सक्ती आणि आसक्ती

0

आदिती मोराणकर (शिक्षण विश्लेषक)
आज घराच्या चार भिंतीत आपलं सर्वस्व सामावले आहे आणि त्याच घराच्या चार भिंतीमध्ये सक्तीने बसून, सात इंचाच्या मोबाइल स्क्रीनवर आपलं सर्वस्व घराबाहेर शोधण्याची आपली आसक्ती हा विरोधाभास दुर्दैवी असला तरी आज बऱ्याच घरांमध्ये दिसतो आहे
 
“शंभर मागण्या असतात तुझ्या कुठे कुठे पुरे पडायचे आम्ही?” “आत्ता लगेच शक्य नाही, बघू पुढे मागे कधीतरी!” 
“हल्ली असं काय करतेस ग? पहिले मी मागितले की लगेच आणून द्यायची आता सरळ नाही म्हणतेस, आई तु बदलीस” 
“बाबा मला कधी नाही म्हणत नाही पण ऑनलाईन काही मागवायचं म्हटलं की हल्ली फार चिडचिड करतो , काय झालंय त्याला काही समजतच नाही” 
 
साधारणतः असाच सूर आपल्या आजूबाजूला हल्ली ऐकायला येतो‌ गेल्यावर्षी देशव्यापी लॉक डाऊनने आपल्याला जाणीव करून दिली की लॉक डाऊन आधीचं आपलं जीवन किती सुसह्य होतं. आपण, आपली मुलं किती बिनधास्त वागत होतो, किती मोकळे जगत होतो पण हा लॉक डाऊन लागला आणि आपली अडथळ्यांची शर्यत सुरू झाली. आपलीच नाही तर आपल्या मुलांची सुद्धा!
 
आपल्या घराचं रूपांतर “वर्क फ्रॉम होम” मुळे कार्यालयात झालं. बेडरूम मुलांसाठी वर्गखोल्यांचे काम करू लागले. माझ्या ओळखीत एक असं कुटुंब आहे जिथे केवळ घरात जागा नाही, वर्क फ्रॉम होम करता येत नाही या कारणाने नोकरीला रामराम करावा लागला. हॉलमध्ये नवऱ्याचं वर्क फ्रॉम होम चालू, एका बेडरूम मध्ये एका मुलाची तर दुसऱ्या बेडरूममध्ये दुसऱ्या मुलाची ऑनलाइन शाळा चालू, पर्याय उरला फक्त स्वयंपाकघराचा तर तिथे बसून काम करणं शक्य नाही म्हणून शेवटी तिने नोकरी सोडून दिली आणि आता नोकरी शोधण्याची नवीन अडथळ्यांची शर्यत मागे लावून घेतली.
 
आज काल या ना त्या स्वरूपात आपण सगळेच सक्तीने या अडथळ्यांच्या शर्यतीत भाग घेतोय. स्वतःला सिद्ध करण्याची संधी आपल्याला सोडायची नाही, सगळ्या अडथळ्यांवर मात करत आपण पाय रोवून उभं राहू शकतो हे समाधान आपल्यालाच आपल्यासाठी मिळवायचंय.
 
या सगळ्या अडथळ्याच्या शर्यती पार करतांना आपल्याला मुलांचीही तेवढीच काळजी आहे आणि म्हणूनच माझ्या लेखांवर तुम्ही माझ्यापर्यंत पोहोचवणाऱ्या प्रतिक्रिया खूप बोलक्या आहेत. मुलांचं जवळून निरीक्षण करण्याची संधी मला सातत्याने मिळते. एकंदरीतच सगळ्या प्रतिक्रिया बघता मुलांबद्दल च्या वाढलेल्या तक्रारी माझ्या लक्षात आल्यात आश्चर्याची गोष्ट म्हणजे सगळ्या तक्रारी थोड्या फार फरकाने सारख्याच आहे मुलांचा वयोगट जरी वेगळा असला तरी मुलांच्या मानसिकतेतून उमटणार्‍या प्रतिक्रिया या बऱ्याच अंशी सारख्या आहेत आणि या सगळ्या प्रतिक्रिया एकमेव कारण म्हणजे सक्ती ! 
 
हे केलंच पाहिजे, हे झालंच पाहिजे, हे बोललंच पाहिजे, हे लिहिलंच पाहिजे, हे खाल्लंच पाहिजे, ही “च” ची सक्ती मुलांना आता नको आहे.
 
खरंच प्रत्येक मुल वेगळं असतं आणि म्हणूनच प्रत्येकाला दिली जाणारी वागणूक ही सारखी असून चालत नाही. तुम्ही कित्येकदा तुमच्या मुलांसमोरच त्यांच्या तक्रारींचा पाढा वाचायला सुरुवात करता. “तो हल्ली हट्टी झालाय, त्याची चिडचिड वाढली आहे , उलट उत्तर द्यायला लागला आहे, काहीही सांगितलं तरी अजिबात ऐकत नाही, मी जे सांगते ते सोडून बाकी सगळं त्याला करायचं असतं, अभ्यास करत नाही , खेळायलाच पाहिजे असतं” अशा एक ना अनेक तक्रारी तुम्ही त्याच्यासमोर गप्पांच्या ओघात आणि त्रासलेल्या स्वरात शेजाऱ्यांना,  फोनवर मैत्रिणींना, सण समारंभात माहेरच्यांना सांगता आणि तुम्हाला वाटतं त्याच्यामुळे तुम्हाला होत असलेला त्रास त्या लेकरांनी समजून घ्यावा आणि त्यांच्या वागण्यात बदल करावा, असं होत नसतं! 
 
 
त्या मुलाला तुम्ही सारखं सारखं तेच तेच बोलून कोडगं बनवत असता, त्यामुळे तो आपोआपच कालांतराने तुमच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करायला शिकतो मग परत तो दुर्लक्ष करतो या कारणा वरून आपण एक नवी तक्रार तयार करतो, हे कधीही न संपणारं वर्तुळ आहे.  यातून बाहेर पडायचं असेल तर योग्य वेळी, योग्य मार्ग निवडायला हवा. मुलांच्या स्वभावावर परिणाम झालेलाच आहे तो नाकारता येणार नाही. या साथीच्या काळात प्रौढ आणि मुले दोघांमध्येही निराशेची भावना वाढली आहे. आपल्या कामात आपण व्यस्त होतो आणि मुलं शाळा, अभ्यास, ट्युशन, काही छंदांचे क्लास यामध्ये रमली होती. आता अचानक आपल्याला आणि अर्थात आपल्या मुलांनाही “सक्तीचा सहवास” घ्यावा लागतो आहे. 
 
सक्ती आणि आसक्ती दोन्ही शब्द जरी थोडेफार सारखे वाटत असले तरीही मुलांना कोणतीही गोष्ट सक्तीने करायला लावलेली आवडत नाही. ती गोष्ट करण्याची आसक्ती मुलांच्या मनात असली तरच ती गोष्ट करण्याचा आनंद मुलं घेऊ शकतात.
 
सक्ती, मग ती अभ्यासाची असू दे नाहीतर सहवासाची, या सक्तीचा मुलांच्या मानसिकतेवर परिणाम होतोच आहे.
 
आता,काय होऊन गेलंय यावर चर्चा न करता जे झालं आहे त्यावर काय करता येईल याबद्दल बोलूया! मुलांच्या मानसिकतेमध्ये बदल घडवून आणायचा असेल तर सगळ्यात पहिले त्यांचा एक दिनक्रम ठरवा. मुलांना स्वातंत्र्य दिल्यावर त्यांचा व्यक्तिमत्वाचा विकास होतो हे जरी खरं असलं तरी त्या स्वातंत्र्याबरोबर एक शिस्त मुलांना लागायला हवी. स्वातंत्र्याचा अर्थ मुलांनी कितीही उशिरा उठावं, अभ्यास करावा किंवा करू नये हे त्यांनी ठरवावं असा होत नाही तर स्वातंत्र्य म्हणजे सकाळी ठराविक वेळेला उठल्यानंतर, अभ्यासाच्या वेळेला पहिले कुठल्या विषयाचा अभ्यास करावा याचा निर्णय मुलाला घेऊ द्यावा. बाहेर जातांना कुठले कपडे घालायचे आहेत याविषयी चर्चा करून  निवडीचे स्वातंत्र्य मुलांना द्यावे कारण यातूनच त्यांना विचार करण्याची सवय लागते आणि जबाबदारीने निर्णय घेण्याची सुद्धा सवय त्यांच्या उपयोगी पडते.
 
मुलांचा दिनक्रम ठरवतांना मुलांबरोबर बसून त्यांच्याशी चर्चा करून ठरवला तर मुलांना तो दिनक्रम पाळायला अडचणी येत नाहीत. ‘आपल्या आई-बाबांनी आपल्याला विचारूनच हे ठरवले आहे मग आपण हे करायला हवं’ ही त्यांची जबाबदारी होते आणि म्हणूनच ते कटाक्षाने दिनक्रम पाळतात. अनपेक्षितपणे आई-वडिलांबरोबर काहीतरी वेगळं केल्यामुळे, हसत खेळत चर्चा केल्यामुळे, मुलांवर असणारा ताण कमी होतो. त्यांच्या मनातली निराशा पळून जाते आणि सहाजिकच या दिनक्रमात स्क्रीनचा वेळ, खेळाचा वेळ, अभ्यासाचा वेळ, वाचनाचा वेळ, व्यायामाचा वेळ, आंघोळीची वेळ आणि टीव्ही चा वेळ ठरलेला असल्याने मुलांना रोजचा दिवस सोपा वाटायला लागतो.
 
एकत्रित कुटुंबामध्ये प्रत्येक व्यक्तीचं मत वेगळं असतं पण प्रत्येकामध्ये जर “सुसंवाद” असेल तर सक्तीचा सहवास आसक्तीमध्ये आपण बदलू शकतो. 
 
मी सध्या दोन टोकाची पालकत्व अनुभवते आहे. काही घरांमध्ये मुलाच्या मनाविरुद्ध पालक श्वासही घेत नाहीत तर काही घरांमध्ये मुलांना इतकं दुर्लक्षित केलं जातं की ते आपल्या आजूबाजूला आहेत हे पालकांच्या खिजगणतीत सुद्धा नसतं, तुम्हाला वाचताना अतिशयोक्ती वाटेल कदाचित पण मी जे सांगते आहे ती सत्य परिस्थिती आहे.
 
मान्य आहे की आपण सगळेच या परिस्थितीने हतबल झालेलो आहोत पण म्हणून सगळंच संपलं असा विचार करण्यापेक्षा आपण परत सगळं नव्याने सुरू करू या विचाराने प्रेरित होऊन, मुलांना सामील करून घेऊन, पुढची वाटचाल करायला हवी. त्याकरता संवाद हे एक चांगलं माध्यम ठरू शकतं.
 
आपल्या घरातली मुलं आपल्याला महत्त्वाची आहेत याची जाणीव आपल्या बोलण्यातून,वागण्यातून, स्पर्शातून मुलांना करून द्यायला हवी. जेव्हा त्यांची आत्म प्रतिमा उजळेल तेव्हाच त्यांना आत्मभान येईल.
 
अभ्यास करणं हे विद्यार्थी दशेतील त्यांचं कर्तव्य आहे पण हे कर्तव्य हे त्यांच्यासाठी सक्तीचं न होता त्यांची अभ्यासाप्रती आसक्ती कशी वाढेल याचा विचार करा.
 
अनेक छोट्या छोट्या पद्धतींनी मुलांचा अभ्यास आपल्याला मनोरंजक बनवता येतो एखादी घटना लक्षात ठेवायची असेल तर तिला गोष्टीरूपात सांगून हे मुलांच्या मनावर कायमचं कोरता येतं. उदाहरणच द्यायचं झालं तर शिवाजी महाराजांची आग्र्याहून सुटका हा इतिहासातील धडा आपल्याला ही माहिती आहे आग्र्याहून सुटका होताना शिवाजी महाराजांना कोणी मदत केली हे जर लक्षात ठेवायचं असेल तर त्या व्यक्तीच्या कर्तव्यतत्पर ते बद्दल “हीरे मोती देकर भी जो काम ना हुवा, वह उसने कर दिखाया और अपना फर्ज निभाया” असा वाक्य मुलांना सांगितलं तर या वाक्यातच त्यांना शिवाजी महाराजांना आग्र्याहून निसटून जातांना मदत केलेल्या व्यक्तीची ओळख होते. या वाक्याच्या सुरुवातीच्या ‘हिरे मोती देकर’ ह्या शब्दात  त्या व्यक्तीचे नाव आहे, “हीरोजी* आणि वाक्याचा शेवट ‘फर्ज निभाया’ यात त्यांचं आडनाव आहे “फर्जंद” ! असं वेगळ्या पद्धतीने समजावलं तर मुलं आनंदाने शिकतात.  
 
एखादी किचकट व्याख्या पाठ करायची असेल तर मुलांशी गप्पा मारता मारता त्याचा सहज-सोपा एखाद्या शॉर्टकट शोधता येतो का ते बघा. अवघड गणित सोडवताना ‘अरे हे सोप्प आहे, हे तर तुला येतं’ अशा वाक्यांनी मुलाचं मनोबल वाढवा. ‘अरे वा! किती पटकन केलं’ असं म्हणून हलकीशी शाब्बासकी द्या. पुढच्या वेळेला तुमच्या एका शाब्बासकीसाठी तुमच्या मुलाला परत अभ्यास करावासा वाटेल. 
 
तुम्ही इतकी वर्ष झाले मुलांना सांभाळता आहात, त्यांच्यावर संस्कार करत आहात, त्यांना हाताळत आहात, तरीही आता ते उद्धट सारखे उत्तर देतात, चिडचिड करतात, वेळ प्रसंगी आपला मुद्दा लावून धरतात, खोटं बोलतात? मग आता थोडीशी आपली पद्धत बदलून बघूया. बाहेर जायला मिळत नसल्याने बाहेरचं मोकळं वातावरण, मित्र-मैत्रिणींशी रंगणाऱ्या गप्पा, बोलण्याचे स्वातंत्र्य, आपलं मत मांडण्यासाठी हक्काचं व्यासपीठ या मुलांना मिळत नाही आणि त्यामुळेच त्यांची चिडचिड हट्टीपणा वाढला आहे. बाहेरचं वातावरण जर त्यांना घरात मिळालं, मित्र-मैत्रिणी जर आई वडिलांच्या रूपाने लाभले,
 
 बोलण्याचे स्वातंत्र्य मिळालं, व्यक्त होण्यासाठी घरीच व्यासपीठ आहे याची त्यांना जाणीव झाली तर आपोआपच त्यांच्या वागण्यामध्ये बदल दिसून येतील. एखादी गोष्ट तुम्हाला पटत नसेल पण ही गोष्ट करण्याचा हट्टच मुलांनी धरला असेल तर ती गोष्ट न करण्यामागचं तुमचं कारण अगदी मैत्रीपूर्ण संवादातून मुलांपर्यंत पोहचवा, मात्र ते करतांना उगीचच ‘तारक मेहता’ मधल्या एकमेव सेक्रेटरी सारखं ‘हमारे जमाने मे’ असं बोलून मुलांना वेगळ्याच दिशेने नेऊ नका.
 
प्रत्येक घरातील मूल मग ते छोटे असो किंवा मोठे मोबाईलच्या आहारी जात आहेत. घरात एवढी चालती, बोलती, हलती माणसं असताना ती मुलं मोबाईल मध्ये नेमकं काय शोधतात याचा कधी विचार केला? मोबाईल मध्ये ती मुलं नक्की काय बघताय हे जरा डोकावुन बघितलं तर लक्षात येईल की त्यांना “आपल्याशी कोणीतरी बोलत आहे” अशी फिलिंग देणाऱ्या गोष्टी मुलं मोबाईल वर बघतात. मग हे “त्यांच्याशी बोलणारा कुणीतरी” आपण का होत नाही? आपलं बोलणं आपल्या मुलांना मनोरंजक का वाटत नाही? अर्थात त्यांचं मनोरंजन करायचं म्हणून आपण जोकर बनण्याचं कारण नाही पण आपलं बोलणं थोडसं मनोरंजक करायला काय हरकत आहे. आपले आई-बाबा आपल्याशी बोलत आहेत, याऐवजी आपले आई-बाबा आपल्याशी मित्र मैत्रिणी सारखे बोलताय या भूमिकेत शिरायला काय हरकत आहे.
 
आज घराच्या चार भिंतीत आपलं सर्वस्व सामावले आहे आणि त्याच घराच्या चार भिंतीमध्ये सक्तीने बसून, सात इंचाच्या मोबाइल स्क्रीनवर आपलं सर्वस्व घराबाहेर शोधण्याची आपली आसक्ती हा विरोधाभास दुर्दैवी असला तरी बऱ्याच घरांमध्ये दिसतो आहे. 
 
आपल्या घरात एक चैतन्य आपल्या मुलांच्या रूपात वावरत आहे. आपल्याला जगण्यासाठी प्रेरित करत आहे. परत परत उभं राहण्याचं बळ देत आहे. आयुष्यात एक नवीन संधी येत आहे याचा आनंद मानून, या चैतन्याला असंच निरागसतेने खळाळत राहू द्या. कारण या चैतन्यातून “सक्तीचा त्रास कमी” होऊन “नात्यांप्रति आसक्ती” निर्माण होणार आहे, यावर विश्वास ठेवा. सक्तीतून आसक्तीचा प्रवास अवघड आहे पण अशक्य नाही!
 
तुमच्या मुलांबद्दलचे प्रश्न तुम्ही ई-मेल किंवा व्हाट्सअप करून मला विचारू शकता. भेटूया मग पुढच्या सदरामध्ये एका नवीन विषयासह!
Aditi Morankar
आदिती मोराणकर (शिक्षण विश्लेषक)
 
आदिती मोराणकर (शिक्षण विश्लेषक)
संचालिका : ईस्कुलिंग व्हर्च्युअल डिजीस्मार्ट किंडरगार्टन.
eskooling2020@gmail.com | 8329932017 / 9326536524

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.