नाशिक – जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या स्थिर आहे. अनके दिवसांपासून बरे होण्याचे प्रमाण ९७.६२ टक्क्यांवर स्थिर आहे. नाशिक जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण अद्याप एक हजारापेक्षा कमी होत नसल्याने त्याचप्रमाणे निर्बंध शिथिल करून उद्योग व्यवसायांची वेळ वाढवून देण्यात आली असल्याने नागरिकांनी सतर्कता ठेवणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केले.
आज जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात झालेल्या कोरोना सद्यस्थितीबाबत आयोजित आढावा बैठकीत पालकमंत्री श्री. भुजबळ बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी सूरज मांढरे, महानगरपालिका आयुक्त कैलास जाधव, पोलीस आयुक्त दिपक पाण्डेय्, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, जिल्हा पोलीस अधिक्षक सचिन पाटील, जलसंपदा विभागाच्या अधीक्षक अभियंता अलका अहिरराव, अपर जिल्हाधिकारी दत्तप्रसाद नडे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक थोरात, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कपिल आहेर, जिल्हा पुरवठा अधिकारी डॉ. अरविंद नरसिकर, उपजिल्हाधिकारी वासंती माळी, महानगरपालिकेचे वैद्यकीय अधिकारी डॉ. बापूसाहेब नागरगोजे, वैद्यकीय अधिकारी डॉ. अनंत पवार, म्युकर मायकोसिस टास्क फोर्सचे डॉ. संजय गांगुर्डे, लसीकरण नोडल अधिकारी डॉ. राजेंद्र चौधरी आदी बैठकीस उपस्थित होते.
पालकमंत्री छगन भुजबळ म्हणाले की लसीकरणासाठी ज्या प्रमाणात लसी उपलब्ध होत आहेत, त्यानुसार लसीकरणाचे काम सुरू आहे. आरोग्य विभागातील कंत्राटी कर्मचारी यांना सरसकट कमी न करता आवश्यकतेनुसार कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या सेवेबाबत निर्णय घेण्यात यावा. लग्न समारंभामध्ये होणारी गर्दी नियंत्रणात ठेवणे आवश्यक असून अशा समारंभात मास्कचा वापर अनिवार्य करणे गरजेचे असून यासाठी आवश्यक ती कार्यवाही करण्यात यावी. तसेच जिल्ह्यात तयार करण्यात येणाऱ्या ऑक्सिजन प्रकल्पांचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्यात यावेत. विद्युत विभागाने सर्व ऑक्सिजन निर्मीती प्रकल्पांना प्रत्यक्ष भेट देवून तेथील सर्व संबंधित कामे पूर्ण करावीत, असे पालकमंत्री श्री. भुजबळ यांनी यावेळी सांगितले.
जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी जिल्ह्याची कोरोना सद्यस्थिती सादर करतांना सांगितले की, जिल्ह्यातील 24 ऑक्सिजन निर्मीती प्रकल्पांपैकी 3 प्रकल्प सुरू झाले आहेत. तसेच उर्वरित प्रकल्पांचे काम प्रगती पथावर असून 31 ऑगस्ट पर्यंत पूर्ण करण्यासाठी नियोजन करण्यात आले असून त्याबाबत कार्यवाही सुरू आहे. पहिल व दुसरा डोस घेतलेल्यांचे प्रमाण 28.08 टक्के झाले असून लसी उपलब्धतेनुसार लसीकरणाचे काम सुरू आहे, असे जिल्हाधिकरी सुरज मांढरे यांनी बैठकीत सांगितले.
पेयजलाचे प्राधान्याने नियोजन करावे
जिल्ह्यात पर्जन्यमानाचे अल्प प्रमाण पाहता पिण्याच्या पाण्याला प्रथम प्राधान्य देण्यात यावे. तसेच पाणी आराखड्यानुसार अभ्यास करून पाणी आवर्तन वाटपाबाबत योग्य नियोजन करण्यात यावे, अशा सूचना पालकमंत्री छगन भुजबळ यांनी जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. बैठकीच्या वेळी महानगरपालिका आयुक्त व जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी आपल्या कार्यक्षेत्रातील कामांची माहिती पालकमंत्री यांना सादर केली.