नाशिक (प्रतिनिधी) :- नाशिकच्या सार्वजनिक वाचनालयाचे अध्यक्ष विलास औरंगाबादकर यांचे दुःखद निधन झाले.ते ७५ वर्षांचे होते २०१२ पासून सार्वजनिक वाचनालयाचे अध्यक्ष म्हणून काम पाहत होते.आज दुपारी ३:०० वाजता प सा नाट्यगृह आवारात प्राचार्य विलासराव औरंगाबादकर यांचे पार्थिव आणण्यात येणार असून सावाना आणि नाशिककर नागरिकांच्या वतीने पुष्पचक्र वाहून आदरांजली वाहण्यात येणार आहे.
विलास औरंगाबादकर हे पंचवटी महाविद्यालयाचे प्राचार्य होते. शिस्तप्रिय आणि उत्कृष्ट शिकवणे यामुळे ते विद्यार्थी वर्गात लोकप्रिय होते. ऑस्ट्रेलियामध्ये असलेल्या त्यांच्या पुत्राकडे ते उपचारासाठीही गेले होते. मात्र वर्षभर उपचार करूनही त्यांना फारसा फरक जाणवला नाही. काही दिवसांपूर्वीच ते नाशिकमध्ये आले होते. प्रकृती अस्वास्थ्यामुळे आज सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनाने सांस्कृतिक क्षेत्रातील एक उमदे व्यक्तीमत्त्व लोप पावले आहे.त्यांचे वडील स्वर्गीय मु. शं. औरंगाबादकर त्यांनी ही ५० वर्ष सार्वजनिक वाचनालयाची धुरा यशस्वीपणे सांभाळली होती.
विलास औरंगाबादकर यांनी महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित फार्मसी कॉलेजचे प्राचार्य म्हणून त्यांनी कामकाज पाहिले आहे. या काळात कॉलेजच्या विकासात त्यांनी मोठे योगदान दिले. अखिल भारतीय फार्मसी इंस्टिट्यूट चे ते सदस्य होते. फार्मसी कॉलेज ला मान्यता देणाऱ्या परीक्षण समितीचे सदस्य म्हणून त्यांनी काम पाहिले होते. त्यांचे वडील मु. शं. औरंगाबादकर हे सावानात ५० वर्षांपेक्षा अधिक काळ होते. सामाजिक क्षेत्रातही त्यांचे कार्य मोठे होते. त्यांचीच परंपरा विलास औरंगाबादकर यांनी पुढे सुरु ठेवली होती. सन २००७ मध्ये सावानाच्या कार्यकारी मंडळात त्यांची निवड झाली होती. २००८ते २०११ याकाळात ते सावानाचे कार्याध्यक्ष होते.
त्यांच्या पश्चात दोन मुले, पत्नी, मुलगी, नातवंडे असा परिवार आहे.
पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या कडून श्रद्धांजली
सार्वजनिक वाचनालय, नाशिक चे अध्यक्ष प्राचार्य विलास औरंगाबादकर यांचे दु:खद निधन झाले. अतिशय दुःख झाले. प्राचार्य विलास औरंगाबादकर यांनी सन २००८ पासून सावानाची विविध पदे भूषविली आहेत. सन २०१२ पासून ते सावानाचे अध्यक्ष होते.मितभाषी मृदुभाषी असे सरांचे व्यक्तिमत्व होते. चिन्मय मिशन, नाशिक, आयुर्वेद सेवा संघाच्या एथिकल कमिटीचे ही अध्यक्षपद त्यांनी भूषविले होते.
आपल्या कुशल कामामुळे महात्मा गांधी विद्या मंदिर या संस्थेमध्ये विविध महाविद्यालये त्यांनी नावारूपाला आणले.. त्यांना आदर्श प्राचार्य, आदर्श प्रशासन अधिकारी व मुंबईचा समाजश्री पुरस्कार प्राप्त झाला आहे. त्यांच्या काळात सार्वजनिक वाचनालयाने अनेक नवोपक्रम राबविले आणि वाचनालयाचे सांस्कृतिक कार्य पुढे नेले. त्यांच्या निधनाने सार्वजनिक वाचनालय व शिक्षण क्षेत्राची कधीही न भरून निघणारी हानी झाली असून औरंगाबादकर कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. मी व माझे कुटुंबीय औरंगाबादकर कुटुंबियांच्या दुःखात सहभागी असून ईश्वर मृताच्या आत्म्यास चिरशांती देवो हीच प्रार्थना.
भावपूर्ण श्रद्धांजली !
छगन भुजबळ,मंत्री अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण महाराष्ट्र राज्य, तथा पालकमंत्री नाशिक जिल्हा.
_____________
औरंगाबादकर घराणे हे नाशिक मधील व्यापार आणि सामाजिक क्षेत्रातील एक नावलौकिक असलेलं घराणे. ग्रंथालय भुषण मुरलीधर औरंगाबादकर ह्यांनी प्रदीर्घ काळ नाशिकच्या व्यापारी क्षेत्रात आणि मुख्य म्हणजे सार्वजनिक वाचनालयाच्या वाटचालीत मोठे योगदान दिले . हीच परंपरा आपल्या वडिलांनंतर प्राचार्य विलासराव औरंगाबादकर यांनी आपल्या खांद्यावर घेतली .शैक्षणिक क्षेत्रातही त्यांनी स्वतःचा ठसा उमटवला .
चिन्मय मिशनचे तेअध्यक्ष होते.हिरे ह्यांच्या संस्थेच्या फार्मसी कॉलेजचे ते प्राचार्य होते.गणेशवाडी आयुर्वेद काँलेजसाठीही त्यांनी आपल्या अनुभवाचा लाभ मिळवून दिला. नंतर मुख्य म्हणजे सावानाचे अध्यक्ष म्हणून ते कार्यरत झाले. आपल्या शांत, संयमी कामकाज पद्धतीने त्यांनी सावानाची कारकीर्द यशस्वी केली .सावानाला आर्थिक सहकार्य मिळवून देण्यात ते सतत प्रयत्नशील असत.अनेक वादळे आली .पण त्यांनी धीराने तोंड दिले .अखेरच्या वर्ष दोन वर्षात अनेक व्याधींना सहन करावे लागले. त्यामुळे त्यांना आपल्या सगळ्यांचा लवकर निरोप घ्यावा लागला याचे वाईट वाटते .त्यांच्या निधनाने सावानाचे मोठे नुकसान झाले आहे.भावपूर्ण श्रद्धांजली.
जयप्रकाश जातेगांवकर
________
भावपुर्ण श्रद्धांजली
सार्वजनिक वाचनालयाचे अध्यक्ष प्राचार्य विलासराव औरंगाबादकर यांचे दीर्घ आजाराने आज सकाळी दुःखद निधन झाले. सर चिन्मय मिशन या संस्थेशी निकट होते. सरांचे वडील ग्रंथालय भूषण मु. श. औरंगाबादकर यांच्यानंतर सरांनी सुद्धा सावाना त प्रदीर्घ सेवा केली. मितभाषी मृदुभाषी असे सरांचे व्यक्तिमत्व होते.त्यांच्या निधनाने सार्वजनिक वाचनालयाचे मोठे नुकसान आहे. हे दुःख सहन करण्याची शक्ती ईश्वर औरंगाबादकर परिवारास देवो हीच प्रार्थना. माझे कुटुंबीय तसेच सावाना परिवार औरंगाबादकर परिवाराच्या दुःखात सहभागी आहे. सरांना नाशिककर नागरिकांच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली
ॲड अभिजित बगदे मा कार्याध्यक्ष तथा
प. सा.नाट्यमंदिर सचिव