“खरात कनेक्शन महागात! रुपाली चाकणकरांचा राजीनामा

अशोक खरात प्रकरणामुळे महिला आयोगात खळबळ; उच्चस्तरीय चौकशीची मागणी

0

मुंबई,दि, २० मार्च २०२६ – Rupali Chakankar Resignation नाशिकमधील स्वयंघोषित अंकशास्त्रज्ञ अशोक खरात याच्या विरोधातील बलात्काराच्या गंभीर आरोपांमुळे राज्यभरात खळबळ उडाली असताना, या प्रकरणाचे राजकीय पडसादही तीव्र स्वरूपात उमटले आहेत. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी अखेर आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.

विरोधकांचा दबाव आणि सरकारची भूमिका ( Rupali Chakankar Resignation)
अशोक खरातसोबतचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर विरोधकांनी चाकणकरांवर जोरदार टीका केली. विशेषतः पाद्यपूजा करतानाचे दृश्य समोर आल्यानंतर या प्रकरणाला अधिकच वादळी वळण मिळाले. महिला आयोगाच्या प्रमुख पदावर असताना अशा व्यक्तीशी संबंध असल्याचा आरोप करत त्यांचा राजीनामा मागण्यात आला.या वाढत्या दबावाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी चाकणकरांना पद सोडण्याचा सल्ला दिल्याची माहिती समोर आली. त्यानंतर त्यांनी आपला राजीनामा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडे सुपूर्द केला.

राजीनाम्यानंतरही चौकशीची मागणी
राजीनामा दिल्यानंतरही चाकणकरांनी या प्रकरणावर आपली भूमिका स्पष्ट करत, पोलीस महासंचालक सदानंद दाते यांची भेट घेतली. त्यांनी महिला आयोगाच्या वतीने पत्र देत अशोक खरात प्रकरणाची सखोल आणि निष्पक्ष चौकशी व्हावी, अशी मागणी केली आहे.“या प्रकरणातील सत्य बाहेर यावे आणि दोषींवर कठोर कारवाई व्हावी,” असे त्यांनी स्पष्ट केले.

मुख्यमंत्र्यांची भेट – निर्णयापूर्वीची हालचाल
राजीनाम्यापूर्वी चाकणकरांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याचा दावा केला आहे. या भेटीत त्यांनी प्रकरणाची माहिती देत तपास जलद गतीने करण्याची मागणी केली होती. या बैठकीनंतरच त्यांच्या राजीनाम्याचा निर्णय अंतिम झाल्याचे मानले जात आहे.

प्रफुल पटेलांचा इशारा
या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना प्रफुल पटेल यांनीही कठोर भूमिका घेतली.“या प्रकरणात जे कोणी दोषी आढळतील त्यांच्यावर तातडीने कारवाई होईल. राजकीय व्यक्तींची नावे समोर आली तरीही कुणालाही वाचवले जाणार नाही,” असे त्यांनी स्पष्ट केले.

व्हायरल व्हिडिओंनी वाढवला वाद
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओंमध्ये चाकणकर या अशोक खरातची पाद्यपूजा करताना तसेच त्याला विठ्ठलाची उपमा देताना दिसत आहेत. यामुळे त्यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले.तसेच, त्या खरातच्या ट्रस्टशी संबंधित असल्याची माहितीही समोर आली आहे. यामुळे या प्रकरणात त्यांच्यावर राजकीय संरक्षण दिल्याचे आरोप झाले.

राजकीय आणि सामाजिक परिणाम
या संपूर्ण प्रकरणामुळे केवळ महिला आयोगाची प्रतिमा धुळीस मिळालेली नाही, तर राज्यातील राजकारणातही मोठी खळबळ उडाली आहे. महिला सुरक्षेच्या प्रश्नावर गंभीर चर्चा सुरू झाली असून, अशा प्रकरणांमध्ये जबाबदारीची जाणीव अधिक बळकट करण्याची गरज अधोरेखित झाली आहे.

 

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!