
नवी दिल्ली, दि. १५ मे २०२६ – Petrol-Diesel Price Hike देशभरातील नागरिकांना पुन्हा एकदा महागाईचा मोठा फटका बसला आहे. देशातील तेल कंपन्यांनी शुक्रवार, १५ मेपासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात मोठी वाढ जाहीर केली आहे. पेट्रोल प्रतिलिटर सुमारे ३ रुपये तर डिझेल ३.११ रुपयांनी महागले असून नवे दर तत्काळ लागू करण्यात आले आहेत. या वाढीमुळे सर्वसामान्यांच्या खिशावर अतिरिक्त भार पडणार असून वाहतूक, अन्नधान्य आणि दैनंदिन वस्तूंच्या किमती वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईमध्ये पेट्रोलचा दर १०६ रुपयांच्या पुढे गेला आहे. मुंबईत पेट्रोल १०६.६८ रुपये प्रतिलिटर तर डिझेल ९३.१४ रुपये प्रतिलिटर दराने विकले जात आहे. दिल्लीमध्ये पेट्रोल ९७.७७ रुपये आणि डिझेल ९०.६७ रुपये प्रतिलिटरवर पोहोचले आहे. कोलकाता, चेन्नई, हैदराबाद आणि तिरुवनंतपुरमसारख्या शहरांमध्येही इंधनाचे दर मोठ्या प्रमाणात वाढले आहेत.
तज्ज्ञांच्या मते, पश्चिम आशियातील वाढता तणाव, इराण-अमेरिका संघर्ष, आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमतींमध्ये झालेली वाढ आणि तेल कंपन्यांवरील आर्थिक ताण यामुळे ही दरवाढ करण्यात आली आहे. सध्या जागतिक बाजारात कच्च्या तेलाचा दर प्रति बॅरल १०५ ते १२० डॉलरपर्यंत पोहोचला असल्याने भारतावर त्याचा थेट परिणाम होत आहे.
प्रमुख शहरांतील पेट्रोलचे नवे दर(Petrol-Diesel Price Hike)
नवी दिल्ली – ९७.७७ रुपये
मुंबई – १०६.६८ रुपये
कोलकाता – १०८.७४ रुपये
चेन्नई – १०३.९० रुपये
हैदराबाद – ११०.८९ रुपये
जयपूर – १०८.१९ रुपये
बेंगळुरू – १०६.१७ रुपये
तिरुवनंतपुरम – ११०.७५ रुपये
डिझेलचे नवे दर
नवी दिल्ली – ९०.६७ रुपये
मुंबई – ९३.१४ रुपये
कोलकाता – ९५.१३ रुपये
चेन्नई – ९५.४७ रुपये
हैदराबाद – ९८.९६ रुपये
जयपूर – ९३.४३ रुपये
बेंगळुरू – ९४.१० रुपये
तिरुवनंतपुरम – ९९.६३ रुपये
दरम्यान, पेट्रोल-डिझेलनंतर आता घरगुती LPG गॅस सिलेंडरच्या किंमती वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यापूर्वी मार्च महिन्यात एलपीजी सिलेंडरच्या दरात ६० रुपयांची वाढ करण्यात आली होती. मात्र त्यानंतर काही काळ दर स्थिर होते. आता पुन्हा आंतरराष्ट्रीय बाजारातील अस्थिरतेमुळे एलपीजी महाग होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.मुंबईमध्ये सध्या घरगुती गॅस सिलेंडर ९१२.५० रुपयांना मिळत असून व्यावसायिक सिलेंडरचा दर ३०२४ रुपयांपर्यंत पोहोचला आहे. दिल्लीमध्ये घरगुती एलपीजी ९१३ रुपये तर कमर्शियल सिलेंडर ३०७१.५० रुपयांना मिळत आहे.
भारत सुमारे ५५ टक्के एलपीजीची आयात करतो. एलपीजी तयार करण्यासाठी वापरले जाणारे प्रोपेन आणि ब्युटेन यांची आयात महागल्यामुळे आगामी काळात गॅस सिलेंडरच्या दरात आणखी वाढ होण्याची शक्यता जाणकारांनी व्यक्त केली आहे.इंधन दरवाढीमुळे वाहतूक खर्च वाढणार असून त्याचा परिणाम भाजीपाला, दूध, किराणा तसेच इतर अत्यावश्यक वस्तूंच्या किमतींवर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांची चिंता अधिक वाढली आहे.


