संमेलनाच्या आयोजनातील सर्वव्यापी सहभाग

साहित्य पर्वणी - लेखांक - ५ 

1

डॉ. स्वप्नील तोरणे

 

महाराष्ट्राच्या सामाजिक, सांस्कृतिक आणि साहित्यिक वाटचालीमध्ये साहित्य संमेलन ही  महत्वाची घटना असते. वाचकांचा, रसिकांचा सहभाग यास मोठया प्रमाणावर लाभत आहे. विसाव्या शतकाने सामाजिक, सांस्कृतिक प्रबोधनाच्या अनेक चांगल्या परंपरा निर्माण केल्या आहेत. त्यांनी महाराष्ट्राचे भावजीवन समृध्द झाले आहे. या पैकीच एक म्हणजे साहित्य संमेलन. आज याला आलेले महासंमेलनाचे स्वरुप डोळे दिपवून टाकणारे आहे. सुमारे दीड शतकाची वाटचाल असलेल्या परंपरेचा साहित्यरथ आज ९४ व्या संमेलनाच्या उंबरठयावर आहे. या निमित्ताने डॉ. स्वप्नील तोरणे यांनी घेतलेल्या काही निवडक संमेलनांचा मागोवा…’’

साहित्य संमेलनाचा पट खूप विशाल आहे, हे आपण या लेखमालेच्या निमित्ताने अनुभवलेच आहे.  दोन दिवसांनी सुरु होत असणाऱ्या नाशिकच्या ९४व्या साहित्य संमेलनाच्या विविध कार्यक्रमांना प्रारंभ झाला आहे. म्हणूनच यापूर्वीची ९३ साहित्य संमेलने कुठे कुठे भरवण्यात आली याबाबत आढावा घेतला तर  माहिती मोठी रंजक ठरणारी आहे.  महाराष्ट्राची निर्मिती झाल्यावर आजच्या भौगोलीक सीमारेषा ठरल्या.  याला प्रमाण माणून जर विचार केला तर आजवर तेवीस साहित्य संमेलने हे महाराष्ट्राच्या बाहेर इतर राज्यात भरविण्यात आली होती. मराठी भाषिकांचे राष्ट्रीय स्तरावरील प्राबल्य यावरुन लक्षात येऊ शकते.

महाराजा सयाजीराव गायकवाड यांचे मराठी साहित्यीक आणि साहित्यावरील स्नेह हा सर्वपरिचीत आहेच. साहित्य संमेलनाच्या सुरुवातीच्या वर्षात बडोद्याच्या गायकवाड घराण्याकडून सातत्याने मदत केली जायची. स्वातंत्र्यपूर्व काळात तब्बल तीन वेळा बडोदा येथे साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. तर जवळपास एैंशी वर्षानंतर अठरा साली बडोदा येथे अत्यंत यशस्वी संमेलनाचे आयोजन करण्यात आले. संयुक्त महाराष्ट्र झाल्यापासून जो प्रश्न आजही कायम धुमसत आहे. तो म्हणजे बेळगाव- कारवार सीमा प्रश्न. अनेक साहित्य संमेलनात या बाबतची चर्चा करण्यात आली. त्या बाबतचे ठराव देखील एकमताने संमत झाले होते. त्या बेळगावी आजवर तीन, तर कारवार येथे एक साहित्य संमेलन मराठी भाषिकांच्या अलोट उत्साहात संपन्न झाली आहेत. कोंकणी-मराठी संस्कृती ज्या राज्याची अविभाज्य घटक आहे. त्या गोवा राज्यातील मडगाव येथे दोनदा तर पणजी येथे एकदा साहित्य संमेलन घेण्यात आले होते. ६४ सालच्या मडगावच्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष कुसुमाग्रज हे होते. महाराष्ट्राबाहेर सत्ता मिळविणारे व ती टिकवून ठेवणारे महत्वाचे घराणे म्हणजे इंदूरचे होळकर होय. इंदूर येथे आजवर तीन वेळा साहित्य संमेलन घेण्यात आले.

हैदराबाद येथील दोन्ही साहित्य संमेलने स्वातंत्र्यपूर्व काळातच घेण्यात आली. ग्वाल्हेर येथील शिंदेंचे घराणे हे मुळचे महाराष्ट्रातीलच असल्याने तेथेही दोन साहित्य संमेलने उत्साहात संपन्न झाली. या व्यतिरीक्त अहमदाबाद येथे, दिल्ली येथे, भोपाळ येथे मराठी साहित्य संमेलने यशस्वी संपन्न झाली. दिल्ली येथील संमेलानात अध्यक्षपदावर बोलतांना तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांनी ‘‘प्रादेशिक राज्यांची भाषावार रचना प्रादेशिक भाषा बोलण्यात राष्ट्रीय ऐक्याचा पाया दृढ व खोल करु शकते हे प्रादेशिक भाषांनुसार रचना करनाऱ्या शहाण्या मंडळींनी विसरता कामा नये‘‘ असे ठणकावून सांगितले होते. आताच्या छत्तीसगढ राज्यात रायपूर येथे गंगाधर गाडगीळ यांच्या हस्ते संमेलन भरले होते. तर २०१५ साली पंजाबातील घुमान येथे भरलेल्या संमेलनासाठी महाराष्ट्रातून हजारोच्या संख्येने लोक गेले होते. याच बरोबर तेथील पंजाबी भाषिकांचा देखील मराठी साहित्य संमेलनात असणारा सहभाग निश्चितच सुखावणारा ठरला होता.

या संमेलनाच्या निमित्ताने तेथे आज भाषा आणि संस्कृती विषयक कार्यरत मोठ्या संस्था कार्यरत झाल्या आहेत. हे मराठी साहित्य संमेलनाच्या आयोजनाचेच फलित आहे असे म्हंटले तर वावगे ठरणार नाही.

महाराष्ट्रातील साहित्य संमेलनाच्या संयोजन कार्यात पुणेकरांनी मुंबईवर आघाडी घेतल्याचे चित्र स्पष्ट आहे. या संमेलनाची गंगोत्रीच पुण्यातील ग्रंथकार संमेलनातून झाली होती.  स्वातंत्र्यपूर्व काळात तब्बल सहा वेळा पुणेकरांनी या संमेलनाचे आयोजन केले होते.  स्वातंत्र्योत्तर काळात पिंपरी चिंचवडचे सोळा साली झालेली संमेलन धरुन सहा वेळा असे तब्बल बारा वेळा संयोजनाचा मान पुणेकरांनी पटकावला आहे.मुंबई परिसरात नऊ संमेलनांचे आयोजन करण्यात आले होते.

प्रादेशिक स्तरावर महाराष्ट्राचे पाच विभाग केले, तर पश्चिम महाराष्ट्रात सर्वाधिक संमेलनांचे अयोजन करण्यात आले. साताऱ्यात तीन, सांगली- मीरज तीन, महाबळेश्वरसह कोल्हापुरात तीन, सोलापुरात दोन, कऱ्हाडमध्ये दोन, बार्शी, इचलकरंजी, सासवड, पंढरपुर या ठिकाणी प्रत्येकी एक वेळा अशी सतरा वेळा संमेलनांचे आयोजन आहे. यात  पुण्यातील बारा अधिक केले तर तब्बल २९ वेळा पश्चिम महाराष्ट्रात संमेलानाचा जागर झाल्याचे चीत्र आहे. या खालोखाल विदर्भाने दहा वेळा संमेलन भरवले आहे. यात यवतमाळ, नागपूर, अकोला आणि चंद्रपूरने प्रत्येकी दोनदा, तर वर्धा आणि अमरावतीने एकदा हा उपक्रम घेतला होता. उत्तर महाराष्ट्र आजवर आठ संमेलने झाली. दोन नाशिक, दोन जळगाव, दोन अहमदनगर तसेच धुळे व अंमळनेर येथे प्रत्येकी एकदा हे संमेलन संपन्न झाले. आता होत असलेले नाशिकमधील हे तिसरे संमेलन आहे.

मराठवाडयात औरंगाबाद येथे दोनदा तर उस्मानाबाद, परभणी, अंबेजोगाई, नांदेड, परळी वैजनाथ येथे प्रत्येकी एकदा साहित्य संमेलन संपन्न झाले.

कोकणात चिपळूण येथे एकदा, रत्नागिरी येथे दोनदा तर मालवण येथे एकदा संमेलन संपन्न झाले. साहित्य संमेलनाचे आयोजन हा त्या ठिकाणी असलेल्या लोकांच्या दृष्टीकोनातून एक प्रकारे उत्सवच असतो. त्या त्या ठिकाणी त्या निमित्ताने एक प्रकारे सांस्कृतिक मंथन होत असते. महानगरे आणि मोठया शहरांसोबत ग्रामीण भागातील फारशी संसाधने उपलब्ध नसलेल्या ठिकाणी देखील सर्वसामान्यांचा सहभाग आणि उत्सव अचंबित करणारा असतो. शालेय विद्यार्थ्यांपासून वृध्दांपर्यंत सर्वांचा सहभाग हेच तर या उत्सवाच्या यशाचे मूळ स्वरुप असते. जणमानसात हाच उत्साह मराठी भाषेवरचे प्रेम आणि साहित्याला अधिकाधिक समृध्द करीत नेणारे ठरते.

Dr. Swapnil Torne
डॉ.स्वप्नील तोरणे

डॉ. स्वप्नील तोरणे
जनसंवाद तज्ज्ञ
9881734838

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

1 Comment
  1. Sanjay gite says

    फारच आश्चर्य वाटलं पूर्वीची संमेलने इतक्या विविध ठिकाणी अगदी लहान राज्याबाहेर भरवली गेलीत हे वरील लेखामुळे माहिती झाले क्या बात है ,अभय आNइ स्वप्नीलजी धन्यवाद

कॉपी करू नका.