नाशिक – शहरात १५ ऑगस्टपासून ‘नो हेल्मेट, नो पेट्रोल ’ मोहीम राबवण्यात येणार आहे. नाशिक पोलीस आयुक्त दीपक पांडे यांनी दुचाकी चालकांना हेल्मेट घालण्याचे आवाहन केले आहे. दुचाकीवरील होणार्या अपघातांची संख्या, त्यात हेल्मेटची गरज लक्षात घेता आयुक्तांनी १५ ऑगस्ट पासून हा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. सर्व पेट्रोल पंप चालकांना सक्त सूचना देण्यात आल्या आहेत, की एखाद्या दुचाकीस्वाराने हेल्मेट घातले नसेल, तर त्याला इंधन देऊ नये. त्यामुळे पोलिस आयुक्तांच्या आवाहनाला बाईकस्वार कसे प्रतिसाद देणार, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.
हेल्मेटसक्ती लागू करूनही दुचाकी चालवताना अनेक नागरिक हेल्मेटचा वापर करतांना दिसत नाही. त्यामुळे नागरिकांचा हेल्मेट वापरण्याकडे कल वाढावा, यासाठी शहरात नो हेल्मेट नो पेट्रोल चा नियम लागू करण्याचा निर्णय पोलीस आयुक्तांनी घेतला आहे. या निर्णयाची अंमलबजावणी १५ ऑगस्टपासून केली जाणार आहे. दुचाकीचालकांनी हेल्मेट घातलेलं नसल्यास त्यांना पेट्रोलपंपावर पेट्रोल मिळणार नाही.
हेल्मेटअभावी ४०० मृत्यु
पोलीसांनी सादर केलेल्या एका आकडेवारीनूसार गेल्या पाच वर्षात ८२५ अपघात झाले. यात ४६७ दुचाकीस्वारांचा मृत्यु झाला यात ३९४ दुचाकीस्वारांचा केवळ हेल्मेट परिधान केलेले नसल्याने मृत्यु झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे ही मोहीम नाशिककरांच्या सुरक्षितेसाठी राबविली जात असून नागरीकांनी हेल्मेट वापरावे असे आवाहन पोलीस आयुक्त दिपक पाण्डेय यांनी केले आहे.