संसदेचे विशेष अधिवेशन! महिला आरक्षण विधेयक पुन्हा येणार?
30 नोव्हेंबरला लोकसभा, 2 डिसेंबरला राज्यसभा; परिसीमनाच्या मुद्द्यावर सरकारची मोठी तयारी, मात्र दोन-तृतीयांश बहुमताचे आव्हान कायम!

नवी दिल्ली : संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या बैठकांचे आयोजन केंद्र सरकारने केले आहे. लोकसभेची बैठक 30 नोव्हेंबरला, तर राज्यसभेची बैठक 2 डिसेंबर 2026 रोजी होणार आहे. केंद्रीय संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजू यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत याबाबत माहिती दिली.
या बैठकांमध्ये महिला आरक्षण कायद्याच्या अंमलबजावणीसाठी आवश्यक असलेले परिसीमनाशी संबंधित संविधान दुरुस्ती विधेयक पुन्हा चर्चेला येण्याची शक्यता आहे. मात्र, सरकारने अद्याप अधिकृत कार्यसूची जाहीर केलेली नाही.
The Government has requested Hon’ble Speaker, Lok Sabha and Hon’ble Chairman, Rajya Sabha to reconvene Lok Sabha on Monday, 30th November, 2026 and Rajya Sabha on Wednesday, 2nd December, 2026 respectively to transact essential Government Business. Subject to exigencies of the Business, the sitting of both Houses may conclude on 3rd December, 2026.
— Kiren Rijiju (@KirenRijiju) November 26, 2026
सरकारसमोर दोन-तृतीयांश बहुमताचे आव्हान!
महिला आरक्षण कायद्यानुसार लोकसभा आणि राज्य विधानसभांमध्ये महिलांसाठी 33 टक्के जागा राखीव ठेवण्याची तरतूद आहे. 2029 च्या लोकसभा निवडणुकीपासूनच हे आरक्षण लागू करण्याचा सरकारचा प्रयत्न होता.
यासाठी लोकसभेच्या जागा 543 वरून 816 करण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला होता. मात्र, एप्रिल 2026 मध्ये झालेल्या मतदानात आवश्यक बहुमत न मिळाल्याने विधेयक मंजूर होऊ शकले नाही.
आता पुन्हा संसदेच्या बैठकांचे आयोजन झाल्याने हे विधेयक चर्चेत येण्याची शक्यता वाढली आहे.
लोकसभा आणि राज्यसभेत किती खासदार कमी?
सरकारला संविधान दुरुस्ती विधेयक मंजूर करण्यासाठी दोन्ही सभागृहांत उपस्थित आणि मतदान करणाऱ्या सदस्यांच्या दोन-तृतीयांश मतांची आवश्यकता आहे. दिलेल्या आकडेवारीनुसार लोकसभेत NDA कडे 319 खासदारांचे समर्थन असून आवश्यक बहुमतासाठी आणखी 41 मतांचे आव्हान आहे.
राज्यसभेतही आवश्यक दोन-तृतीयांश बहुमत मिळवणे सरकारसाठी महत्त्वाचे ठरणार आहे.
आता 30 नोव्हेंबर आणि 2 डिसेंबरच्या बैठकीत सरकार कोणती भूमिका घेणार? महिला आरक्षणाचा मार्ग मोकळा होणार की पुन्हा राजकीय पेच निर्माण होणार? याकडे देशाचे लक्ष लागले आहे.