इराण–इस्रायल युद्धाची धास्ती! दुबई सोडून कुठे पळत आहेत जगातील अब्जाधीश?
युरोपियन एअरलाईन्सचे उड्डाणे रद्द

नवी दिल्ली, दि, ९ मार्च २०२६ –Global Crisis News मध्य पूर्वेत सुरू असलेल्या इराण–इस्रायल संघर्षामुळे आता जागतिक स्तरावर मोठी अस्वस्थता निर्माण झाली आहे. जगातील सर्वात सुरक्षित आणि श्रीमंतांचे आवडते ठिकाण मानल्या जाणाऱ्या दुबईमध्येही आता भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे अनेक अब्जाधीश आणि श्रीमंत कुटुंबांनी दुबई सोडून सुरक्षित देशांकडे स्थलांतर करण्यास सुरुवात केली आहे.
दुबईला अनेक वर्षांपासून जगातील श्रीमंत लोकांचे “सेकंड होम” मानले जाते. करसवलती,आलिशान जीवनशैली आणि सुरक्षित वातावरण यामुळे अनेक अब्जाधीशांनी येथे घरे, गुंतवणूक आणि व्यवसाय उभे केले आहेत. मात्र सध्याच्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर दुबईही सुरक्षित राहील की नाही, अशी भीती निर्माण झाली आहे. परिणामी, श्रीमंत लोकांनी आपली कुटुंबे आणि मालमत्ता हलवण्याचा निर्णय घेतला आहे.
मस्कत बनले श्रीमंतांचे ‘एस्केप रूट’(Global Crisis News)
आंतरराष्ट्रीय आर्थिक वृत्तपत्र Financial Times च्या अहवालानुसार, ओमानची राजधानी मस्कत हे श्रीमंत लोकांसाठी महत्त्वाचे ‘एस्केप पॉइंट’ बनले आहे. मस्कत आंतरराष्ट्रीय विमानतळावरून दररोज सुमारे ३० चार्टर आणि प्रायव्हेट जेट उड्डाण करत आहेत.
प्रत्येक विमानामध्ये किमान ८ प्रवासी असतात आणि बहुतेक उड्डाणे तुर्कीयेतील इस्तंबुल आणि इजिप्तची राजधानी कैरो येथे जात आहेत. तेथून पुढे हे लोक व्यावसायिक विमानसेवा वापरून लंडनसह इतर युरोपियन शहरांकडे रवाना होत आहेत.
१००० श्रीमंत कुटुंबांनी सोडले दुबई(Global Crisis News)
Arabian Business च्या माहितीनुसार, इराणच्या हल्ल्यानंतर आतापर्यंत सुमारे १००० श्रीमंत कुटुंबांनी दुबई सोडले आहे. दुबईमध्ये जवळपास ८१,२०० अब्जाधीश राहत असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे सुरू झालेला हा पलायनाचा प्रवाह मोठा मानला जात आहे.
FlightRadar24 च्या आकडेवारीनुसार गेल्या एका आठवड्यात मस्कत विमानतळावरून उड्डाण करणाऱ्या विमानांपैकी जवळपास एक तृतीयांश फ्लाईट चार्टर किंवा प्रायव्हेट जेट होत्या. अचानक वाढलेल्या या वाहतुकीमुळे विमानतळ प्रशासनालाही तणावाचा सामना करावा लागत आहे.
मस्कत विमानतळावर गर्दीचा ताण
मस्कत आंतरराष्ट्रीय विमानतळावर वाढलेल्या गर्दीमुळे प्रशासनाने काही कठोर निर्णय घेतले आहेत. प्रायव्हेट जेट ऑपरेटरना अतिरिक्त उड्डाणे पाठवण्यास तात्पुरती बंदी घालण्यात आली आहे.विमानतळ प्रशासनाने ई-मेलद्वारे स्पष्ट केले आहे की सध्या नियोजित कमर्शियल फ्लाईटना प्राधान्य दिले जाईल. जे उड्डाण वेळापत्रकात नाहीत त्यांचे स्लॉट रद्द केले जाऊ शकतात.तथापि, विविध देशांच्या दुतावासांकडून चालवल्या जाणाऱ्या रिपॅट्रिएशन फ्लाईटना विशेष परवानगी दिली जाऊ शकते. मात्र त्यासाठी आधी मंजुरी घेणे बंधनकारक आहे.
प्रायव्हेट जेटची प्रचंड किंमत
मस्कतहून जाणाऱ्या प्रायव्हेट फ्लाईटमध्ये एका सीटची किंमत २० हजार डॉलरपेक्षा जास्त असल्याचे सांगितले जाते. तरीही अनेक श्रीमंत लोक ही किंमत मोजून सुरक्षित देशांकडे रवाना होत आहेत.या प्रवासात अनेक लोक आपल्या पाळीव प्राण्यांसह निघाले असल्याची माहितीही समोर आली आहे. काही चार्टर कंपन्या सौदी अरेबियातील रियाद आणि दमाम विमानतळांचाही वापर करत आहेत.
हजारो प्रवासी अजूनही अडकले
दुसरीकडे, मध्यपूर्वेत सुरू असलेल्या तणावामुळे हजारो सामान्य प्रवासी विविध देशांच्या विमानतळांवर अडकून पडले आहेत. काही प्रवासी आशियातून युरोपात जाण्यासाठी अमेरिकेच्या मार्गाने प्रवास करत आहेत.या परिस्थितीत Air India ने न्यूयॉर्क, लंडन, फ्रँकफर्ट, पॅरिस, अॅमस्टरडॅम, झुरिच, कोलंबो आणि माले या शहरांसाठी अतिरिक्त उड्डाणांची घोषणा केली आहे.
दुबई विमानतळाची परिस्थिती
दुबई विमानतळाने काही दिवसांपूर्वी मर्यादित उड्डाणांना परवानगी दिली होती. मात्र सुरक्षा कारणांमुळे शनिवारी पुन्हा काही काळासाठी विमानतळ बंद करावा लागला.सध्या दुबईतून उड्डाण करणारी विमाने दक्षिणेकडील अरुंद एअर कॉरिडॉर वापरत आहेत. या मार्गावर सुरक्षा देण्यासाठी यूएईचे लढाऊ जेट विमान सतत गस्त घालत आहेत.दरम्यान कतारने काही काळासाठी आपली हवाई हद्द उघडली होती, मात्र वाढत्या तणावामुळे ती पुन्हा बंद करण्यात आली आहे.
युरोपियन एअरलाईन्सचे उड्डाणे रद्द
सुरक्षेच्या कारणास्तव अनेक मोठ्या युरोपियन विमान कंपन्यांनी आपली उड्डाणे रद्द किंवा दुसऱ्या मार्गाने वळवली आहेत. British Airways, Air France आणि Virgin Atlantic यांसारख्या कंपन्यांनी मध्यपूर्वेकडे जाणाऱ्या काही फ्लाईट थांबवल्या आहेत.

