
नाशिक, दि. ११ मे २०२६ – Nashik Healthcare Update नाशिक शहरात अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज असलेल्या सुखम् फिजिओथेरपी अँड रिहॅब या क्लिनिकचे उद्घाटन नुकतेच उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले. शहरातील नामवंत अस्थिरोग तज्ज्ञ डॉ. विजय काकातकर आणि डॉ. भरत केळकर यांच्या हस्ते या क्लिनिकचे उद्घाटन करण्यात आले.
या उद्घाटन सोहळ्यास डॉ. अनिरुद्ध धर्माधिकारी, डॉ. राजेश वाळवेकर, डॉ. मनोज शिंपी यांच्यासह सर्वश्री विश्वास ठाकूर, डी. जे. हंसवानी, गोपाळ पाटील, रतन लथ, शर्वरी लथ आणि शेफाली भुजबळ यांची प्रमुख उपस्थिती होती. नाशिकमधील विविध क्षेत्रातील मान्यवरांनी कार्यक्रमाला उपस्थित राहून क्लिनिकला शुभेच्छा दिल्या.
गंगापूर रोड परिसरातील आकाशवाणी टॉवर शेजारी असलेल्या एम स्वेअर या व्यावसायिक इमारतीत हे अत्याधुनिक फिजिओथेरपी आणि रिहॅब सेंटर सुरू करण्यात आले आहे. रुग्णांना वेदनांपासून त्वरित आराम मिळावा तसेच त्यांचे पुनर्वसन अधिक प्रभावी पद्धतीने व्हावे, यासाठी येथे आधुनिक तंत्रज्ञान आणि अद्ययावत उपकरणांचा वापर करण्यात आल्याची माहिती क्लिनिकच्या संचालिका डॉ. दिशा विराज रानडे यांनी दिली.
त्या म्हणाल्या की, आजच्या धावपळीच्या जीवनशैलीमुळे (Nashik Healthcare Update)पाठदुखी, मानदुखी, सांधेदुखी, स्पोर्ट्स इन्ज्युरी तसेच स्नायूंसंबंधित अनेक समस्या वाढताना दिसत आहेत. अशा रुग्णांना तज्ज्ञ मार्गदर्शन आणि अत्याधुनिक उपचार एकाच छताखाली उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न सुखम्च्या माध्यमातून करण्यात आला आहे.
क्लिनिकमध्ये फिजिओथेरपीसोबतच रिहॅबिलिटेशनसाठी विविध आधुनिक उपचारपद्धती, व्यायाम प्रणाली आणि वेदना व्यवस्थापनाच्या सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. रुग्णांच्या गरजेनुसार वैयक्तिक उपचार पद्धती राबविण्यावर विशेष भर देण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
विशेष म्हणजे, डॉ. दिशा विराज रानडे या ‘ग्रंथ तुमच्या दारी’ आणि ‘अष्टौप्रहर स्वरहोत्र’ या उपक्रमांचे संकल्पक विनायक रानडे यांच्या स्नुषा आहेत. सामाजिक आणि सांस्कृतिक वारसा लाभलेल्या कुटुंबातील सदस्य म्हणून आरोग्यसेवेच्या क्षेत्रात त्यांनी उचललेले हे पाऊल कौतुकास्पद असल्याच्या भावना उपस्थितांनी व्यक्त केल्या.
उद्घाटनानंतर उपस्थित मान्यवरांनी क्लिनिकची पाहणी केली आणि उपलब्ध सुविधा व उपचारपद्धतींचे कौतुक केले. नाशिककरांसाठी दर्जेदार आणि आधुनिक फिजिओथेरपी सेवा उपलब्ध झाल्यामुळे आरोग्य क्षेत्रात एक सकारात्मक भर पडल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.


