परिपूर्ण आहाराचे महत्व  !

डॉ.राहुल रमेश चौधरी 

1

( डॉ.राहुल रमेश चौधरी ) गेल्या बऱ्याच महिन्यांपासून आपण गुरुवार व रविवार या दोन दिवशी आहार मालिका व आजार मालिका वर्णन बघत आहोत.या लेखांमध्ये सप्तधातु तीन दोष,तीन मल,पथ्यापथ्य,पचनसंस्था यांचे उल्लेख असतात.व याचे आपण थोडक्यात वर्णन देखील वाचतो.याबाबत आपण सविस्तर माहीती अद्याप आपण बघितलीच नाही ती आपण या लेखात बघणार आहोत. खरोखरीच आहाराचे आरोग्यावर कसे परिणाम होतात व का होतात याचे विस्तृत विवेचन या लेखात बघणार आहोत या सोबतच काय योग्य काय योग्य नाही याचे पण वर्णन बघणार आहोत.आणि आहार का महत्वाचा हे देखील बघणार आहोत.
आयुर्वेदात असे म्हटले आहे की…

न च आहार समं किंचीत भैषज्यं उपलभ्यते।
 
शक्यतेऽप्यन्नमात्रेणनर: कर्तुं निरामय:॥
 
भेषजेनोपपन्नोऽपि निराहारो शक्यते।
 
तस्माभ्दिषग्भिराहारो महाभैषज्यं उच्यते॥

म्हणजे काय?? तर आहारासारखे दुसरे औषध नाही.केवळ आहारानेच अनेक रोग बरे होवू शकतात.उत्तम औषधे देखील योग्य आहाराशिवाय आजार बरे करू शकत नाही.म्हणून आहाराला महान औषध म्हटले आहे.पण हा आहार सेवन कसा करायचा….यास काही नियम आहेत का? कसा आहार घेतला म्हणजे कसे दोष धातु तयार होतील व आजार कसे तयार होणार नाहीत ते बघूयात.

१.आहाराने दोष,धातु,मल तयार कसे होतात ?

मानवी शरीरात आयुर्वेद शास्त्राच्या दृष्टीकोनातून ३ दोष,७ धातु,३ मल असतात.यात ७ धातु  म्हणजेच रस,रक्त,मांस,मेद,अस्थि,मज्जा,शुक्र होय व आयुर्वेद शास्त्राच्या दृष्टीकोनातून ओज हा आठवा धातु मानला जातो.रस धातुस आधुनिक शास्त्रा नुसार lymph,रक्त धातु म्हणजे blood व त्याचे घटक,मांस म्हणजे flesh,मेद म्हणजे fat,अस्थि म्हणजेच bones,मज्जा म्हणजे bone marrow,शुक्र म्हणजे semen, ओज म्हणजे इम्युनीटी असे comparison साधारणत: केले जाते.याव्यतिरिक्त ३ मल म्हणजेच मल(पुरीष),मूत्र(लघवी),स्वेद(घाम) होय.ह्याची निर्मीती आहाराच्या योग्य पचनावर अवलंबून असते.सामान्यत: प्रकृती ही वाताची,पित्ताची,कफाची,वातपित्ताची,वातकफाची,कफपिताची,व तीन दोषाची अशी असते,प्रत्येक दोषाचे  प्रत्येकी ५-५ प्रकार कामानुसार पडतात.पचन देखील प्रकृती नुसार आहे.यात पित्तप्रकृतीत पचन लवकर होते,कफ प्रकृतीत वेळ लागतो,वात प्रकृतीत कधी लवकर कधी उषीरा पचन घडते.साधारणत: ३ ते साडे तीन तासांचा पचन काळ असतो.यात पहिल्या १ तासात दाताने चावून ,योग्य प्रमाणात लाळ मिसळून  खाल्लेले अन्न हे पोटात असते येथे कफ दोष निर्माण होतो.त्यामुळेच जेवणानंतर पहिल्या एक तासात जड वाटते,गुंगी,झोप येते.योग्य रीतीने तयार झालेला अन्नाचा गोळा हा पुढच्या १ तासाच्या पचनाकरीता लहान आतड्यात येतो,तेथे यकृताकडून पित्ताचा स्त्राव होतो व पित्त दोषाची निर्मीती होते.

योग्य तऱ्हेने पचवून झालेले अन्न पुढे उरलेल्या दीड तासाच्या पचनाकरीता मोठ्या आतड्यात सरकते तेथे पचवलेल्या अन्नाचे २ भाग होतात मल भाग व सार भाग .सार भाग शरीरात शोषला जातो व मल भाग हा लघवी,शौच,घामावाटे बाहेर टाकला जातो.येथे जो सार भाग असतो तो मोठ्या आतड्यातून सर्व शरीराचे पोषण होण्याकरीता शोषला जातो.वरील वर्णन केल्याप्रमाणे सप्तधातु चे पोषण याच सारभागाद्वारे होते.येथे संपूर्णा आहार रसादवारे सर्वात आधी रस धातुचे पोषण होते.असे होत होत क्रमाक्रमाने एक एक धातुचे पोषण होते व सर्वात शेवटी ओज म्हणजेच केलेल्या आहारानुरुप व्याधिक्षमत्वाची निर्मिती होते.

२.आहाराचे योग्य पचन होण्याकरीता आहार घेताना कोणत्या नियमांनी घेतला गेला पाहिजे ?

-आयुर्वेदात आहार घेण्यासाठी खालील नियम दिले आहेत…

”….उष्णं ,स्निग्धं ,मात्रावत, जीर्णे वीर्यविरुध्दम, इष्टे देशे,इष्टसर्वोपकरणं,नातिदृतं,नातिविलम्बितम,अजल्पन,अहसन,तन्मना भुञ्ञित, आत्मानमभिसमीक्ष्य सम्यक॥”
म्हणजे काय..? तर वरील पद्यात जेवण करत असताना काय नियम असावेत याचे वर्णन केले आहे.जेवण करताना ते गरम असावे,स्निग्ध म्हणजे त्यात तेल तुपाचा अंश असावा-कोरडे नसावे,मात्रावत म्हणजे प्रमाणात जेवढी भूक असेल तेवढेच किंबहुना त्यापेक्षा २ घास कमी असावे.जीर्णे म्हणजे आधीचे घेतलेले जेवण पूर्ण पचन झालेले असावे.वीर्यविरुध्दम म्हणजे विरुध्द आहार सेवन करु नये.इष्टे देशे व इष्ट सर्वोपकरणं म्हणजे योग्य ठिकाणी,योग्य सामग्रीने बनवलेले जेवण असावे,नातीदृतं म्हणजे घाईघाईत जेवण करू नये तसेच नातिविलम्बितम म्हणजे अतिशय हळूवार जेवन करू नये.अजल्पन-अहसन- तन्मना भुञ्ञित म्हणजे बडबड न करता,न हसता मन एकाग्र करून जेवावे.याशिवाय आत्मानमभिसमीक्ष्य म्हणजे आपल्याला स्वत:ला काय योग्य आहे काय योग्य नाही याचा सारासार विचार करून जिभेचे चोचले न पुरवता योग्य तेच खावे.

तुम्ही म्हणाल याचा काय उपयोग?? तर अश्या प्रकारे जेवण घेतल्याने भूक चांगली नियमीत लागते,लवकर पचन होते,अतिरिक्त कफाचा नाश व  योग्य प्रकारे पोट साफ होते.अग्नि म्हणजेच भूकेचा नाश होत नाही,अन्न पचून योग्य रीतीने मलभाग सारभाग तयार होणे,दोष-धातु-मल यांची दुष्टी होत नाही,शारिरिक बलाची वाढ होते,चेहऱ्याचा शरीराचा वर्ण उजळतो,तसेच इतर अनेक प्रकारच्या शारिरिक तक्रारी दूर होतात.

३.वरील आहार सेवना करिता जे नियम आहेत ते कशावर आधारीत आहेत  ते आपण पाहूयात ?

-आहार नियम हे जेवणावर उकळणे,भाजणे,उकडणे इत्यादी संस्कार जेवणावर केले जाणे,तसेच संयोग म्हणजे एकत्रीकरण म्हणजे काही पदार्थ एकत्र करणे योग्य असतात तर काही एकत्र करणे अयोग्य असते अश्या एकत्र करणे न करणे यावर, याशिवाय राशी म्हणजे काही पदार्थ एकत्र सेवन करणे किंवा वेगवेगळे सेवन करणे  यावर ,याशिवाय देश-काल म्हणजेच जेवण कोणत्या जमिनीवर कोणत्या ऋतुत कोणत्या काळात उपजले आहे यावर,याशिवाय उपयोग संस्था म्हणजेच या जेवणाचे सेवन करण्याचे नियम बनवले जातात यास संस्था म्हणतात यावर तसेच उपयोकता म्हणजेच जो जेवन सेवन करतो तो- हे सगले मिळून आहार विधी विशेषायतन म्ह्टले जाते.

याचा एकत्रीत अर्थ म्हणजे स्वयंपाक जेथे तयार होतो ती जागा ,त्यावर जे संस्कार संयोग केले जातात ते इत्यादींना एकत्रीत आहार सेवन नियम अवलंबून घटक म्हटले जाते.

४.जो आहार म्हणजेच जेवण तुम्ही तयार करतात त्यावर कोणकोणते घटक परिणाम करतात ?

-जो आहार आपण घेतो त्यावर परिणाम करणाऱ्या घटकांना आहार परिणामकर घटक म्हणतात..ते घटक म्हणजे उष्णता,वायु,जल,स्नेह,काल,समयोग या घटकांना आहार परिणामकर घटक म्हणतात.हे घटक जेवणाचा योग्य ते काळात  पचन करून रसादी ७ धातुंना निर्माण करण्याचे काम करतात.

यात उष्णता अन्नाचे योग्य ते पचन घडवून आणते.वायु अन्नाचे योग्य रीतीने विभाजन करते,क्लेद म्हणजेच कफ पचनास येणाऱ्या अन्नाचा योग्य रीतीने गोळा बनवते,स्नेह म्हणजे स्निग्धतेचा अंश यात मऊपणा आणते. काल पचनाची क्रिया ठरवते  व समयोग म्हणजे पाकास प्राप्त धातुंना समान अवस्था देते.

५.शरीराची वाढ होण्यासाठी कोणकोणते घटक कारणीभूत ठरतात?

अ) कालयोग- म्हणजे वयाच्या अवस्थेनुसार शरीरात वाढ होणे

ब)आहार सौष्ठव-म्हणजे घेतले जाणारे जेवण उत्कृष्ट प्रतीचे असणे

क)अविघात-म्हणजे शरीराला हानी पोहचवणारे अपथ्याचा त्याग करणे ते पथ्य जेवणातले असो वा कामातले

ड)स्वभाव संसिध्द-काही वेळा मुळातच माणसाची शरीर बलवान असते.

६.शरीराचे बल वाढण्यास कारणीभूत घटक कोणते ?

अ) योग्य आहार व्यायाम असणे

ब) नेहमी मनाने प्रसन्न असणे

क) मनाची अवस्था उत्तम असणे,मन उत्तम तर शरीर उत्तम

ड) सतत योग्य अश्या अन्नाचे सेवनाचा व व्यायामाचे अभ्यास असणे

ई) बलवान काळात-कुळात-ऋतुत –देशात जन्म घेणे आदी

७.वरील सर्व गोष्टींचा वाचकांपर्यत पोहचवण्याचे उद्देश काय ?

रुग्ण अनेक प्रकारच्या समस्या घेवून येत असतात,त्यात त्यांना पथ्य सांगितले जाते परंतु रुग्ण याकडे लक्ष न देता कंटाळून आधुनिक शास्त्राकडे उपचार घेतात व नंतर पुन्हा आयुर्वेदाकडे वळतात,आपल्या आहारावरचा आपली प्रकृती,सत्व,सात्म्य,सारता,संहनन,आहारशक्ती,व्यायामशक्ती अवलंबून असते हे सर्व दोष धातु मल योग्य स्थितीत असेल तरच शक्य असते हे सर्व योग्य पध्दतीने तयार होण्याकरीता वरील सर्व गोष्तींचे पालन होणे गरजेचे आहे याकरीता आहाराचे लेख लहान सहान का असेना आपल्यापर्यंत पोहचवले जातात.धन्यवाद.

 

संपर्क- औदुंबर आयुर्वेद चिकित्सालय

मोबाईल -९०९६११५९३०

Dr.-Rahul-Ramesh-Chaudhari
डॉ.राहुल रमेश चौधरी

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

1 Comment
  1. Rajendra Kulkarni says

    Thanks

कॉपी करू नका.