच अरुंधतीची ही वेदना अक्षरशः जगलोय आणि ह्या सगळ्याला आपण प्रेक्षकांनी सुद्धा इतका मायाळू प्रतिसाद दिलात की आम्ही भारावून गेलोय. असंख्य फोन आणि मेसेजेस मधून जाणवतं की अरुंधती मध्ये सगळे किती गुंतलेत.
पुन्हा पुन्हा ही अशी भूमिका करायला मिळाल्याबद्दल परमेश्वर आणि रंगदेवतेचे आभार मानावेसे वाटतात. स्टार प्रवाह वाहिनी, निर्माते राजन शाही, लेखिका नमिता वर्तक आणि मुग्धा गोडबोले, दिग्दर्शक रवींद्र करमरकर आणि सर्व सहकलाकारांच्या मी कायम ऋणात असेन. आई कुठे काय करते मालिका आणि आजवरच्या अरुंधतीच्या प्रवासात प्रेक्षकांनी मोलाची साथ दिली आहे. यापुढेही अशीच साथ मिळेल ही आशा आहे. आई कुठे काय करते हि मालिका सोमवार ते शनिवार सायंकाळी ७.३० वाजता स्टार प्रवाहवर.’