भरकटलेला ‘देवमाणूस’ : टीआरपीच्या शर्यतीत हरवलेला केंद्रबिंदू?

अभय ओझरकर

0

अभय ओझरकर

(Devmanus Marathi Serial) झी मराठीवरील देवमाणूस ही मालिका प्रसारित होऊ लागली, तेव्हा प्रेक्षकांना एक वेगळी, थरारक आणि मनोवैज्ञानिक कथा पाहायला मिळेल, अशी अपेक्षा होती. छोट्या गावातील साधा भासणारा पण आतून काळा असलेला एक माणूस, त्याचे दुहेरी आयुष्य, आणि हळूहळू उलगडत जाणारे रहस्य – ही संकल्पना मराठी मालिकांमध्ये तुलनेने नवी होती. त्यामुळेच पहिल्याच काही भागांत देवमाणूस प्रेक्षकांच्या मनात घर करून गेला आणि टीआरपीच्या शिखरावर पोहोचला.

मुख्य भूमिकेत असलेले किरण गायकवाड ऊर्फ गोपाळ, यांनी साकारलेली व्यक्तिरेखा प्रेक्षकांना अक्षरशः खिळवून ठेवणारी ठरली. साधेपणा, शांत चेहरा, मितभाषी स्वभाव आणि आत दडलेला निर्दयी खुनी – ही सगळी मिश्रणं त्यांनी अत्यंत समर्थपणे साकारली. गोपाळ हा फक्त एक व्यक्तिरेखा न राहता, प्रेक्षकांच्या मनात भीती, कुतूहल आणि तिरस्कार या सगळ्या भावना एकत्र निर्माण करणारा ‘देवमाणूस’ बनला.

मात्र, जसजसे भाग पुढे सरकू लागले, तसतशी एक भावना अनेक रसिकांच्या मनात रुजू लागली –ही मालिका नेमकी कुणाभोवती फिरते आहे? देवमाणसाभोवती की इतर पात्रांच्या भरकटलेल्या गोष्टींभोवती?

गोपाळचा फोकस कमी होतो आहे का?(Devmanus Marathi Serial)

सुरुवातीला कथानकाचा केंद्रबिंदू स्पष्ट होता – गोपाळ. त्याची मानसिकता, त्याचे अपराध, त्याची हुशारी आणि पोलिसांपासून स्वतःला वाचवण्याची त्याची कला. प्रत्येक भागात प्रेक्षकांना पुढे काय होणार याची उत्कंठा लागायची.

मात्र अलीकडे अनेक रसिकांनी व्यक्त केलेली भावना अशी आहे की,
मुख्य नायक असलेला किरण गायकवाड (गोपाळ) कुठेतरी ‘साईड ट्रॅक’ केला जातो आहे का?

नवीन पात्रांची भर, उपकथानकांचा मारा, अचानक गायब होणारी आणि अचानक संपणारी पात्रं – यामध्ये मूळ देवमाणूस कुठेतरी मागे पडतो आहे असे वाटू लागले आहे. टीआरपी वाढवण्यासाठी कथानक लांबवले जात असताना, मूळ सूत्रच सैल होत आहे का, हा प्रश्न रसिकांना पडणे साहजिक आहे.

लाली (सोनम म्हसवेकर) : ताकदवान अभिनय, पण अतिरंजित फोकस? (Devmanus Marathi Serial)

अभिनेत्री सोनम म्हसवेकर हिने साकारलेली लाली ही व्यक्तिरेखा नक्कीच लक्षवेधी आहे. तिचा अभिनय प्रभावी आहे, यात शंका नाही. तिच्या व्यक्तिरेखेत गूढता आहे, आक्रमकता आहे आणि एक वेगळा रंग आहे.

मात्र रसिकांच्या मनात एक प्रश्न निर्माण होतो –
लालीला पुढे आणताना, देवमाणूस मागे तर पडत नाही ना?

कथानक असे वळण घेत आहे की, गोपाळपेक्षा लालीच मुख्य विलन म्हणून पुढे येते आहे का, असा संशय काही प्रेक्षकांनी व्यक्त केला आहे. ही मालिका ‘देवमाणूस’ नावाची असताना, देवमाणसावरील फोकस हलणे हे कथेसाठी धोक्याचे ठरू शकते.

मिलिंद शिंदे (जामकर) : पोलिसी खाक्याची अपेक्षा अपूर्ण

मिलिंद शिंदे हे अत्यंत ताकदीचे अभिनेते आहेत. त्यांच्या अभिनयावर कुणालाही शंका नाही. जामकर ही व्यक्तिरेखा सुरुवातीला अत्यंत प्रभावी वाटली. विशेषतः सख्खी बहीण गायब झाल्यानंतर त्यांच्यात दिसणारी अस्वस्थता, राग आणि वेदना प्रेक्षकांच्या मनाला भिडणारी होती.

मात्र यानंतर रसिकांना अपेक्षा होती ती एक गोष्ट पाहण्याची –
पोलिसी तपासाचा धडाका.

एक अनुभवी पोलीस अधिकारी म्हणून जामकर यांनी संपूर्ण गाव पिंजून काढणे, संशयितांच्या मुसक्या आवळणे, गोपाळवर दबाव वाढवणे – हे सगळे अधिक ठळकपणे दाखवले जाईल, अशी अपेक्षा होती. पण ती अपेक्षा काही अंशी अपूर्ण राहिली आहे, असे अनेक रसिकांचे मत आहे.

गायब होणारी पात्रं आणि न उलगडलेले प्रश्न

देवमाणूस मधील सर्वात मोठी आणि सतत बोचणारी खंत म्हणजे –अचानक उगवणारी पात्रं आणि त्याहून अधिक अचानकपणे गायब होणारी त्यांची अस्तित्वं, ज्यांची उकल कधीच होत नाही.

माधुरी अचानक गायब होते.मॅक आणि त्याची बायको कुठल्याही निष्कर्षाविना कथेतून नाहीसे होतात.

गंगा नावाचं पात्र खास गोपाळचा शोध घेण्यासाठी गावात दाखल होतं. अपरिचित गावात ती थेट एका रिक्षावाल्याशी ओळख करून घेते, त्याच्या घरात त्याच्या आईसोबत राहायला लागते — हीच गोष्ट आधीच अनेक प्रश्न निर्माण करते. तरीही गंगाने आपली भूमिका प्रामाणिकपणे आणि प्रभावीपणे साकारली. गोपाळविषयी तिने ठोस पुरावे गोळा केले, त्याच्या काळ्या कृत्यांपर्यंत ती पोहोचली. पण गोपाळाला सुगावा लागताच, त्या संपूर्ण तपासाचा शेवट एकाच फटक्यात केला जातो — गंगाचाही अंत.

पुजाऱ्याच्या बायकोचा खून होतो, पण त्याचे पडसाद ना गावात उमटतात, ना तपासात, ना कथानकात.
शामल अनेक भाग गायब, अचानक एका भागात दर्शन आणि लगेचच कथेतून कायमची एक्झिट.
आता आर्याचंही गायब होणं — आणि प्रेक्षकांनी पुन्हा गृहीत धरायचं की हेही असंच विसरून जायचं.

आता तर सिरीयलचा एक ठराविक फॉर्म्युलाच बनतो आहे —
नवं स्त्रीपात्र आलं की त्याचा शेवट ठरलेलाच.
ते मुख्य पात्र गोपाळ असो, किंवा गोपाळला साईड ट्रॅक करून पुढे आणलेली लाली असो — स्त्रीपात्रं फक्त वापरून, कथेला पुढे ढकलून, आणि मग संपवून टाकायची.

हा थरार नाही, ही रहस्यकथा नाही —
हा कथानकाचा आळशीपणा आहे.
आणि प्रेक्षक इतके गृहीत धरले जात असतील की त्यांनी प्रश्न विचारूच नयेत, तर तीच देवमाणूस मालिकेची खरी शोकांतिका ठरते
हे सगळं प्रेक्षकांना समजतं, पण ते मूळ कथानकाशी घट्ट जोडून उलगडण्याची गरज आहे. अन्यथा ही सगळी प्रकरणं फक्त ‘फिलर’ वाटू लागतात, आणि मुख्य कथा भरकटते.

सरू आजी : मालिकेचा आत्मा

या सगळ्यात एक गोष्ट मात्र निर्विवाद आहे –
सरू आजी म्हणजे मालिकेचा आत्मा.

त्यांची भूमिका इतकी आपुलकीची आहे की, प्रत्येक प्रेक्षकाला आपल्या आजीची आठवण होते. जुन्या म्हणी, साधे पण अर्थपूर्ण संवाद, आणि अनुभवातून आलेली शहाणपणाची भाषा – यासाठी स्क्रिप्ट रायटर आणि दिग्दर्शक दोघांनाही शंभरपैकी शंभर गुण द्यायला हवेत.

फिलर रोल्स आणि सहाय्यक कलाकार

रिक्षावाला, सलूनवाला, पत्रकार – हे सगळे फिलर रोल्स असले तरी त्यांनी आपापली कामं चोख बजावली आहेत. पोलिस हवालदार सुधाकर यांनी पत्नी शामलच्या हत्येनंतर दाखवलेला अभिनय विशेष उल्लेखनीय आहे.

माधव अभ्यंकर : बुद्धिमान व्यक्तिरेखेची अर्धवट मांडणी?

माधव अभ्यंकर हे अत्यंत ताकदीचे अभिनेते आहेत. त्यांची व्यक्तिरेखा हुशार, चाणाक्ष आणि निरीक्षणशील म्हणून रंगवली आहे. मात्र प्रश्न तोच –
या सगळ्या बुद्धिमत्तेचा उपयोग मूळ देवमाणसाच्या उकलसाठी किती होतो आहे?

घरगुती व्यक्तिरेखा : रंजी, फुलाबाई आणि ऋतिक

रंजीचा कामचुकारपणा आणि सासू म्हणून मिरवलेला तोरा अनेक सासुरवाशींना ओळखीचा वाटेल. फुलाबाईमधील प्रेमळ, काळजीवाहू सासू अनेक रसिकांच्या मनाला भिडते. ऋतिकसारखा खोडकर नातू घरातलाच वाटतो. मात्र घरात टेलर असूनही त्याची पँट इतक्या भागांत खाली का सरकत होती, हा प्रश्न मात्र अनुत्तरित आहे!

नरक्या हडळीचा उत्सव आणि विसरलेले मर्डर

मालिका वाढवण्यासाठी मधेच दाखवलेला नरक्या हळदीचा उत्सव, त्यात झालेले दोन मर्डर, आणि त्यानंतर त्याचे परिणाम कुठेच न दिसणे – हे सगळं कथानकाच्या गंभीरतेला धक्का देणारं ठरतं.

टीआरपी विरुद्ध कथा : नेमकं काय जिंकणार?

टीआरपीसाठी प्रेक्षकांना सतत वाट पाहायला लावणं, प्रत्येक नवीन स्त्री पात्राचा शेवट मृत्यूत होणारच असा ठरलेला फॉर्म्युला, आणि मूळ कथानक लांबवणं – याचा गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे.

देवमाणूस भरकटतो आहे का?

सर्व कलाकार ताकदीचे आहेत. अभिनयात कुठेही कमतरता नाही. प्रश्न आहे तो फोकसचा.
देवमाणूस या नावाच्या मालिकेत देवमाणसाचाच फोकस हलतो आहे का, असा प्रश्न रसिकांना पडतो, तर त्यात काहीही वावगे नाही.

म्हणूनच शेवटी परत एकदा वाटतं –
जर उद्या या मालिकेला “भरकटलेला देवमाणूस” असं शीर्षक दिलं गेलं, तर रसिकांना आश्चर्य वाटणार नाही.

टीप :वरील लेख हा कोणत्याही कलाकार, लेखक किंवा दिग्दर्शकावर वैयक्तिक टीका नसून, रसिक प्रेक्षकांच्या भावना आणि अपेक्षा यांचे प्रतिनिधित्व करणारा परीक्षणात्मक लेख आहे. मालिकेवरील प्रेम आणि अपेक्षा याच भावनेतून हा लेख लिहिला आहे.

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!