लहानपणीची दिवाळी ते आजची दिवाळी…झी मराठीच्या कलाकारांनी जागवल्या जुन्या आठवणी!
साफसफाई, फराळ, किल्ला अन् आकाशकंदील… कलाकारांनी सांगितले दिवाळीशी जोडलेले खास किस्से; कुणाला आठवली आईसोबतची लगबग, तर कुणाला गरमागरम करंजीची चव!

(Zee Marathi )दिवाळी म्हटलं की घराची साफसफाई, फराळाचा सुगंध, नवीन कपड्यांची खरेदी, रंगीबेरंगी आकाशकंदील, आकर्षक रांगोळी आणि पणत्यांच्या प्रकाशात उजळलेलं घर… असं आनंदाचं चित्र प्रत्येकाच्या डोळ्यांसमोर उभं राहतं. दिवाळी हा केवळ सण नसून बालपणीच्या असंख्य आठवणींना उजाळा देणारा आणि कुटुंबाला एकत्र आणणारा आनंदसोहळा आहे.
काळ बदलला, जबाबदाऱ्या वाढल्या आणि कामाच्या व्यापात सण साजरा करण्याची पद्धतही बदलली. मात्र, लहानपणी आईसोबत केलेली साफसफाई, भावंडांसोबत बनवलेला किल्ला, फराळ बनवतानाची धमाल आणि नवीन आकाशकंदील घेण्याचा आनंद आजही प्रत्येकाच्या मनात ताजा आहे. याच आठवणींना उजाळा देत झी मराठीच्या कलाकारांनी त्यांच्या बालपणीची दिवाळी, आजची दिवाळी आणि या सणाशी जोडलेले काही खास अनुभव सांगितले आहेत.
राज हंचनाळे : यंदाची दिवाळी दोन लक्ष्मीसोबत!(Zee Marathi)
‘सनई चौघडे’ मालिकेत जयची भूमिका साकारणारा अभिनेता राज हंचनाळे याच्यासाठी यंदाची दिवाळी विशेष आनंदाची आहे. तो सांगतो, “देव जेव्हा देतो, तेव्हा दोन्ही हातांनी भरभरून देतो, याचा अनुभव यंदा मला येतोय. या वर्षी माझ्या आयुष्यात लक्ष्मी दोन रूपांत आली आहे. एक म्हणजे माझी छोटी मुलगी आणि दुसरं म्हणजे प्रेक्षकांचं भरभरून मिळणारं प्रेम!
आमच्या मालिकेला ‘बेस्ट शो’चा पुरस्कार मिळाला. आमच्या कामाचं कौतुक होत आहे आणि सोशल मीडियावरही प्रेक्षकांचे प्रेमळ संदेश मिळत आहेत. हे सगळं माझ्यासाठी खूप आनंददायी आहे. यंदाची दिवाळी मी माझ्या कुटुंबासोबत आणि छोट्या लक्ष्मीसोबत पारंपरिक पद्धतीने साजरी करणार आहे. माझे प्रेक्षक हेच माझे खरे गॉडफादर्स आहेत. त्यांचं प्रेम आणि आशीर्वाद हीच माझी ताकद आहे. ही तर फक्त सुरुवात आहे. यापुढेही प्रेक्षकांसाठी उत्तम काम करायचं आहे.”
विजया बाबर : आईसोबतची साफसफाई आणि स्वतः रंगवलेले दिवे!(Zee Marathi)
‘कमळी’ मालिकेत कमळीची भूमिका साकारणारी विजया बाबर हिच्यासाठी दिवाळीच्या आठवणी म्हणजे आईसोबत केलेली तयारी आणि फराळाची लगबग. ती सांगते, “सध्या शूटिंगमध्ये व्यस्त असल्यामुळे दिवाळीच्या साफसफाईत आणि फराळ बनवण्यात आईला फारशी मदत करता येत नाही. पण लहानपणी मी आईसोबत घराची साफसफाई करायचे. घरात सगळ्यात लहान असल्यामुळे शाळा किंवा कॉलेजमधून आल्यानंतर आईसोबतच माझा जास्त वेळ जायचा.
मला फराळ बनवायला खूप आवडतं. लहानपणी मी आईला साधे, रंगरंगोटी न केलेले दिवे आणायला सांगायचे. मग ते दिवे घरी बसून स्वतःच्या हाताने रंगवायचे. दिवाळीच्या दिवशी माझ्या हाताने रंगवलेले दिवे घरात लावले जातात, याचा मला खूप आनंद व्हायचा.”
रोहित परशुराम : गरमागरम करंजी आणि भोरच्या दिवाळीची खास आठवण!
‘कृष्णाईच्या लेकी’ मालिकेत शंकरची भूमिका साकारणारा रोहित परशुराम यानेही आपल्या बालपणीच्या दिवाळीच्या आठवणी सांगितल्या. तो म्हणतो, “अभिनेता झाल्यानंतर आणि कामानिमित्त मुंबईत राहायला आल्यानंतर दिवाळीच्या तयारीत सहभागी होण्याचा वेळ कमी झाला आहे. आता आई आणि भाऊच घराची सजावट, आकाशकंदील, पणत्या, रांगोळी आणि फराळाची तयारी करतात.
मात्र, लहानपणी दिवाळीच्या प्रत्येक कामात मी पुढे असायचो. घरातील पंखे साफ करण्याची जबाबदारी माझी असायची. खुर्चीवर स्टूल ठेवून दादा आणि नाना मला आधार द्यायचे आणि मी पंखे साफ करायचो. फराळ बनवतानाही आईला मदत करायचो. गरमागरम काढलेली करंजी खाण्यात जे सुख आहे, त्यासारखं दुसरं सुख नाही!
बाबांसोबत भोरच्या बाजारात दिवाळीची खरेदी करायला जायचो. घरातील प्रत्येक आकाशकंदील माझ्या पसंतीचा असायचा. शाळेतही आकाशकंदील बनवण्याच्या स्पर्धा असायच्या. भोरमधली दिवाळी, त्या दिवसांतील थंडी आणि धुकं या सगळ्या आठवणी आजही मनात घर करून आहेत.”
शिवानी सोनार : सेटवर आणि घरी अशी दोन ठिकाणी दिवाळी!
‘तारिणी’ मालिकेत तारिणीची भूमिका साकारणारी शिवानी सोनार हिच्यासाठी दिवाळी हा सर्वांत आवडता सण आहे. ती सांगते, “मालिकांमध्ये काम करत असल्यामुळे आमची दिवाळी जवळपास १० ते १२ दिवस साजरी होते, असं मला वाटतं. सेटवरच्या कुटुंबासोबत आणि घरच्या कुटुंबासोबत अशा दोन्ही ठिकाणी दिवाळीचा आनंद घेता येतो. दोन्हीकडे फराळ, सजावट आणि सणाची लगबग असते.
यंदा घराच्या सजावटीची जबाबदारी माझी आहे. शूटिंगमुळे वेळ कमी मिळत असल्याने बऱ्याच गोष्टी ऑनलाइन खरेदी करतेय. मला षटकोनी आकाराचा, एकाच रंगाचा पारंपरिक आकाशकंदील खूप आवडतो. तो शोधण्याची सध्या तयारी सुरू आहे.
माझं माहेर आणि सासर पुण्यात असून भाऊ बेंगळुरूला असतो. पण दिवाळीच्या निमित्ताने आम्ही सगळे एकत्र येतो. लहानपणी मी आणि माझा भाऊ मिळून किल्ला बनवायचो. माती गोळा करणं, दगड आणणं, मावळे विकत घेणं किंवा जुन्या मावळ्यांना रंग देणं, या सगळ्या गोष्टींमध्ये एक वेगळीच मजा असते. किल्ला बनवण्यासाठी वयाचं बंधन नसतं. त्यामुळे यंदा वेळ मिळाला तर पुन्हा किल्ला बनवायला नक्की आवडेल.”
मंदार जाधव : नवीन कपडे, फटाके आणि आईच्या फराळाची ओढ!
‘धाकट्या सुनबाई’ मालिकेत वेदांतची भूमिका साकारणारा मंदार जाधव सांगतो, “आता दिवाळीच्या तयारीत माझं योगदान म्हणजे घराच्या साफसफाईत थोडीफार मदत करणं, खरेदी करणं आणि अर्थातच फराळ खाणं! लहानपणी नवीन कपडे, फटाके आणि आईने बनवलेला फराळ याचीच सर्वाधिक उत्सुकता असायची.
दिवाळीपूर्वी घर सजवणं, आकाशकंदील बनवणं, लाईटिंग करणं आणि वेगवेगळे पदार्थ तयार करणं, या सगळ्या गोष्टींची एक वेगळीच मजा होती. आता जबाबदाऱ्या वाढल्या आहेत आणि दिवाळीकडे पाहण्याचा दृष्टिकोनही बदलला आहे. मात्र, दिवाळीचा उत्साह आणि आनंद आजही तसाच आहे. माझ्यासाठी दिवाळी म्हणजे कुटुंबासोबत वेळ घालवणं, छान फराळ खाणं आणि आनंदाचे क्षण साजरे करणं!”
जुई गोगरी : बहिणींसोबतची धमाल आणि रांगोळीच्या आठवणी!
‘सनई चौघडे’ मालिकेत असावरीची भूमिका साकारणारी जुई पुष्पा प्रफुल्ल गोगरी हिच्यासाठी दिवाळी म्हणजे कुटुंबासोबतची धमाल आणि खरेदीची मजा. ती सांगते, “दिवाळीची साफसफाई करताना आई आणि आम्ही सगळ्या बहिणी एकत्र असतो. त्यात कधी मोठी बहीण फक्त कामं सांगत बसते आणि स्वतः आराम करते. अशा गमतीजमती करत आमची साफसफाई पूर्ण होते.
दिवाळीच्या खरेदीत रांगोळी, दिवे, लाईट्स, तोरण आणि गॅलरी सजवण्यासाठी वेगवेगळ्या वस्तू घेण्याची आम्हाला खूप आवड आहे. पूर्वी आई-बाबा खरेदी करायचे आणि आम्ही फक्त आवडीच्या वस्तू निवडायचो. पण गेल्या तीन वर्षांपासून घरासाठी दिवाळीचं सामान खरेदी करण्याची जबाबदारी मी सांभाळते. स्वतः कमावून घराची जबाबदारी पार पाडताना खूप छान वाटतं.
आमच्या घरी बाहेरून फराळाचा एकही पदार्थ आणला जात नाही. सगळे मिळून फराळ बनवतो. रांगोळी काढणंही कधी चुकलं नाही. मी आणि माझी बहीण निकिता मिळून रांगोळी काढायचो. आता तिचं लग्न झालं असून ती हैदराबादला असते. त्यामुळे रांगोळी काढताना तिची खूप आठवण येते. दिवाळीच्या निमित्ताने सगळ्यांनी एकत्र येणं, साड्या नेसून फोटो काढणं आणि पूजा करणं, या सगळ्या गोष्टी आमच्यासाठी खूप खास आहेत.”
निखिल दामले : आई-आजीच्या फराळाची आणि किल्ल्यांच्या स्पर्धेची आठवण!
‘कमळी’ मालिकेत ऋषीची भूमिका साकारणारा निखिल दामले यालाही दिवाळीची विशेष ओढ आहे. तो सांगतो, “दिवाळी हा माझ्या आवडत्या सणांपैकी एक आहे. याचं मुख्य कारण म्हणजे माझी आई आणि आजी बनवतात तो फराळ! दरवर्षी आमचं संपूर्ण कुटुंब एकत्र येतं. आम्ही पार्टी करतो, फराळाचा आस्वाद घेतो आणि वेगवेगळे खेळ खेळतो.
यंदा शूटिंगमध्ये व्यस्त असल्यामुळे दिवाळीच्या तयारीत फारसं योगदान देता येणार नाही. पण लहानपणीची सर्वांत सुंदर आठवण म्हणजे मित्रांसोबत किल्ला बनवणं. आम्ही महाराष्ट्रातील वेगवेगळ्या किल्ल्यांच्या प्रतिकृती तयार करायचो. किल्ले बनवण्याच्या स्पर्धांमध्येही सहभागी व्हायचो. त्या दिवसांची मजा काही औरच होती.”
ट्विंकल यादव : फटाक्यांची उत्सुकता आता फराळ बनवण्यापर्यंत!
‘कृष्णाईच्या लेकी’ मालिकेत गौरीची भूमिका साकारणारी ट्विंकल यादव हिच्या दिवाळीच्या आठवणीही खास आहेत. ती सांगते, “लहानपणी दिवाळीला गावी जायचे. तिथे सगळे एकत्र बसून फराळ बनवायचे. मी ते सगळं आवडीने पाहायचे आणि थोडीफार मदतही करायचे. पण माझं मुख्य लक्ष असायचं ते फटाके फोडण्याकडे!आता परिस्थिती बदलली आहे. दिवाळीच्या खरेदीपासून ते घरात काय हवं आणि काय नको, याबाबत आईसोबत चर्चा करते. खरेदीतही सहभागी होते. आता केवळ छोटी-मोठी मदत न करता फराळ बनवण्यातही आवडीने हातभार लावते.”
अशा या झी मराठीच्या कलाकारांच्या (Zee Marathi)आठवणींमधून दिवाळीच्या बदलत्या स्वरूपासोबतच या सणाचं भावनिक महत्त्वही अधोरेखित होतं. कुणासाठी आईच्या हातचा फराळ खास आहे, कुणासाठी मित्रांसोबतचा किल्ला, तर कुणासाठी बहिणींसोबतची रांगोळी आणि कुटुंबाची साथ! काळ बदलला, कामाच्या जबाबदाऱ्या वाढल्या, तरी दिवाळीशी जोडलेलं प्रेम, आपुलकी आणि आठवणी मात्र कायम आहेत.