किरण घायदार
नाशिक,दि,२७ जानेवारी २०२५ –एसटी महामंडळाला आगामी पाच वर्षांत २५ हजार स्वमालकीच्या लालपरी बसेस घेण्यासाठी उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार यांनी तत्वतः मान्यता दिली आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी ही माहिती दिली असून, “गाव तेथे नवी एसटी” ही योजना प्रभावीपणे राबविण्यासाठी ही मोठी पावले उचलण्यात आली आहेत.
सन २०२५-२६ च्या अर्थसंकल्पाच्या आढावा बैठकीत परिवहन खात्याने एसटी महामंडळाच्या सद्यस्थितीवर चर्चा केली. महामंडळाकडे सध्या १४,३०० बसेस असून, त्यापैकी १०,००० बसेस १० वर्षांहून जुनी आहेत व प्रवासी सेवेतून लवकरच बाद होण्याच्या मार्गावर आहेत. या पार्श्वभूमीवर, दरवर्षी ५,००० नवीन बसेस घेऊन पाच वर्षांत २५,००० बसेसचा प्रस्ताव सादर करण्यात आला.
अर्थमंत्री अजित पवार यांनी या प्रस्तावाला तातडीने मान्यता देत, परिवहन विभागाला लवकरच कार्यवाहीसाठी सूचना दिल्या. तसेच २०२९ पर्यंत २५,००० लालपरी आणि ५,००० इलेक्ट्रिक बसेस घेऊन एसटीचा ३०,००० बसेसचा ताफा उभा करण्याचा निर्णय घेतला आहे.”आनंद दिघे यांच्या जयंतीनिमित्त ही घोषणा एसटीप्रेमी जनतेसाठी गोड भेट आहे. भविष्यात गावागावांपर्यंत एसटी सेवा पोहोचवण्याचे स्वप्न पूर्ण होईल,” असे प्रताप सरनाईक यांनी सांगितले.