मुंबई,दि,२७ जून २०२४ –महाराष्ट्रातील उच्च शिक्षण घेणाऱ्या मुलींचे शिक्षण मोफत करण्याचा विचार सरकार करत असून त्याबाबत शुक्रवारी अर्थसंकल्पात मोठी घोषणा होण्याची शक्यता आहे. ज्या मुलींच्या पालकांचं आठ लाखांपेक्षा कमी वार्षिक उत्पन्न असणाऱ्या इतर मागासवर्ग तसेच, आर्थिकदृष्टया मागास प्रवर्गातील मुलींच्या सर्व अभ्यासक्रमाची १००टक्के शैक्षणिक शुल्क प्रतिपूर्ती शासनामार्फत करण्यात येणार आहे. उच्च शिक्षणामध्ये अधिकाधिक मुलींचे प्रवेश होतील यासाठी विशेष अभियान राबण्यात येणार आहे.
उत्पन्न ८आठ लाखांच्या आत आहे त्यांना मोफत शिक्षणाचा लाभ मिळणार आहे. महिलांसाठी लाडकी बहीण योजना सोबतच मुलींना शिक्षण मोफत करण्याचा मोठा निर्णय राज्य सरकार घेणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. उच्च शिक्षणासोबतच व्यावसायिक शिक्षणही मोफत करण्याचा राज्य सरकारचा विचार आहे. ज्या कुटुंबाचं उत्पन्न आठ लाखांच्या आत आहे अशा कुटुंबातील मुलींना येत्या जूनपासून मोफत शिक्षण देण्यात येणार असल्याची घोषणा राज्याचे मंत्री चंद्रकांत पाटील यांनी लोकसभा निवडणुकीच्या आधीच केली होती. पण नवीन शैक्षणिक वर्षे सुरू झाल्यानंतरही त्या घोषणेची अंमलबजावणी झाली नसल्याचं राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांनी यावरून राज्याचे उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर टीका केली होती.
त्यानंतर आता चंद्रकांत पाटील यांच्या प्रतिक्रियेनंतर राज्य सरकारच्या मंत्रिमंडळामध्ये यावर चर्चा करण्यात आली. त्यानंतर आता अधिवेशनामध्ये या निर्णयाची घोषणा करण्यात येणार आहे.