नाशिक – कथक नृत्याची व नाशिकच्या अभिजात नृत्य नाट्य संगीत अकादमीची पताका सर्वदूर पसरविणाऱ्या भक्ती देशपांडे यांना कथक केंद्र दिल्लीच्या अमृत महोत्सवात एकल नृत्य सादरीकरणासाठी आमंत्रित करण्यात आले आहे. संपूर्ण देशातून १५ दिवस रोज ५ कलावंत असे ७५ कलावंत या ‘ वंदेमातरम् ’ महोत्सवात कथक केंद्र दिल्लीच्या अमृत महोत्सवानिमित्त आपली कला सादर करणार आहेत. दिनांक १० ऑगस्ट रोजी सायंकाळी ७ ते ८ या वेळात दिल्ली येथील स्वामी विवेकानंद कलागृहात हा कार्यक्रम सादर होईल. त्यांचे नृत्य त्याचवेळी फेसबुक लाईव्हवरही facebook.com/sangeetnatak या लिंक द्वारे बघता येईल. ३१ जुलै ते १४ ऑगस्ट असा हा कार्यक्रम मिनिस्ट्री ऑफ कल्चर, कथक केंद्र-नवी दिल्ली आणि संगीत नाटक अकादमीच्या संयुक्त विद्यमाने आयोजित होत आहे.भक्ती देशपांडे या पं. बिरजू महाराज, पं.सुरेश तळवलकर व नृत्यश्री विद्या देशपांडे यांची शिष्या आहेत.
यापूर्वी अभिजातच्या संचालिका नृत्यश्री विद्या देशपांडे यांनाही आपल्या एकल नृत्यासाठी दिल्ली कथक केंद्राच्या दिल्ली व पुणे येथील महोत्सवात आमंत्रित करण्यात आले होते. आज भक्ती देशपांडे कथक नृत्याची तीच धुरा पुढे वाहणार आहेत. त्या (ICCR) इंडियन कौंसिल फॅार कल्चरल रिलेशन्स् मान्य कथक एकल नृत्यांगना म्हणून सर्वश्रुत आहेतच. कौशिकी चक्रवर्तींच्या ‘सखी’ या कार्यक्रमातून त्या कथक नृत्य सादर करीत असतात. त्यांनी भारत व भारताबाहेर अमेरिका, युरोपात पॅरिस, नेदरलॅंड, जर्मनी, याशिवाय आफ्रिका, इंडोनेशिया इत्यादी ठिकाणी आपली कला सादर केली आहे. ‘बाजीराव मस्तानी’ चित्रपटातील ‘ मोहे रंग दो लाल’ या फिल्मफेअर अवॅार्ड विजेत्या गाण्यासाठी पं. बिरजू महाराजजींबरोबर भक्तीने सहाय्यक म्हणून काम केले आहे. ‘डेढ़ इश्किया’ चित्रपटात त्यांनी बाल वयातील माधुरी दीक्षितच्या भूमिकेत कथक नृत्य केले होते. याशिवाय कमल हसन यांच्या ‘विश्वरुपम’ चित्रपटातील एका नृत्यात त्या सहभागी झाल्या होत्या. तसेच डान्स विथ माधुरी या कार्यक्रमातूनही त्या कथक नृत्य शिकवतात. त्यांनी झी मराठी च्या ‘दिल्या घरी तू सुखी रहा’ या मालिकेत मुख्य अभिनेत्री म्हणून काम केले आहे.
आज त्यांनी संपूर्णपणे कथक नृत्याच्या प्रचार व प्रसारासाठी ‘आर्ट फिल्स’ नावाची कंपनी आपल्या पतीच्या सहाय्याने स्थापन केली आहे. डिजिटल माध्यमातून काम करणाऱ्या या कंपनी मधून विविध मोड्युल्स द्वारे त्या विद्यार्थिनींना कथक नृत्य शिक्षणासाठी आकर्षित करीत असतात. अनेक कथक नृत्यांगनांना व डिजिटल माध्यमात काम करणाऱ्यांना यातून व्यवसाय ही उपलब्ध झाला आहे.