वास्तववादी,आशयगर्भ एक सामाजिक नाटक- भर चौकात गांधी पुतळ्यासमोर 

0

६३ व्या मराठी राज्य नाट्य स्पर्धेत २९ नोव्हेंबर २०२४ रोजी ” भर चौकात गांधी पुतळ्यासमोर “हे नाटक सादर झाले. शहरातल्या अत्यंत गजबजलेल्या आणि प्रसिद्ध चौकात अचानक घडलेली अतिशय विचित्र पण संवेदनाशील घटना की ज्यामुळे संपूर्ण शहराचे, जिल्ह्याचे इतकेच नाही तर राज्याच्या मंत्रिमंडळा पर्यंतचे सर्व वातावरण एकदम ढवळून निघते. मुरली नावाचा एक तरुण जो मनाने अत्यंत सरळ, निसर्गावर प्रेम करणारा, सचोटीने वागणारा एका क्षणी मोहात पडून एका तरुण सुंदर स्त्रीची अचानकपणे भर चौकात विटंबना करतो आणि संपूर्ण समाजाचे वातावरण प्रक्षोभक बनते. मनाने चांगला असलेला हा तरुण झालेल्या चुकीची जाहीर माफी मागून कोर्ट जी शिक्षा देईल ती भोगायलाही तयार असतो. पण जिल्ह्यातील अतिशय श्रीमंत प्रगतीशील आणि  राजकारणातील अत्यंत मुरब्बी व्यक्तिमत्व असलेले महीपतराव तात्या मोहिते यांचा तो तरुण (मुरली) हा पुतण्या असतो.

आता हा प्रश्न महीपतरावांच्या प्रतिष्ठेचा बनतो. ते त्यांचे सर्व अधिकार वापरून पोलीस, जिल्ह्याचे पालकमंत्री, सरकारी वकील, महिला आघाडी सर्वांना हाताशी धरून पुतण्याला ह्या प्रकरणातून वाचवण्याचा आटोकाट प्रयत्न सुरु करतात. त्यात त्यांना यश मिळते कां? त्या तरुणीला न्याय मिळतो कां? मुरली बरोबर त्या सुंदर तरुणीची पुन्हा भेट होते कां? त्याच्या पाण्यासारख्या निर्मळ, प्रेमळ व सरळमार्गी स्वभावाची तिला भुरळ पडते कां? ह्या सर्व प्रश्नाची उत्तरे या नाटकात उत्कंठावर्धक पद्धतीने दाखवण्यात आले आहे. संघर्षपूर्ण, वास्तववादी नाटक सोमवंशी आर्य क्षत्रिय समाज,नाशिक ह्या संस्थेने समर्थपणे सादर केले.

या नाटकाचे लेखन श्री राजेंद्र पोळ यांनी केले. दिग्दर्शन आणि नेपथ्य श्री अविनाश वाघ यांनी केले होते. संगीत श्री रोहन वाघ व प्रकाश योजना श्री विनोद राठोड यांचे होते. वेशभूषा रिया वाघ व रंगभूषा नाना जाधव यांनी केले. मोहिनी – श्रेया कुलकर्णी, मंजिरी – ऐश्वर्या धोटे, मयुराबाई – मीना व्यंकटेश, सेविका – मीनाक्षी परदेशी, मुरली – महेंद्र चौधरी, महीपत तात्या – विकास पालखेडकर, वकील महेश – अविनाश वाघ, पालकमंत्री माधवराव – हेमंत गव्हाणे, पी ए मादूस्कर – अविनाश धर्माधिकारी, इन्स्पेक्टर मानसिंग – अमोल अहिरराव, पोलीस हवालदार – भारतसिंग परदेशी यांनी आपल्या भूमिकांना योग्य न्याय दिला.

दिगंबर काकड 
मो-९५९५९९६०३३

आजचे नाटक 
पिंडकौल 
लेखक- रत्नदीप उतेकर 
दिग्दर्शक -योगेश्वर थोरात 
अहिर सुवर्णकार समाज ,हरिओम सांस्कृतिक संस्था,नाशिक 

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.