स्मार्ट सिटीच्या ड्रेनेज कामांची उच्चस्तरीय चौकशी करा :राजेंद्र बागुल

0

नाशिक दि,१४ ऑगस्ट २०२६-  Nashik News Today नाशिक शहरात स्मार्ट सिटी कंपनीमार्फत करण्यात आलेल्या ड्रेनेजच्या कामांच्या दर्जाबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाले असून, या संपूर्ण कामांची तांत्रिक व प्रशासकीय चौकशी करण्यात यावी, अशी मागणी ‘नाशिक वाचवा अभियान’चे राजेंद्र बागुल यांनी केली आहे.

स्मार्ट सिटी कंपनीने केलेल्या ड्रेनेज कामांमध्ये नदीपात्रात किती ड्रेनेज चेंबर्स बांधण्यात आले, तसेच नदीपात्राबाहेर पूर नियंत्रण रेषेत किती चेंबर्स उभारण्यात आले, याची संपूर्ण ठिकाणनिहाय माहिती सार्वजनिक करण्यात यावी.

तसेच शहरातील रस्त्यांवर जाळीचे व विटांचे किती चेंबर्स बांधण्यात आले आहेत,त्यामध्ये वापरण्यात आलेल्या विटा,काँक्रीट व इतर बांधकाम साहित्याचा दर्जा निर्धारित तांत्रिक मानकांनुसार आहे का, याची तपासणी करण्यात यावी.

या कामांसाठी नियुक्त करण्यात आलेले मुख्य ठेकेदार, सब-ठेकेदार, सल्लागार आणि संबंधित अधिकारी यांची माहिती जाहीर करून त्यांच्या कामांची प्रत्यक्ष पाहणी करावी. मंजूर अंदाजपत्रक, निविदा, कार्यादेश आणि प्रत्यक्ष झालेले काम यांची तुलना करून आर्थिक व तांत्रिक अनियमितता झाली आहे का, याची चौकशी करावी.

विशेषतः गोदावरी नदीपात्र आणि पूर नियंत्रण रेषेत करण्यात आलेल्या बांधकामांची वैधता, आवश्यक परवानग्या आणि पर्यावरणीय व तांत्रिक नियमांचे पालन झाले आहे का, याचीही चौकशी होणे आवश्यक आहे.दर्जाहीन किंवा नियमबाह्य काम आढळल्यास संबंधित ठेकेदार, सब-ठेकेदार व जबाबदार अधिकाऱ्यांवर नियमानुसार कठोर कारवाई करून झालेल्या नुकसानीची वसुली करण्यात यावी, अशी मागणी राजेंद्र बागुल यांनी केली आहे.

(Nashik News Today) “नाशिककरांच्या पैशातून होणाऱ्या प्रत्येक कामाचा दर्जा आणि त्याचा हिशोब जनतेसमोर आला पाहिजे. स्मार्ट सिटीच्या ड्रेनेज कामांमध्ये कोणतीही अनियमितता झाली असल्यास ती चौकशीअंती स्पष्ट झाली पाहिजे,”असे बागुल यांनी सांगितले.

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!