नाशिक -अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, नाशिक शाखेतर्फे दिले जाणारे यंदाचे रंगकर्मी पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. रंगभूमी दिनाच्या पार्श्वभूमीवर अ. भा नाट्यपरिषदेच्या नाशिक शाखेचे अध्यक्ष प्रा. रवींद्र कदम यांनी आज पत्रकार परिषदेत २०२१च्या या पुरस्काराची घोषणा केली. या पुरस्कारांमध्ये अभिनयासाठी दिला जाणारा दत्ता भट स्मृती पुरस्कार दीपक करंजीकर, तर शांता जोग स्मृती पुरस्कार विद्या करंजीकर यांना दिला जाणार आहे. मराठी साहित्य संमेलनानंतर हा पुरस्कार वितरण सोहळा होणार असल्याचे हि त्यांनी सांगितले.
पुरस्कार निवड समितीमध्ये प्रा. रवींद्र कदम, सुनील ढगे, ईश्वर जगताप, विजय शिंगणे, राजेश भुसारे, राजेश जाधव, रवींद्र ढवळे यांचा समावेश आहे. दोन हजार रुपये, स्मृतिचिन्ह, सन्मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे. पत्रकार परिषदेस प्रमुख कार्यवाह सुनील ढगे , राजेश भुसारे, विजय शिंगणे, राजेश जाधव, राजेंद्र जाधव ,उमेश गायकवाड, पीयूष नाशिककर ,ईश्वर जगताप, आदी उपस्थित होते.
२०२१च्या पुरस्कारांचे मानकरी
दत्ता भट पुरस्कार (अभिनय-पुरुष)- दीपक करंजीकर, शांता जोग स्मृती पुरस्कार (अभिनय-स्त्री)-विद्या करंजीकर, प्रभाकर पाटणकर स्मृती पुरस्कार (दिग्दर्शन)- प्रदिप पाटील, नेताजी तथा दादा भोईर पुरस्कार (लेखन)- दत्ता पाटील, पुरोहित स्मृती पुरस्कार (बालरंगभूमी)- सुरेश गायधनी, जयंत वैशंपायन स्मृती पुरस्कार (सांस्कृतिक पत्रकारिता) – धनंजय वाखारे, गिरीधर मोरे स्मृती पुरस्कार (प्रकाशयोजना) – विनोद राठोड, रामदास बरकले स्मृती पुरस्कार (लोककलावंत ) – जितेंद्र देवरे, शाहीर गजाभाऊ बेणी स्मृती पुरस्कार (शाहीर पुरस्कार) – राजेंद्र जव्हेरी, विजय तिडके स्मृती पुरस्कार (रंगकर्मी कार्यकर्ता) – राजेंद्र तिडके, शंकरराव बर्वे स्मृती विशेष योगदान पुरस्कार – (चित्रकार व रांगोळी )- नारायण चुंबळे, सामाजिक कार्य-निवृत्ती चाफळकर, संगीत कारकीर्द – संजय गिते, तबला साथसंगत- नितीन वारे.
या वर्षी प्रथमच रंगकर्मी कार्यकर्ता या पुरस्कार देण्यात येणार असून रंगभूमीसाठी विशेष योगदान देणारे स्व. विजय तिडके यांच्या नावाने हा पुरस्कार देण्यात येणार आहे.यंदाचा पहिला रंगकर्मी कार्यकर्ता पुरस्कार ज्येष्ठ रंगकर्मी राजेंद्र तिडके यांना जाहीर करण्यात आला आहे.
शुक्रवारी (दि. ५) नोव्हेबर रोजी रंगभूमी दिनानिमित कालिदास कलामंदिर येथे पदाधिकार्यांच्या हस्ते नटराज पूजन होईल. यावेळी नाट्य परिषदेतर्फे चारुदत्त दीक्षित आणि सहकारी नांदी सादर करणार आहेत .