नाशिक (प्रतिनिधी) : मानवी मुल्यांची जोपासना करणार्या महात्मा गांधी यांच्या विचारांचा वारसा जपण्याचं काम ‘नात्यांचे सर्व्हिसिंग’ या कथासंग्रहात पानापानांवर येते. आजच्या संवाद हरवलेल्या काळात मानवी नाती जोडण्याचं काम, सकारात्मक विचारांची प्रक्रिया गतिमान करण्याचे काम ह्या कथासंग्रहातून होते. हा खर्या अर्थाने प्रेरणादायी विचारांचा गोफ आहे, असे प्रतिपादन इस्पॅलिअर स्कूलचे संस्थापक सचिन उषा विलास जोशी यांनी केले.
‘नात्यांचे सर्व्हिसिंग’ कथासंग्रहाच्या चौथ्या आवृत्तीचे प्रकाशन इस्पॅलिअर स्कूल, बेळगांव ढगा येथे झाले. त्याप्रसंगी ते बोलत होते. राष्ट्रपिता महात्मा गांधी व लाल बहाद्दूर शास्त्री यांच्या जयंतीचे औचित्य साधून ह्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
श्री. जोशी म्हणाले की, शाळा मुलांना घडवते पण पुस्तके मानवी आयुष्य कसे जगायला हवे, हे शिकवतात त्याचेच दर्शन या कथासंग्रहातून झाले आहे, असेही ते म्हणाले.
ज्योती स्टोअर्सचे संचालक श्री. वसंतराव खैरनार म्हणाले की, माणसामाणसांतील विश्वास जोपासणारे नाते दृढ करणारे हे पुस्तक समाजमनाचा आरसा आहे. समाजामध्ये नात्यांविषयी ओलावा टिकून राहण्यासाठी अशी पुस्तके मोलाचे योगदान देतात.
पुस्तकाचे लेखक श्री. विश्वास ठाकूर म्हणाले की, आयुष्यात भेटलेली माणसे त्यांचे अंतरंग जाणून घेण्याच्या प्रयत्न म्हणजे हे पुस्तक आहे. पुस्तकांच्या अभूतपूर्व प्रतिसादाने मी भारावून गेलो आहे. नात्याचा शोध आणि कुतूहल ही माझ्या लेखना मागची प्रेरणा आहे.
शब्दमल्हार प्रकाशनाचे प्रकाशक श्री. स्वानंद बेदरकर म्हणाले की, आजुबाजूला जे घडत आहे त्याचा शोध आणि त्यातून बोध देण्याचे काम हा कथासंग्रह परिणामकारकपणे करतो. आजच्या काळाची समाजाची बदलती मानसिकता या कथासंग्रहातून समोर येते व वास्तवाचे भान देते.
डॉ. स्वाती भडकमकर म्हणाल्या की, आपण जगाकडे बघतो म्हणजे उघड्या डोळ्यांनी न बघता प्रतिक्रिया देतो. ते डोळस भान जागृत करणारा हा कथासंग्रह आहे. वाचन संस्कृतीच्या वाढीसाठी नात्यांचे सर्व्हिसिंगसारखे कथासंग्रह दिशादर्शक ठरावेत.
डॉ. स्मिता मालपुरे म्हणाल्या की, वाचकांनी मनापासून कथासंग्रहातील आशयावर, घटना प्रसंगावर प्रेम करावा, असा हा कथासंग्रह आहे. वाचकांच्या मनातलं नेमकं ओळखून ते लेखकाने शब्दांकित केले आहे, ते या कथासंग्रहाचे यश आहे.
यावेळी विश्वास ठाकूर यांना इस्पॅलिअर स्कूलतर्फे दिला जाणारा ‘वुई दि चेंज’ हा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
यावेळी ग्रंथ तुमच्या दारी योजनेचे शिल्पकार श्री. विनायक रानडे, इस्पॅलिअर स्कूलच्या सौ.प्राजक्ता जोशी, शब्दमल्हारचे प्रकाशनाचे प्रशांत वाखारे तसेच इस्पॅलिअर स्कूलचे मुख्याध्यापक व शिक्षक, कर्मचारीवृंद उपस्थित होते.