मुंबई-आपण सर्वांनीच आपल्या लहानपणी आजीकडून किंवा आईकडून’एक आटपाट नगर होतं तिकडे एक साधुवाणी राहत होता’या चातुर्मासाच्या गोष्टी ऐकल्या असतील, याच चातुर्मासातल्या कथा आणि व्रतवैकल्य प्रेक्षकांना मालिकारूपात’घेतला वसा टाकू नको’या कार्यक्रातून पाहायला मिळतात आणि हा कार्यक्रम प्रेक्षकांच्या आवडीचा आहे. या कार्यक्रमात नवरात्री विशेष भागात धनश्री काडगावकर प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. धनश्रीने या आधी अनेक भूमिकांमधून प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत पण आता ती एका पौराणिक भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. धनश्री मोठ्या गॅपनंतर प्रेक्षकांच्या भेटीस येतेय त्यामुळे तिची उत्सुकता शिघेला पोहोचली आहे आणि तिच्या चाहत्यांना देखील तिला पुन्हा एकदा वेगळ्या भूमिकेत बघण्याची तितकीच उत्सुकता आहे.
या भूमिकेबद्दल बोलताना धनश्री म्हणाली,”माझ्या मुलाच्या जन्मानंतर खऱ्या आयुष्यात आईची भूमिका निभावताना माझा अभिनयापासून संपर्क तुटला. मध्ये मोठा गॅप आल्यामुळे मला पुन्हा काम करता येईल कि नाही, मी काही विसरली तर नाही ना अशा अनेक शंका माझ्या मनात येत होत्या. पण मला माझ्या कुटुंबाकडून आणि या मालिकेच्या नावातूनच खूप प्रोत्साहन मिळालं. घेतला वसा टाकू नको असं मी माझ्या मनाशी पक्क करून हि भूमिका स्वीकारली. या मालिकेमुळे दुर्गामातेची भूमिका माझ्या वाट्याला आली आहे. महिषासुराचा वध करणाऱ्या दुर्गा मातेची अलौकिक भूमिका माझ्या वाट्याला आली यासाठी मी स्वतःला खूप भाग्यवान समजते.”