शिक्षा की शिक्षा ?

बाल मानसशास्त्र व संगोपन लेख -२५

0

आदिती मोराणकर (शिक्षण विश्लेषक)

एखादं पॅरॅशूट विमानातून झेपावल्यानंतर अलगद, वातावरणाचा आनंद घेत घेत, आजूबाजूच्या गोष्टी न्याहाळत, हळूहळू जमिनीवर उतरणं अपेक्षित असतानाच जर पॅरॅशूटमध्ये काही बिघाड झाला आणि ते जमिनीवर आपटलं तर पॅरॅशूटमध्ये असलेल्या माणसाला जेवढी इजा होईल तितकंच नुकसान या दीड वर्षात आपल्या मुलांचं शाळेत न जाता आल्यानं झालेलं आहे.

“या चिमण्यांनो परत फिरा” अशी आर्त साद आता सगळीकडेच ऐकू येते आहे. शाळेतील सर्व शिक्षक आपल्या प्रिय विद्यार्थ्यांच्या भेटीसाठी आतुर झाले आहेत. सावळा विठ्ठल, लोभस रखुमाई, खोडकर कृष्ण, प्रेमळ राधा अशा वेगवेगळ्या रुपात त्यांच्यासमोर येणाऱ्या मुला-मुलींची शिक्षक डोळ्यात प्राण आणून वाट बघतायत. आपणही आपल्या चिमुकल्यांना, आपल्या काळजाच्या तुकड्याला आता शाळेत पाठवायला मनापासून तयार आहोत, ही एक अतिशय चांगली गोष्ट आहे.

मार्च २०२० , सगळं काही सुरळीत चालू असतांना कोरोनामुळे आपला आनंद लॉकडाऊनमध्ये गेला आणि आपलं ‘उत्सवी समाज जीवन’ एकाएकी क्वारंटाईन झालं. सुरुवातीला आपण सगळ्यांनी खूप सकारात्मकतेने याकडे पाहिलं. ‘अनेक वर्षात स्वतःच्या कुटुंबासाठी कधीही न काढता आलेला वेळ या निमित्ताने का होईना आपण कुटुंबासोबत घालवतो आहे’ असा विचार करून आपण सगळेच घरात सामोपचाराची भूमिका घेऊन सौजन्याने वागत होतो. मग मात्र लॉक डाऊनचा काळा जसा जसा वाढत गेला तसे तसे आपले मूळ रुप बाहेर यायला सुरुवात झाली. ‘नव्याचे नऊ दिवस’ ही म्हण आपण स्वतः वागण्यातून यथार्थ ठरवली. एका मर्यादेनंतर आपला धीर सुटायला लागला आणि ‘सौजन्याची ऐशी तैशी’ म्हणत आपले राग,लोभ, रुसवे-फुगवे हे आपण कुटुंबावर काढायला लागलो. कधीकधी आपण आपल्या वयाचा गैरफायदा सुद्धा घेतला. आपल्याला पाहिजे त्या गोष्टी आपण मोकळेपणाने बोलून दाखवल्या, व्यक्त केल्या पण हेच स्वातंत्र्य आपल्या घरातील लहान मुलांना मात्र नाकारलं गेलं. लहान मुलांनी जेव्हा जेव्हा त्यांचा ताण-तणाव व्यक्त करण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्या मुलांना ‘रागीट, संतापी, मूर्ख, बावळट, बेअक्कल, गाढव’ अशी लेबले लावली गेली.

“त्याच्याकडे काय लक्ष देता?”

“ती हल्ली अशीच वाह्यात बडबड करते”

“लॉक डाऊन लागल्यापासून याच्या डोक्यावर परिणाम झालाय”

“24 तास टीव्ही बघून दुसरं काय होणार आहे? मोबाईल दिला नाही म्हणून इतका संताप करायचा?”

“आमच्या लहानपणी नव्हतं असं काही, हल्लीची पिढीच बिघडली आहे.”

“आमच्या आईबापानी डोळे मोठे केले तरी आम्ही थरथर कापायचो, आता मात्र आम्हाला आमच्या मुलांच्या नाटकांना घाबरावं लागतं!”

“जरा कुठे यांच्या मनाविरूद्ध केलं तर थयथयाट ठरलेला, चार-चौघात लाज आणतो अगदी.” अशा तक्रारी गेल्या दोन वर्षात वाढलेल्या आहेत. पालकांशी बोलताना बऱ्याच वेळा या तक्रारी सतत कानावर पडतात. मला वाटतं याची दोन मुख्य कारणे आहेत. सगळ्यांचा धीर सुटला आहे. आपण आपल्या पद्धतीने व्यक्त होऊन मोकळे होत आहोत पण मुलांना मात्र व्यक्त व्हायची पद्धत माहिती नसल्याने त्यांच्या भावना दाबल्या जात आहेत. कसं व्यक्त व्हायचं हे अनुभवातून आपण शिकलो आहे आणि कसं व्यक्त झालं पाहिजे याचे अनुभव मुलं घेत आहेत.

‘व्यक्त न होता आल्याने मुलांची घुसमट होते आहे’ हे आपण समजून घ्यायला हवं.

त्यांना व्यक्त होण्याची योग्य जागा आहे त्यांची शाळा! जिथे त्यांना त्यांच्या वयाचे मित्र-मैत्रिणी भेटतात. त्यांचे शिक्षक प्रसंगी त्यांच्या वयाचं होऊन त्यांच्याशी संवाद साधतात.मुलांच्या अडचणी समजून घेतात आणि त्या अडचणींसाठी काही मार्गदर्शन करतात.

मुलांना सुद्धा आता शाळेचे वेध लागले आहेत. अभ्यास बंद आहे अशातली गोष्ट नाही, ऑनलाइन का होईना अभ्यास चालू आहे पण ती फक्त ‘मेंदूची भूक’ भागवत आहे. मुलांची ‘मानसिक भूक, भावनिक भूक, आंतरिक भुक’ वाढत चालली आहे. ही भूक भागवण्यासाठी मुलांनी आता शाळेत जायला हवं. मित्र-मैत्रिणींशी बोलायला हवं. शिक्षकांशी संवाद साधायला हवा. शाळेच्या वातावरणामध्ये असणारा उत्साह उरात भरून घ्यायला हवा.

मुलांना शाळेत पाठवण्याची तुमच्या मनाची तयारी आता झाली असेलच पण कुठेतरी मनाच्या कोपऱ्यात एक चिंता घर करून राहिली असेल. आपलं मूल खरंच बाहेरच्या वातावरणात जायला तयार आहे का? आपण बिनधास्तपणे आपल्या मुलांना घराबाहेर, शाळेमध्ये पाठवून पाच तास निश्चिंत राहू शकतो का? आपल्या मुलाला एखादी जरी शिंक आली किंवा थोडासा खोकला आला तर आपण घाबरून तर जाणार नाही ना? अशा अनेक गोष्टी आपल्याला शाळेत पाठवण्याचा विचारांपासून परावृत्त करत असतील. मात्र थोडासा रास्त विचार आपण करायला हवा. जसं आपण आपली नित्य कर्म चालू ठेवली आहेत, त्यातूनच आपल्याला उद्यासाठी काहीतरी नवीन जिद्द सापडते आहे, दुसऱ्या दिवशीसाठी काहीतरी एक आव्हान उभे राहत आहे, ज्यातून आपण रोज नव्याने तावून-सुलाखून बाहेर पडतो आहोत आणि रोज आपल्या व्यक्तिमत्त्वामध्ये एक सकारात्मक बदल घडत आहे हेच आपल्या मुलांसाठी देखील अतिशय गरजेचं आहे.

आपल्या पंखांखाली जपून ठेवून मुलांची प्रगती होणार नाही. तुम्ही जर निरीक्षण केलं तर तुमच्या एक गोष्ट लक्षात येईल की मुलं आता घरात रमायला लागलेली आहेत.फारसं बाहेर जाणं त्यांना पसंत नाही. इतर मुलांमध्ये जाऊन खेळणं त्यांना आवडत नाही. दिवसभर जरी मोबाईल दिला तरी मुलं मोबाईलला कंटाळत नाहीत. आजी आजोबांच्या हातात सतत विराजमान असणारा टीव्हीचा रिमोट हल्ली दिवसभर आपल्या मुलांच्या हातात असतो या गोष्टी मुलांच्या व्यक्तिमत्त्वासाठी अतिशय मारक आहेत. ‘जीवन हे 24 तास घरात बसून टीव्ही मोबाईल बघण्याइतकं सोपं आहे’ हा वेगळा विचार मुलांच्या मनात रुजतो आहे. आपल्या आयुष्यात करण्यासाठी कुठलीही गोष्ट बाकी नाही,आपल्याला कुठलीही अडचण आली तरी त्या अडचणीला आधी आपले आई-बाबा सामोरं जातात, अशा प्रकारचे विचार मुलांच्या प्रगतीसाठी अडथळा ठरत आहेत. ही अडथळ्यांची शर्यत जर पार करायची असेल तर मुलांना आता घराबाहेर पडू द्यायला हवं. बाहेरच्या जगात गेल्यानंतर किती स्तरावर आणि किती प्रकारची तडजोड करावी लागते याची जाणीव मुलांना व्हायला हवी.

आज कित्येक मुलं पहिलीतून दुसरीत गेलेत पण त्यांनी शाळेचे तोंडही बघितलेलं नाही. त्यांच्यासाठी आजही आपल्या घरात पलंगावर आरामशीर लोळून लेक्चर रुपी प्रवचन ऐकणं म्हणजे अभ्यास! तसंच ऑनलाईन असल्यामुळे शाळा परीक्षाही घेत नाहीत अर्थात आपण काय शिकलो आहोत याचं काही मूल्यमापन मुलांसाठी होतच नाही. ‘मार्कांच्या मागे लागा’ असं माझं अजिबात म्हणणं नाही पण ‘आपण नक्की किती पाण्यात आहोत आणि अजून आपल्याला किती आत जायचं आहे’ याचा अंदाज घेण्याकरिता काहीतरी मूल्यमापन होणे गरजेचं असतं. मुलांचे मूल्यमापन होत नसल्यामुळे मुलांना जिद्द, जिवाचा आटापिटा करणं , या प्रवृत्तीचं माहीत नाहीत. एखादी गोष्ट मिळवण्यासाठी धडपड करावी लागते, मेहनत करावी लागते, या गोष्टींचा मुलांना विसर पडायला लागला आहे.

आपण वस्तूंची आदळआपट केली की आपल्याला हवी ती वस्तू मिळते, आपण जर रडारड केली तर आपली आईच कान धरून आपल्याला ‘सॉरी बेटा” म्हणते हे मुलांना पक्क समजलेले आहे. त्यामुळे कुठलीही गोष्ट मिळवायची असेल तर आई वडिलांना गिल्ट देऊन, रडारड करून आपल्याला मिळते हा एक सिद्धांतच मुलांनी मांडला आहे. हा सिद्धांत मोडीत काढण्यासाठी मुलांना नवीन आव्हाने स्वीकारता यावे, नवीन गोष्टी शिकता याव्यात यासाठी आता त्यांना शाळेत जायची गरज आहे. शाळेत पाऊल ठेवल्यापासून आपलं म्हणणं कुठल्या शब्दात मांडायला हवं, कोणासमोर मांडायला हवं, कधी मांडायला हवं, कशासाठी मांडायला हवं, याचे निर्णय मुलांना स्वतः घ्यावे लागतात. त्यांनी घेतलेल्या निर्णयाचे परिणाम देखील त्यांनाच भोगावे लागतात. चुकतील एखाद्यावेळेस पण पुढच्या वेळेला ‘आपण आपलं म्हणणं योग्य शब्दात मांडलं मात्र व्यक्ती चुकली’ किंवा ‘आपलं म्हणणं योग्य व्यक्तीसमोर मांडलं मात्र शब्द चुकले’ यापैकी काहीतरी एक मुलांच्या लक्षात येईल आणि पुढच्या वेळेला ते जास्त तयारीने आव्हानाला सामोरे जातील.

मित्र-मैत्रिणींकडून एखादी गोष्ट हवी असेल तर ती प्रेमाने मागायची की दादागिरी करून मिळवायची, का खेचून घ्यायची हे मुलांनी स्वतः ठरवायचं असतं. हे ठरवतांना मुलं साहाजिक विचार करतात आणि त्या विचारांना दिशा देण्याचं काम हे आपलं असतं. आपल्याला आपलं मूल जसं वागायला हवं असेल तसे आदर्श त्यांच्यापुढे आपण ठेवायला हवेत. म्हणजे समोर एखादी परिस्थिती आल्यावर ‘आपण कसं वागायला हवं’ याचा विचार मुलांच्या मनात रुजलेला असतो. शाळेत गेल्यानंतर अनेक दालनं खुली होतात. अभ्यासाबरोबरच मुलांचा सामाजिक विकास होतो. समाजामध्ये वावरतांना ज्या प्रवृत्ती असतात त्यांची तोंडओळख शाळेतच मुलांना होते. सामाजिक विकासाबरोबरच भावनिक विकास देखील होतो. कुणासाठीतरी मदत करण्याची भावना मनात जन्म घेते. कुणीतरी मनापासून मित्र-मैत्रीण होऊन आवडतात. कुणासाठीतरी आपल्या डब्यातला शेवटचा घास राखून ठेवण्याची इच्छा होते. “माझ्या मैत्रिणीला तुझ्या हातचे पराठे आवडतात म्हणून आज डब्यात पराठे देशील?” या वाक्यांमधून मैत्रीची परिपक्वता दिसून येते.

या सगळ्या भावनांचा विकास होण्यासाठी मुलांनी शाळेत जायला हवं. हातातल्या बिस्किटाच्या पुड्यातून मित्र-मैत्रिणींना वाटून उरलं तर मी बिस्कीट खाईल ही शेअरिंगची भावना शाळेतच निर्माण होते. आपल्या शिक्षकांबद्दल प्रेम वाटत असतं,आदर वाटत असतो आणि त्यांची भीतीही वाटत असते. या संमिश्र भावनेला शाळेतच सामोरं जाता येतं. आपल्या अंगातले कलागुण दाखवण्यासाठी घरी येणारे पाहुणे पुरेसं नसतात, त्यासाठी शाळेमधलं स्नेहसंमेलनच हवं!

वर्ग चालू असतांना कधीतरी दुसर्‍या वर्गातल्या मुला-मुलींनी नाटकाच्या प्रॅक्टिसला बोलवण्यासाठी यावं, कधीतरी समूहगीताची पूर्वतयारी असावी, कधी वक्तृत्व स्पर्धेची तयारी असावी, चालू वर्गातून आपण बाहेर जातांना बाकी मुलामुलींनी “मज्जाय बाबा याची” अशा अर्थपूर्ण नजरेने आपल्याकडे बघावं हे अनुभव शाळेतच घेता येतात. सगळ्या कडू, गोड, आंबट, खारट आठवणींचा “गोपाळकाला” याच ज्ञानरुपी यमुनेच्या काठावर मिळू शकतो. गोपाळकाला ची गोष्ट तुम्हाला माहिती असेल. कृष्ण आणि त्याचे सखे यमुनेच्या काठावर खेळून दमल्यानंतर आपापल्या घरून आणलेले पदार्थ एकत्र करून त्याचा काला करीत असत आणि तो चविष्ट काला खायला मिळावा म्हणून सगळेच प्राणी, पक्षी आतुर असायचे. माझ्या वाचनात आलेल्या गोष्टीप्रमाणे देव सुद्धा चिमण्या पाखरांची रुपे घेऊन तो काला खाण्याकरता यमुनेच्या काठावर येत असत. ‘कृष्णानी खरकटे हात यमुनेत धुतले तर काही कण का होईना आपल्याला काला मिळेल’ या अपेक्षेने काही देव मत्स रुपात येत असत. मला वाटतं आज आपणही शाळेतल्या या गोपालकाल्याचे क्षण वेचण्यासाठी तितकेच आतुर असतो.

शाळेतल्या आठवणी, आपले शिक्षक, प्रसंगी त्यांनी दिलेल्या शिक्षा, शिक्षकांची एखादी खास लकब आपल्या आयुष्यात कायमचं घर करून जाते. एखादा नावडता विषयसुद्धा केवळ ‘आपल्याला ते शिक्षक आवडतात, त्यांची शिकवण्याची पद्धत आवडते’ म्हणून हमखास आवडायला लागतो, हि किती मजेशीर गोष्ट आहे. सुदैवाने आपल्या शिक्षणात कुठेही खंड पडला नाही. अव्याहतपणे आपण शाळेत जाण्याचं सुख अनुभवलं. मात्र आपल्या मुलांना गेली दीड-दोन वर्ष या सुखाला मुकावं लागलं. शाळेत न जाण्याचे दुष्परिणाम आपण बघितले. कोरोना काळापूर्वी क्वचित टीव्हीसमोर बसणार आपलं मूल किंवा मोबाईल कडे ढुंकूनही न बघणारं आपलं मूल आता टि व्ही समोरून हलत नाही आणि हातातुन मोबाईल सोडत नाही अशी अवस्था झाली आहे. एखादं पॅरॅशूट विमानातून झेपावल्यानंतर अलगद, वातावरणाचा आनंद घेत घेत, आजूबाजूच्या गोष्टी न्याहाळत, हळूहळू जमिनीवर उतरणं अपेक्षित असतानाच जर पॅरॅशूटमध्ये काही बिघाड झाला आणि ते जमिनीवर आपटलं तर पॅरॅशूटमध्ये असलेल्या माणसाला जेवढी इजा होईल तितकंच नुकसान या दीड वर्षात आपल्या मुलांचं झालेलं आहे.

आता हळूहळू आपल्यालाच मुलांच्या पुस्तकी शिक्षणाबरोबरच त्यांच्या जीवन कौशल्य प्रशिक्षण मार्गी लावावा लागणार आहे. यात शाळेची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. आपण पाऊल मागे न घेता, योग्य ती खबरदारी घेऊन आपल्या मुलांना शाळेत पाठवण्याची तयारी दाखवायला हवी. त्यांचा येणारा रोजचा दिवस त्यांना नवीन काहीतरी शिकवणारा असायला हवा आणि यासाठी आपणही रोज येणाऱ्या नव्या दिवसाला नवीन सकारात्मकता दाखवत मुलांना स्कूल बस मध्ये बसवून मोकळ हसून टाटा करायला हवा. ‘मास्क हा आता आपला अविभाज्य भाग आहे’ हे मुलांनी स्वीकारलं आहे. हात धुण्याची सवयदेखील आपल्या मुलांना बऱ्यापैकी लागली आहे आणि शाळेत गेल्यानंतरही शिक्षक तेवढे जागरूक आहेत. मुलांची तिथेही योग्य ती खबरदारी घेतली जाईलच यावर आपण विश्वास ठेवायला हवा.

शाळेने ‘छडी लागे छम छम’ ही भूमिका बदलून “विद्यार्थ्यांनो वेलकम!” ही भूमिका स्वीकारली आहे मग आपणही एक पाऊल पुढे टाकायला काय हरकत आहे? मुलांना घरात ठेवून “मराठीतली शिक्षा” द्यायची कि शाळेत पाठवून “हिंदीतली शिक्षा” द्यायची हे आता तुम्‍हीच ठरवा!

तुमच्या मुलांबद्दलचे प्रश्न तुम्ही ई-मेल किंवा व्हाट्सअप करून मला विचारू शकता. भेटूया मग पुढच्या सदरामध्ये एका नवीन विषयासह!

Aditi Morankar
आदिती मोराणकर (शिक्षण विश्लेषक)

आदिती मोराणकर (शिक्षण विश्लेषक)
संचालिका : ईस्कुलिंग व्हर्च्युअल डिजीस्मार्ट किंडरगार्टन.
eskooling2020@gmail.com | 8329932017 / 9326536524
https://www.instagram.com/theblooming.minds/

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.