गोदावरीत फेकल्या हजारो चप्पला;‘क्रिएटिव्ह कुटीर’ची स्वच्छता मोहीम आणि अनोखी कलाकृती

0

नाशिक, १३ मार्च २०२६ : Nashik Godavari river pollution रंगपंचमीचा उत्साह ओसरल्यानंतर नाशिकच्या रामकुंड परिसरात एक वेदनादायी चित्र समोर आले. सणाच्या जल्लोषानंतर हजारो चप्पला आणि कचरा गोदावरी नदीत तसेच परिसरात फेकून दिल्याचे दिसून आले. या प्रकारामुळे नाशिककरांमध्ये संताप व्यक्त होत असताना सामाजिक संस्थेने पुढाकार घेत स्वच्छतेचा संदेश दिला.

नाशिकमधील क्रिएटिव्ह कुटीर फाउंडेशनने रंगपंचमीच्या दुसऱ्याच दिवशी रामकुंड परिसरात मोठी स्वच्छता मोहीम राबवली. या मोहिमेदरम्यान संस्थेच्या सदस्यांनी गोदावरी नदीकाठावर आणि परिसरातून तीन ते चार हजारांहून अधिक स्लिपर्स आणि चप्पला गोळा केल्या. या चप्पला रंगपंचमीच्या उत्सवानंतर नागरिकांनी नदीत आणि रस्त्यावर कचऱ्यासारख्या फेकून दिल्या होत्या.

स्वच्छता मोहिमेत जमा झालेल्या या चप्पलांचा वापर करून संस्थेने एक प्रतीकात्मक आर्ट इंस्टॉलेशन तयार केले. गोळा केलेल्या चप्पलांपासून ‘पंख’ (Wings) तयार करण्यात आले. मात्र ही केवळ कला नसून समाजाला विचार करायला लावणारा एक प्रश्न असल्याचे संस्थेने स्पष्ट केले.संस्थेच्या सदस्यांच्या मते, “पंख म्हणजे उंच भरारी घेण्याचे प्रतीक. पण आम्ही बनवलेले हे पंख पिसांपासून नव्हेत, तर आपल्या बेफिकिरीच्या अवशेषांपासून तयार झाले आहेत.”

या उपक्रमातून एक गंभीर प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे —आपली संस्कृती आपल्याला सणानंतर शहर आणि निसर्ग घाण करायला शिकवते का?रंगपंचमीसारखे सण साजरे करणे ही भारतीय संस्कृतीची परंपरा आहे. मात्र सणानंतर शहर घाण करून जाणे ही कोणती संस्कृती, असा सवालही या उपक्रमातून उपस्थित करण्यात आला. अनेकांनी उत्साहात वापरलेल्या चप्पला गोदावरीत आणि रस्त्यावर फेकून दिल्या. (Nashik Godavari river pollution) त्या चप्पला कुणाच्या तरी पायात होत्या, मात्र सण संपल्यानंतर त्या कचऱ्यासारख्या फेकल्या गेल्या.

संस्थेने गोळा केलेल्या बहुतेक चप्पला नॉन-बायोडिग्रेडेबल असल्याने त्या सहज विघटन होणार नाहीत. अशा वस्तू मातीमध्ये आणि कचऱ्याच्या ढिगाऱ्यांमध्ये वर्षानुवर्षे तशाच राहतात, त्यामुळे पर्यावरणावर मोठा परिणाम होतो.

Nashik Godavari river pollution,Thousands of slippers thrown into Godavari; ‘Creative Kutir’s’ cleanliness drive and unique artwork
याबाबत क्रिएटिव्ह कुटीर फाउंडेशनच्या संचालिका शितल सोनवणे उगले यांनी नाशिककरांना आवाहन करताना सांगितले की,“रंगपंचमीचे रंग काही तासांत धुतले जातात, पण आपण सोडलेला कचरा निसर्गाला अनेक वर्षे सहन करावा लागतो. त्यामुळे प्रत्येकाने सण साजरा करताना पर्यावरणाची जबाबदारीही ओळखली पाहिजे.”

त्या पुढे म्हणाल्या की, भारताबाहेरही भारतीय संस्कृतीचा सन्मान केला जातो आणि तिचे अनुकरण केले जाते. त्यामुळे आपल्यालाच आपल्या संस्कृतीचे जतन करण्याची जबाबदारी आहे. सण साजरा करताना शहर आणि नदी स्वच्छ ठेवणे ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे.

क्रिएटिव्ह कुटीर फाउंडेशन ही नाशिकमधील सामाजिक आणि सांस्कृतिक उपक्रम राबवणारी संस्था असून पर्यावरण संरक्षण, स्वच्छता जनजागृती आणि सामाजिक विषयांवर कलात्मक उपक्रमांद्वारे समाजाला जागृत करण्याचे काम संस्था करत आहे. शहरात स्वच्छता आणि पर्यावरणाबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी संस्थेने अनेक मोहिमा राबवल्या आहेत.

या उपक्रमाच्या माध्यमातून संस्थेने नाशिककरांना एक स्पष्ट संदेश दिला आहे —“हरित, स्वच्छ आणि सुंदर नाशिक हेच खरे स्मार्ट नाशिक.”सण साजरा करताना आनंदाबरोबरच पर्यावरणाची जबाबदारीही लक्षात ठेवण्याचे आवाहन क्रिएटिव्ह कुटीर फाउंडेशनतर्फे करण्यात आले आहे.

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!