समाजातील गंभीर प्रश्नांवर विचार करण्यास प्रवृत्त करणारे नाटक ‘दिल्ली ची किल्ली’
६३ वी मराठी राज्य नाट्य स्पर्धा
६३ वी राज्य हौशी नाट्य स्पर्धेत २ डिसेंबर रोजी कविवर्य नारायण सुर्वे सार्वजनिक वाचनालय प्रस्तुत इंडियन पीपल्स थिएटर असोसिएशन (इप्टा) नाशिक निर्मित ‘दिल्ली ची किल्ली’ या नाटकाचा प्रयोग सादर झाला. सुप्रसिद्ध साहित्यिक सर्वेश्वर दयाल सक्सेना यांच्या ‘बकरी’ या नाटकावर आधारित, मच्छिंद्र मोरे यांनी लिहिलेल्या ‘दिल्ली ची किल्ली’ या दोन अंकी नाटकाने प्रेक्षकांना समाजातील गंभीर प्रश्नांवर विचार करण्यास प्रवृत्त केले आहे. प्रेक्षकांना संपूर्ण प्रयोगभर रंगमंचावर साकारल्या जाणाऱ्या अप्रतिम अभिनयाने बांधून ठेवले होते. नाटकाने समाजातील दमनकारी व्यवस्थांचा उपहासात्मक दृष्टिकोनातून पर्दाफाश केला आणि समाजाच्या विविध स्तरातील लोकांच्या आयुष्यातील संघर्ष दाखवून दिला. ‘दिल्ली ची किल्ली’ ने हास्य, व्यंग, आणि गंभीरतेचा सुरेख मेळ साधला, ज्याने प्रेक्षकांच्या मनात एक विशेष स्थान निर्माण केले. नाटकात बकरी व धेनु या पात्राच्या माध्यमातून एक प्रतीकात्मक कथा साकारली आहे, जी आजच्या समाजातील सामर्थ्यशाली व्यक्तींनी साधारण लोकांवर कसे दडपण आणले जाते, हे स्पष्ट करते. बकरी आणि धेनु हे केवळ एक पात्र नसून ती समाजातील दुर्बल, साध्या व्यक्तींचे प्रतिनिधित्व करते. ‘दिल्ली ची किल्ली’ नाटकाने या विचारांना नव्या दृष्टिकोनातून रंगमंचावर आणले. हे नाटक फक्त विनोदी किंवा संवेदनशील प्रसंगांपर्यंतच सीमित नसून, प्रेक्षकांना अंतर्मुख करायला लावणारे गंभीर मुद्दे उभे करते.
प्रयोगात सहभागी कलाकारांनी भूमिका ताकदीने साकारल्या. प्रत्येक कलाकाराने आपल्या भूमिकेत जीव ओतून अभिनय सादर केला. पात्रांच्या संवादांमधून नाट्याच्या विचारप्रधानतेचा ठसा उमटला. दिग्दर्शकाने साधेपणातून वास्तवाची प्रखरता सादर करून रंगमंचावर प्रभावीतेने मांडणी केली,ज्यामुळे प्रेक्षकांना त्या विचारसृष्टीमध्ये प्रवेश करायला सोपे गेले. कलाकारांनी त्यांच्या भूमिकांमध्ये जीव ओतून अभिनय सादर केला आहे. नाटकाच्या प्रत्येक प्रसंगाने प्रेक्षकांना अंतर्मुख होण्यास भाग पाडले.
नागेश धूर्वे यांनी नाटकाचे दिग्दर्शन केले असून नेपथ्य मुक्ता यांनी केले. प्रकाश योजना आर्या शिंगणे यांची तर रंगभूषा ललित कुलकर्णी यांची होती. वेशभूषा अनन्या तोंडे यांचे तर संगीत संयोजक अमन यांनी केले होते. नाटकात संकट -अपूर्व इंगळे, लचांड – निलेश आहिरे, व्यंकट -रोहन गांगुर्डे,पोपट – हितेश महाले, फौजदार – धनंजय मोहिते, धुरपी – तेजस्विनी तातळे यांनी आपल्या भूमिकांना योग्य न्याय दिला. त्यांना महाद नाना – प्रमोद उघाडे, बाबू कवी – तेजस सतिश खैरनार, मल्हारी – सार्थक कुलथे, खंडू – शिवतेज जाधव, चंदर – सागर चव्हाण, काकी – आशा पवार, पाणिनी – निखिल डांगे, वेणू – श्वेता राजगुरू, सूत्रधार – कृष्णा कांगणे, नटी – हर्षदा सूर्यवंशी, पाणक्या -चैतन्य कुलकर्णी यांनी साथ दिली. नाटकाची निर्मिती व्यवस्थापक तल्हा यांनी सांभाळली.
दिगंबर काकड
मो-९५९५९९६०३३
आजचे नाटक – कर्म
संस्था – मनकामेश्वर मराठा मंडळ ,नाशिक
लेखक -विजय मराठे
दिग्दर्शक -विजय मराठे
खूप खूप आभार नाशिक फार चांगला प्रतिसाद आणि भरघोस उपस्थिती दर्शवली त्याबद्दल 🙏🏽🙏🏽🙏🏽