नो, नाही, नकोच… नन्नाचा पाढा !

2

आदिती मोराणकर (शिक्षण विश्लेषक)

नदीचं पाणी जोवर खळखळून वाहत असतं तोवर ते पाणी स्वच्छंद असतं. वाटेत येणारी प्रत्येक अडचण, प्रत्येक दगड बाजूला करून आपला मार्ग स्वतः घडवत असतं आणि शेवटी आपल्या ध्येयापर्यंत जाऊन पोहोचतं. तेच पाणी जर वाहण्याचा थांबलं आणि एकाच ठिकाणी साचलं तर त्याचं डबकं होतं. त्या पाण्याला वास यायला लागतो आणि ते पाणी कुणाच्याही वापराच्या योग्य राहत नाही. मुलांचाही तसंच आहे.

 

बे एक बे, बे दुने चार,

सतत “नाही” ऐकून मुलं आपली बेजार !

बे त्रिक सहा, बे चोक आठ, आपल्या बोलण्याकडे मुलांनी फिरवली पाठ !

बे पंचे दहा, बे सख बारा,

मुलांच्या कानात भरला वारा !

बे साती चौदा, बे आठी सोळा,

मुलांनो तुम्ही सतत शर्यतीत पळा!

बे नवे अठरा, बे दाहे वीस,

नन्नाच्या पाढ्याने मेंदुचा पडतोय कीस…

 

दुर्दैवी आहे पण खर आहे. मुलांशी बोलण्याची आपली पद्धत आत्तापर्यंत जर तुम्ही बदलली नसेल तर या लेखानंतर तुम्ही बदलाल या अपेक्षेने माझे विचार तुमच्यासमोर मांडत आहे.

“अरे, नको चढु तिकडे.”

“नाही म्हटलेलं कळत नाही का तुला?”

“नाही चा अर्थ नाही असाच होतो!”

“मला नाही वाटत तुला हे जमेल.”

“तू करू शकणार नाही, हे मला आधीच माहीत होतं.”

“नाही ऐकायचं का तुला माझं? मग का तुला काय करायचं ते कर.”

“मी एकदा नाही सांगितलंय”

 

ही वाक्य जर सध्या तुमच्या संवादाचा अविभाज्य भाग असतील तर समजून घ्या कि तुम्हीदेखील नन्नाचा पाढा पाठ केलेला आहे.

 

नात्यांमध्ये सगळ्यात बदनाम आणि तितकंच गमतीशीर नातं आहे सासू आणि सुनेचे ! आता तुम्ही म्हणाल मध्येच सासू-सून कशी आली ? आपला विषय तर बालक आणि पालक यांचा विचार करणारा असतो ना मग मध्येच सासू-सून कशाला? सासू आणि सून या व्यक्तिरेखांचा नाही तर त्यांच्या स्वभाव वैशिष्ट्यांचा उल्लेख बालक आणि पालक नात्यातही होतो. जसं ‘सासू’ म्हणजे “सारख्या सूचना” आणि ‘सून’ म्हणजे ‘सूचना नको’ तसंच आपण पालक ‘सासु’ असतो आणि बालक ‘सुन’ (कधी कधी सुन्न) असतात. अर्थात पालक सारख्या सूचना देतात आणि बालक सूचना नको म्हणतात.

 

बरं, सूचना देतांनाही आपली भाषा कशी असते ? जरा नीट विचार करून आठवलं तर लक्षात येईल की बहुतेक वेळा एखादी गोष्ट करण्यापासून मुलांना थांबवण्यासाठी आपण पटकन ज्या सूचना देतो त्या सूचनेची सुरुवात ‘नो, नाही, नकोच’ या नन्नाचा पाढ्याने झालेली असते. यातून मुलांना सतत एक नकारात्मकता आपणंच देत असतो.

 

अगदी अलीकडेच झालेल्या एका संभाषणातून माझ्या एक गोष्ट प्रकर्षाने लक्षात आली. हे संभाषण होतं चार साडेचार वर्षाच्या दोन मुलांचं! पहिला म्हणाला, “मला डोसा खूप आवडतो, तू उद्या टिफिन मध्ये डोसा आणशील ?” त्यावर दुसरा मुलगा म्हणाला, “माझी मम्मी नाही देणार.” पहिला मुलगा म्हणाला, “पण तू मला विचारून घे.” त्यावर पहिला परत म्हणाला,” अरे ती नाहीच म्हणेल मला माहिती आहे.”

 

आपली आई आपलं काहीही न ऐकता किंवा सगळं ऐकूनही नाहीच म्हणणार आहे याची मुलांना का खात्री वाटत असेल ? याला जबाबदार त्या मुलाच्या आईचा नन्नाचा पाढाच आहे.

 

लहान मुलांना सगळं काही मनासारखं करता येणार नाही हे आपल्यालासुद्धा माहिती असतं पण एखाद्या गोष्टीला नाही म्हणण्याआधी आपल्या नकाराचं कारण मुलांना समजावून सांगायला काय हरकत आहे ? आत्ताच सांगितलेल्या संभाषणाचे उदाहरण घेऊया. त्या मुलाची आई त्याला डोसा देणारच नाही याबद्दल मुलाची खात्री आहे पण “बाळा, तुला डे-केअरमध्ये आठ तास राहावं लागतं. नुसता डोसा खाऊन तुझी भूक भागणार नाही म्हणून तुला मी डब्यात पोळी भाजी देते. तू डे केअर मधून घरी आलास की तुला गरम गरम डोसे करून देईन.” असं जर त्याच्या आईने त्याला समजावून सांगितलं असतं तर आईच्या नकारामागचं कारण मुलाच्या लक्षात आलं असतं आणि आई आपल्याला कायम नाहीच म्हणते हा त्याचा गैरसमज झाला नसता.

 

खरंतर पालक म्हणून आपल्या सगळ्यांनाच आपल्या मुलांची खूप काळजी वाटत असते. त्या काळजी पोटी किंवा आपल्या मुलांनी काही चुकीचं काम करू नये यासाठी किंवा त्यांनी केलेल्या कृतीचा परिणाम त्यांच्यावर होऊ नये, त्यातून त्यांना इजा होऊ नये, यासाठी आपण त्यांना सतत थांबवण्याचा प्रयत्न करत असतो. 

 

नदीचं पाणी जोवर खळखळून वाहत असतं तोवर ते पाणी स्वच्छंद असतं. वाटेत येणारी प्रत्येक अडचण, प्रत्येक दगड बाजूला करून आपला मार्ग स्वतः घडवत असतं आणि शेवटी आपल्या ध्येयापर्यंत जाऊन पोहोचतं. तेच पाणी जर वाहण्याचा थांबलं आणि एकाच ठिकाणी साचलं तर त्याचं डबकं होतं. त्या पाण्याला वास यायला लागतो आणि ते पाणी कुणाच्याही वापराच्या योग्य राहत नाही. मुलांचाही तसंच आहे. मुलांची कृती लांबून निरीक्षणाखाली ठेवली तर त्यांनी केलेल्या क्रियेचा परिणाम त्यांना स्वतःला समजेल. ही क्रिया परत करायची की नाही करायची याचा निर्णय ते आत्मविश्वासाने घेऊ शकतील. याउलट कुठलीही क्रिया करताना ‘हे करू नको’ असं म्हणून आपण त्यांना थांबवलं तर ते करून बघण्याची दुर्दम्य इच्छा त्या मुलांच्या मनात राहते आणि मग घरात एकटे असताना तीच गोष्ट मुलं आवर्जून करून बघतात. मुलं जर त्यांच्या मनात आलेली प्रत्येक गोष्ट करून बघणारच असतील तर ती गोष्ट आपल्या नजरेसमोर आपल्या निरीक्षणाखाली त्यांनी केली तर संभाव्य धोक्याची सूचना आपण त्यांना नक्कीच देऊ शकतो आणि आपल्यालाही काही मोकळीक आहे, स्वातंत्र्य आहे, आपले आई-वडील आपल्याला निर्णय घेऊ देतात, या समाधानाबरोबरच त्यांच्यासोबत आपण असल्यामुळे त्यांचं कुठल्याही प्रकारचे नुकसान होत नाही. 

 

कधीकधी पालक म्हणून आपण अगदी टोकाचं बोलतो. आपल्या सहकाऱ्यांचा, आपल्या नातेवाईकांचा राग आपल्या मुलांवर निघत असतो. अशा वेळेला आपल्या तोंडातून निघून गेलेली काही वाक्य मुलांना कायमस्वरूपी न्यूनगंड देऊन जातात. काही उदाहरणं आणि काही वाक्य मी तुम्हाला सांगते. आमच्या बिल्डिंगमध्ये नववीतली एक मुलगी राहते. ऑनलाइन अभ्यासामुळे नाईलाजाने तिच्या पालकांनी तिला मोबाईल दिला. ऑनलाइन लेक्चर संपल्यानंतरही त्या मुलीने मोबाईलमध्ये स्वतःला हरवून टाकलं. पालकांनी तिला बरेच वेळा समजून सांगितलं मग गरजेपुरता मोबाईल तिच्याजवळ ठेवायला सुरुवात केली. लेक्चर संपल्या संपल्या मोबाईल ताब्यात घ्यायला सुरुवात केली, पण या सगळ्यातून फक्त आणि फक्त वाद-विवाद वाढत गेले. त्याची परिणती म्हणुन एक दिवस तिला मार तर बसलास, त्याचबरोबर “तू जन्मालाच कशाला आलीस?” हे वाक्य आईच्या तोंडातून निघालं. आत्तापर्यंत आई-वडिलांनी केलेलं प्रेम, त्यांचा तिच्यावर असलेला विश्वास, त्यांनी तिला आत्तापर्यंत दिलेल्या सर्व सुखसोयी हे एका क्षणात शून्य झालं. या एका वाक्याने ती मुलगी इतकी हादरली कि त्यानंतर दोन दिवस तिने तोंडातून एक शब्दही काढला नाही आणि अजूनही फारसं कोणाशीच ती बोलत नाही.

 

बऱ्याचदा डे-केअरमध्ये मुलांना घ्यायला आल्यानंतर पालक ‘कधी एकदा घरी जाऊ’ या घाईत असतात. मुलांची निघण्याची सगळी तयारी करून ठेवल्यावरसुद्धा त्यांच्या हातातलं खेळणं ठेवायला,  टिचरला बाय म्हणायला, फार काय अगदी चप्पल घालायला मुलांनी एक दोन मिनिटे मागेपुढे केलं तर लगेचच “आवर लवकर नाहीतर तुला तिथेच ठेवून जाईल” हे वाक्य पालक हमखास म्हणतात. पालकांनो, तुम्ही तुमच्या कामावर जावं, तुम्हाला तुमची कर्तव्य पार पाडता यावीत यासाठी ती मुलं तुमच्यापासून सात-आठ तास विनातक्रार लांब राहिलेली असतात. एवढ्या लहान वयाच्या मुलांसाठी सात-आठ तासाचा वेळ हा खूप दीर्घ काळ असतो. त्यांनी केलेल्या ऍडजेस्टमेंटनंतर पालक दोन-तीन मिनिट सुद्धा मुलांसाठी थांबायला तयार नसतात. उलट इतक्या वेळ थांबल्यानंतरही ‘तुला इथेच सोडून जाईल’ असं म्हटल्यानंतर त्या मुलांना काय वाटत असेल? मुलांच्या वेळेचा अंदाज किंवा हिशोब मोठ्या माणसांसारखा नसतो. पालकांच्या अश्या बोलण्याने मुलांना सतत ‘मी कुठेतरी हरवेल, मला हे कुठेतरी सोडून देतील’ अशी भीती वाटत राहते.

 

आपल्या घरी पाहुणे आल्यानंतर आपल्या मुलांनी कलागुणांचे प्रदर्शन मांडावं असं पालक म्हणून आपल्याला वाटतं यामध्ये आपलं काही चुकलं नाही कारण आपण कोणाच्यातरी घरी गेल्यानंतर त्यांच्या मुलांनी गाणं म्हणून दाखवलेलं असतं, कधीतरी एखादा श्लोक म्हटलेला असतो, कधीतरी एखादा संवाद म्हटलेला असतो मग आपल्या मुलांनी एखादी ‘नर्सरी राइम्स’ म्हणायला काय हरकत आहे, या विचाराने आपण मुलांना “काकांना जॉनी जॉनी म्हणून दाखव” असं आपण अधिकारवाणीने सांगतो आणि आपली मुलं ते हमखास ऐकत नाहीत. कधी ते आपल्यामागे लपतात, कधी आलेल्या माणसाकडे नुसतंच एकटक बघत बसतात, तर कधी चक्क आपल्या तोंडावर ‘नाही’ म्हणून आत निघून जातात. एकदा का पाहुणे गेले की, “तुला आम्ही जे सांगतो, ते तू कधीच करत नाहीस” या वाक्याबरोबरच आपला सगळा राग मुलांवर निघतो. हे करतांना जर मुलांना तुम्ही सतत असं बोलत असाल तर त्यांच्या मनात काय विचार येत आहेत याचा तुम्ही विचार करता का? ‘मला कुठलेही काम योग्यप्रकारे करता येत नाही’ ही भावना मुलांच्या मनात निर्माण होते.

 

ज्या घरात एकुलता एक मुलगा असेल तिथे तर बघायलाच नको शेअरिंग, केअरिंग या गोष्टींचा बऱ्याच ठिकाणी अभाव दिसतो पण जिथे एखादं बहिण भाऊ असेल तिथे “तू तुझ्या बहिणी सारखा असता तर?” किंवा “तुला तुझ्या भावासारखे वागायला जमेल की नाही?” अशा प्रकारचं बोलणं मुलांच्या मनात त्यांच्याच बहीण भावाबद्दल द्वेष निर्माण करतं‌‌. प्रसंगी अनाहूतपणे ते मूल स्वतःलाच आपल्या बहिणीबरोबर स्पर्धेत उतरवतं. या पुढचं पाऊल म्हणजे ‘मी वाईटच आहे, मी माझ्या भावांसारखा चांगला कधीच होऊ शकत नाही.’ हा विचार मुलांना पछाडून सोडतो.

 

गेल्या दोन वर्षात जवळपास आपल्या सगळ्यांच्याच आर्थिक परिस्थितीवर बर्‍यापैकी परिणाम झाला आहे. आपल्या बजेटचं बदललेलं गणित मुलांना समजण्याचं काहीच कारण नाही. बालसुलभतेने काही गोष्टींचा हट्ट मुलं करत असतात. मुलाचा एखादा हट्ट आपण नाकारला आणि ते नाकारतांना त्याला योग्य कारण दिलं नाही तर मुलांचा आपल्या आर्थिक परिस्थितीबद्दल गैरसमज होतो. माझ्या ओळखीत एक असं कुटुंब आहे जे अंदाजे सहा-सात महिन्यानंतर त्यांची फॅमिली कार बदलतात. अलिकडे घेतलेली कार त्यांना जास्त आरामदायक वाटली म्हणून त्यांनी दीड वर्ष झालं तरी कार बदलली नाही. सहाजिक त्यांच्या मुलाला या गोष्टीचा अप्रूप वाटलं. मग एकदा हॉटेलमध्ये गेलेले असताना त्या मुलाने पहिल्यांदा मेनू कार्ड ची डावी साईड न बघता उजवी साईड बघून ऑर्डर दिली. त्याच्या या वागण्याचा त्याच्या आई-बाबांना आश्चर्य वाटलं. आई-बाबांनी काही विचारण्याच्या आतच त्या मुलाने त्याच्या बाबांच्या हातावर हात ठेवला आणि म्हणाला, “बाबा, आपण गरीब झालो आहोत ना.” बाबांना आश्चर्य वाटलं त्यांनी विचारलं, “का रे तुला असं का वाटतं?” मुलगा म्हणाला, “नाही, आपण गेले दीड वर्ष जुनी कार वापरतोय. नवीन कार घेतली नाही. तुमच्याकडे पैसे नाहीत ना नवीन कार घ्यायला म्हणून मी आज रेट बघून ऑर्डर दिली आहे. घाबरू नका, मी हॉटेलमधला सगळ्यात स्वस्त मेन्यु ऑर्डर केलाय. त्यावेळी त्याच्या बाबांनी कार न बदलण्याची कारणं त्याला व्यवस्थित समजावून सांगितली. मग स्वस्तातला मेनू खातांना ‘आपण अजूनही श्रीमंत आहोत’ हा आनंद त्या मुलाचा चेहऱ्यावर परत आला. 

 

आपल्या नकळत आपण मुलांशी बर्‍याच काही गोष्टी बोलत असतो ज्यातून चुकीचे संदेश मुलांपर्यंत जाऊ शकतात. आपल्या नकारामागची आपली काळजी, आपली कारणं आणि आपली मनस्थिती मुलांपर्यंत व्यवस्थित पोहोचवण्याची मोठी जबाबदारी पालक म्हणून आपल्यावर आहे. नाहीतर आपल्या नन्नाचा पाढ्याचा मुलांवर विपरीत परिणाम होतच राहील आणि भविष्यात त्याचे परिणाम पालक म्हणून आपल्यालाही भोगावे लागतील.

 

तुमच्या मुलांबद्दलचे प्रश्न तुम्ही ई-मेल किंवा व्हाट्सअप करून मला विचारू शकता. भेटूया मग पुढच्या सदरामध्ये एका नवीन विषयासह!

Aditi Morankar
आदिती मोराणकर (शिक्षण विश्लेषक)

 

 

आदिती मोराणकर (शिक्षण विश्लेषक)

संचालिका : ईस्कुलिंग व्हर्च्युअल डिजीस्मार्ट किंडरगार्टन.

eskooling2020@gmail.com | 8329932017 / 9326536524

https://www.instagram.com/theblooming.minds/

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

2 Comments
  1. Anupama Deshpande says

    खुप छान लिहिले आहेस. कधी कधी पालक नकळतच न न्नाचा पाढा वाचतात. या लेखामुळे त्यांच्यात फरक पडेल. मी माझ्या young students ना forward karate tuze lekh🙂👍❤️

    1. Aaditi Tushar Morankar says

      Thank you so much for your appreciation.

कॉपी करू नका.