नाशिक दुहेरी हत्याकांडाने हादरलं !पत्नी आणि मुलाची निर्घृण हत्या
हत्येनंतर स्वतःही संपवण्याचा प्रयत्न,शहरात खळबळ
नाशिक | २० जुलै २०२६- Nashik Crime News नाशिक शहर पुन्हा एकदा एका धक्कादायक दुहेरी हत्याकांडाने हादरले आहे. एका व्यक्तीने आपल्या पत्नीची आणि अल्पवयीन मुलाची अत्यंत निर्घृणपणे हत्या केल्यानंतर स्वतः विषारी औषध सेवन करून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे परिसरात भीती आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.
प्राथमिक माहितीनुसार, आरोपी पतीने ब्लेडसदृश धारदार वस्तूने पत्नीवर आणि मुलाच्या गळ्यावर वार करून दोघांची हत्या केली. हत्येनंतर त्याने विषारी औषध सेवन करून स्वतःचेही जीवन संपवण्याचा प्रयत्न केला. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी आणि पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली.
गंभीर अवस्थेतील आरोपीला तात्काळ नाशिकरोड येथील बिटको रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. डॉक्टरांच्या माहितीनुसार त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगितले जात आहे.
घटनेनंतर नाशिकरोड पोलिसांनी संपूर्ण परिसराचा ताबा घेत पंचनामा सुरू केला. मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आले आहेत. घटनास्थळावरून महत्त्वाचे पुरावे गोळा करण्यात येत असून फॉरेन्सिक पथकाचीही मदत घेण्यात आली आहे.
या दुहेरी हत्येमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. कौटुंबिक वाद, मानसिक तणाव किंवा अन्य कोणते कारण होते का, याचा सर्व बाजूंनी तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. आरोपी शुद्धीवर आल्यानंतर त्याची चौकशी करण्यात येणार असून त्यातून या भीषण घटनेमागील सत्य समोर येण्याची शक्यता आहे.घटनेची माहिती मिळताच नाशिक रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे यांच्यासह गुन्हे शोध पथकाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली असून पुढील तपास सुरू आहे.
या घटनेमुळे नाशिकमध्ये पुन्हा एकदा कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला असून नागरिकांनी या प्रकरणाचा सखोल तपास करून दोषीवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
(Nashik Crime News) टीप: पोलिसांचा तपास सुरू असल्याने हत्येमागील कारणांबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. पुढील तपासानुसार अधिक माहिती स्पष्ट होण्याची शक्यता आहे.



