छगन भुजबळ यांच्या हस्ते ब्रेल लिपीतील भारतीय संविधाच्या आवृत्तीचे प्रकाशन

0

नाशिक – डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या संविधानात देशातील प्रत्येक घटकाला घटनेत संरक्षण देण्यात आलेले आहे. त्यामुळे या प्रत्येक घटकाला या घटनेत काय तरतूद करण्यात आली आहे याची माहिती असणे आवश्यक असून प्रत्येकाने ते जाणून देखील घेणे गरजेचे आहे. त्यानुसार देशातील सर्व अंध बांधवाना देखील या घटनेत काय लिहिलंय याची माहिती होण्यासाठी ‘दि बुद्धिस्ट असोसिएशन फॉर द ब्लाईंड’ व बार्टी या संस्थेच्या वतीने ‘ब्रेल लिपीत भारतीय संविधाचे रुपांतर केले. ही अतिशय महत्वाची बाब असून संविधाना सोबतच देशातील समाजसुधारकांचे साहित्य देखील ब्रेल लिपीतून तयार होणे आवश्यक आहे. त्यासाठी महाज्योती, बार्टी, सारथी या संस्थांच्या माध्यमातून सर्वोतोपरी सहकार्य शासन स्तरावरून करण्यात येईल असे प्रतिपादन राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केले.

 ‘दि बुद्धिस्ट असोसिएशन फॉर द ब्लाईंड’ नाशिक या संस्थेच्या वतीने तयार करण्यात आलेल्या ‘ब्रेल लिपीतील भारतीय संविधाच्या आवृत्ती’चे आज राज्याचे अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या वाढदिवसानिमित्ताने त्यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी मंत्री छगन भुजबळ यांच्या पत्नी मीनाताई भुजबळ, समीर भुजबळ मातोश्री हिराताई भुजबळ, माजी खासदार समीर भुजबळ, माजी आमदार पंकज भुजबळ,  डॉ. अनिरुद्ध धर्माधिकारी, ‘दि बुद्धिस्ट असोसिएशन फॉर द ब्लाईंड’ संघटनेचे अध्यक्ष सतीश निकम, उपाध्यक्ष राजाराम गायकवाड, सेक्रेटरी राजाराम गायकवाड, सहसचिव विकास शेजवळ, कोषाध्यक्ष संजय घोडेराव यांच्यासह संस्थेचे पदाधिकारी बाळासाहेब लोंढे, कारभारी बागुल, रमेश भूसाळे, भिमराव भुईगड, संगिता जाधव, उज्वला निकम, विनोद कांबळे, सुनील चव्हाण, रामदास जगताप, मनोज सुराडकर, महानंदा भुईगड यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी मंत्री छगन भुजबळ म्हणाले की, बार्टी संस्था व ‘दि बुद्धिस्ट असोसिएशन फॉर द ब्लाईंड’ संघटनेच्या वतीने अंध बांधवाना संविधान वाचता यावे यासाठी तिचे ब्रेल लिपीत रुपांतर करण्यात आले आहे. ब्रेल लिपीत तयार करण्यात आलेल्या या भारतीय संविधाच्या आवृत्तीचा केवळ राज्यातील नव्हते तर देशभरातील अंध बांधवाना डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेली घटना वाचता येणे शक्य होणार आहे. संघटनेच्या वतीने केलेलं हे डोळस काम अतिशय कौतुकास्पद असून याचा फायदा सर्व अंध बांधवाना होणार असल्याचे छगन भुजबळ यांनी सांगितले. तसेच छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा जोतीराव फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर या समाज सुधारकांचे ब्रेल लिपीतील साहित्य निर्माण होण्याची आवश्यकता आहे. देशातील प्रत्येकाला समाज सुधारकांची माहिती मिळणे आवश्यक आहे. त्यासाठी शासनाच्या वतीने सहकार्य करण्यात येऊन महाज्योती, बार्टी यासह शासनाच्या महामंडळाकडून पूर्तता करण्यास मदत करण्यात येईल असे आश्वासन त्यांनी उपस्थिताना दिले.

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.