आदिती मोराणकर (शिक्षण विश्लेषक)
आपण कल्पवृक्षाच्या छायेखाली बसलेले असतांना मनातल्या सगळ्या इच्छा अचानक पूर्ण व्हायला लागतात आणि मग आपलं मन घाबरतं, ‘आपल्या सुखाला नजर तर नाही ना लागणार?’ हा विचार आपल्या मनात येतो आणि नेमका हा क्षणच आपल्यासाठी घातक ठरतो, कारण कल्पवृक्ष तुमच्या मनाची ही इच्छा देखील पूर्ण करतो ! मग यात चुक त्या कल्पवृक्षाची? की तुमच्या मनात उत्पन्न होणाऱ्या विचारांची ? कि तुमच्या मनावर तुमचा ताबा नसण्याची ?
“मन जह्यरी जह्यरी
याचं न्यारं रे तंतर
आरं ईचू साप बरा,
त्याले उतारे मंतर”
बहिणाबाईंच्या कवितेतले हे शब्द आपल्या मुलांच्या मनावर लहानपणापासून बिंबवले गेले पाहिजेत कारण मन ही अशी गोष्ट आहे की जी ताब्यात ठेवली तर आयुष्य ताब्यात राहतं. मनात उत्पन्न होणारे विचार सकारात्मक असतील तर ठिक पण मनात जर नकारात्मकता भरली तर मात्र त्याचा उतारा कुणीच देऊ शकत नाही. मनात येणाऱ्या विचारांवर ताबा का हवा हे समजाविण्यासाठी सुरुवातीलाच तुम्हाला एक गोष्ट सांगते.
एका गावाशेजारी खूप मोठे जंगल होतौ. त्या गावातून दुसऱ्या गावात जाण्यासाठी जंगल पार करावं लागायचं. त्यामुळेच जेव्हा खूप गरज असायची तेव्हाच लोक शेजारच्या गावी जायचे. जंगलात खूप जंगली प्राणी होते. एकदा एक गरीब माणूस जंगलातून दुसऱ्या गावी जायला निघाला. त्याच्या सोबत कोणीही नव्हतं. जंगलात खूप आतमध्ये गेल्यानंतर त्या माणसाला भयंकर थकवा आला, तहानही लागली होती आणि आता इतकं चालल्यानंतर त्याला भुकेची जाणीव व्हायला लागली होती. थकुन तो माणूस एका झाडाखाली बसला. झाड अतिशय डेरेदार होतं. त्याची सावली थंड होती. भर उन्हात इतकी छान सावली मिळाल्यानंतर सहाजिकच त्या माणसाच्या मनात विचार आला,”या सावलीत बसून जर काही खाता आलं असतं तर किती छान झालं असतं!” त्याच्या मनात हा विचार आल्या-आल्या समोर एक पंचपक्वान्नांचं ताट भरून आलं. भोजनावर येथेच्छ ताव मारल्यानंतर त्याच्या मनात थंड पाणी पिण्याची इच्छा उत्पन्न झाली. लगोलग एक थंड पाण्याची सूरई त्या माणसासमोर प्रकट झाली. एव्हाना आपण ‘कल्पवृक्षाखाली’ बसलो आहे हे त्या माणसाच्या लक्षात आलं होतं. त्याच्या मनात लोभ उत्पन्न झाला आणि मनातली इच्छा प्रकट करतांना “पोतभरून मोहरा मिळाल्या तर किती मज्जा येईल” असा विचार त्याने केला. त्याच्या मनातली ही इच्छाही लगेचच पूर्ण झाली. पोतं भरून मोहरा त्या माणसाच्या समोर होत्या. आतापर्यंत गरिबीत दिवस काढलेल्या त्या माणसाला इतक्या मोहरांचं खूप अप्रूप वाटलं, त्याचबरोबर मनामध्ये भीती दाटून आली,”माझ्याकडचं हे धन दरोडेखोरांनी लुटलं आणि मला जिवानिशी मारलं तर?” अशी भीती त्याच्या मनात आली. त्याचबरोबर अचानक कुठूनतरी एक दरोडेखोरांची टोळी आली आणि त्या माणसाचं मोहरा भरलेलं पोतं दरोडेखोर घेऊन गेले,जाता जाता त्या गरीब माणसाला त्यांनी मारून टाकलं.
वास्तविक पाहता कल्पवृक्षाखाली बसलेल्या माणसाने विचारपूर्वक मनावर ताबा ठेवून काही गोष्टी मागितल्या असत्या तर त्याच्या आयुष्याचं सोनं झालं असतं पण त्या माणसाला कल्पवृक्षाखाली बसून मनावर ताबा ठेवता आला नाही आणि त्याचे परिणाम त्याला भोगावे लागले.
या गोष्टी प्रमाणेच कित्येकदा आपणही आपल्या मनावर ताबा ठेवू शकत नाही. प्रयत्नांती आपल्याला ते जमेल न जमेल, पण आपल्या मुलांनी मनावर ताबा मिळवुन आत्मसंयम ठेवायला हवा हे मात्र आपल्याला मुलांना शिकवायला हवं.
लहान मुलांना एखादी गोष्ट दिसली कि ती हवीच असते. नुसती हवी नसते तर ‘आत्ताच्या आत्ता’ हवी असते. त्यासाठी ते रागावतात, किंचाळतात, हात-पाय आपटतात, वस्तू फेकतात, प्रसंगी रस्त्यावर हातपाय पसरून सत्याग्रहाला बसतात आणि मग आपण नाक मुठीत धरून शरणागती पत्करतो ‘लहान असताना असं वागणं स्वाभाविक आहे, थोडा मोठा झाल्यावर मुलात सुधारणा होईल’ हा आपला भाबडा विश्वास असतो. वेळीच सावध व्हा कारण तुमच्या या विश्वासाला तडा देणारी एक टेस्ट “स्टॅनफोर्ड मार्शमेलो एक्सपेरिमेंट” म्हणून प्रसिद्ध आहे.
या एक्सपेरिमेंटनुसार मुलांना कोवळ्या वयापासूनच स्वतःवर ताबा ठेवायला शिकवायला हवं, तसं शिक्षण द्यायला हवं. अन्यथा मोठेपणी या मुलांच्या सर्वांगीण विकासावर विपरीत परिणाम झालेला दिसून येतो.
काय आहे हे मार्शमेलो एक्सपेरिमेंट?
वॉल्टर मिशन या मानसशास्त्रज्ञाने स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटी मध्ये चार वर्षाच्या मुलांच्या एका गटाला वेगवेगळ्या वर्गात एकएकटंच बसवलं. त्यांना मार्शमेलो (चॉकलेट) देऊन दोन पर्याय देण्यात आले. पहिला पर्याय होता समोर ठेवलेलं मार्शमेलो लगेच खाण्याचा आणि दुसरा पर्याय होता समोरचं मार्शमेलो न खाता थोडावेळ वाट बघण्याचा, ‘जी मुलं थोडा वेळ वाट बघायला तयार असतील त्यांना बक्षीस म्हणून अजून एक मार्शमेलो देणार’ असं वॉल्टर मिशेलने सांगितलं होतं. पंधरा वीस मिनिटानंतर वॉल्टर मिशेल प्रत्येक मुलाकडे परत गेले. काही मुलांनी मार्शमेलो खाऊन संपवला होता तर काही मुलं मात्र प्रामाणिकपणे समोर ठेवलेल्या मार्शमेलोकडे बघूनही न खाता बसून राहिली होती. ज्या मुलांनी मार्शमेलो खाल्लं नव्हतं त्या मुलांना बक्षीस म्हणून अजून एक मार्शमेलो देण्यात आलं. एक्स्परीमेंटमध्ये सहभागी मुलांची यादी पुढे अनेक वर्ष सांभाळून ठेवण्यात आली. ठराविक वर्षानंतर या एक्स्परिमेंट मधले प्रत्येक मुल समाजामध्ये कुठल्या हुद्द्यावर आहे? त्यांची शैक्षणिक प्रगती काय आहे? आर्थिक स्थिती कशी आहे? माणूस म्हणून ते कसे आहेत? या सगळ्याचा बारकाईने अभ्यास केला गेला. आश्चर्य म्हणजे वयाच्या चौथ्या वर्षी स्वतःच्या मनावर ताबा ठेवून ज्या मुलांनी समोर ठेवलेल्या मार्शमेलोला हात न लावता शिक्षक वर्गात परत येण्याची वाट बघितली होती, ती मुले लगेचच मार्शमेलो खाणाऱ्या मुलांपेक्षा उत्तम ठरली होती, जास्त यशस्वी झाली होती, शारीरिक दृष्ट्या सक्षम होती आणि मानसिक पातळीवर संतुलित होते. वाट बघणाऱ्या मुलांची शैक्षणिक प्रगती देखील मनावर ताबा ठेवून न शकणाऱ्या मुलांपेक्षा खूपच चांगली होती. ‘मनावर ताबा ठेवण्याचे महत्त्व’ मार्शमेलो एक्स्परिमेंटनी अधोरेखित करून दिलं.
हे वाचल्यावर ‘आपलं मुल लहान आहे, त्याचं हे वागणं स्वाभाविक आहे’ अशा गैरसमजात पालक म्हणून आपण राहता कामा नये. ‘आत्ता काय हैदोस घालायचा तो घालेल पण उद्या मोठा झाल्यावर सुधरेल” असं होत नसतं. मोठेपणीच्या प्रगतीचा पाया लहान वयातच घातला जातो. स्वभावाची जडण-घडण याच वयामध्ये होत असते आणि म्हणूनच ‘आपल्या मनावर ताबा ठेवायला आपण शिकलं पाहिजे’ ही गोष्ट मुलांना लहान वयातच सांगायला हवी.
आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या गोष्टींमधून जे अनुभव येत असतात त्यातूनच मुलांच्या मेंदूचा विकास होत असतो. हे अनुभव घेतांना मनावर ताबा ठेवण्याचे काही प्रसंग घडले तर ते प्रसंग कालानुपरत्वे मुलांसाठी अनुभव ठरतील. जर आपण आपल्या मुलांना मनावर ताबा न ठेवता वाटेल तसं वागू दिलं किंवा योग्य वेळी त्यांना थांबवलं नाही आणि त्यांच्या मनात येणारी प्रत्येक इच्छा पूर्ण करत गेलो तर मुलांना होणाऱ्या मोहाला थांबवणं लहानपणापासून त्यांना माहिती होणार नाही.नकार ऐकण्याची सवय नसल्याने मोठेपणी अशी मुलं मनानं खंबीर बनत नाहीत. छोट्या छोट्या गोष्टी न मिळाल्याने त्यांच्या मनावर ताण पडायला लागतो आणि अशी मुलं लवकर डिप्रेशनमध्ये जातात.
काही गोष्टी मुलांना शिकवतांना, आपण त्यांच्या समोर काय वागतो याचाही विचार करायला हवा. सिग्नलवर खूप वेळ गाडी उभी राहिल्यानंतर तुमचं मूल तोंड वेडेवाकडे करत असेल किंवा शाळेच्या वर्गात एका रांगेत जातांना तुमचं मूल जर रांग तोडून सगळ्यात पुढे धावत असेल किंवा शाळेतल्या शिक्षकांचे म्हणणे पूर्ण ऐकून न घेता मध्ये मध्ये स्वतः बोलत असेल तर हे आदर्श नकळतपणे आपणच त्याच्यासमोर ठेवले नाही ना? याचा नीट विचार करून बघा. कारण सिग्नल लागल्यानंतर थोडावेळ वाट बघून सिग्नल सुटायला अगदी दहा-बारा सेकंदाचा अवधी उरला कि सिग्नल मोडणारे पालक या मुलांनी पाहिलेले असतात. एखाद्या दुकानाच्या लाईनमध्ये किंवा रेल्वेचे तिकीट काढतांना मोठ्या रांगेत उभं न राहता, तिकीट खिडकी जवळच्या माणसाजवळ वशिला लावून तिकीट मागणारे पालक मुलांच्या डोळ्यासमोर असतात. मुलांशी बोलताना मुलांचं बोलणं पूर्ण ऐकून न घेता, त्यांना तोडून आपण मध्येच आपले घोडे पुढे दामटतो आणि मग ही मुलं आपलं बोलणं पूर्ण ऐकून न घेता आपलं बोलणं मध्येच तोडून त्यांचे विचार प्रकट करायला लागतात, म्हणूनच मुलांसमोर जर आदर्श ठेवायचा असेल तर आपल्याला स्वतःला आधी नीट वागावे लागेल.
आपल्या मनावर ताबा ठेवला नाही तर काय परिणाम होतील हे आपल्या मुलांचं वय लक्षात घेऊन त्यांना समजेल अशा पद्धतीने मुलांना सांगायला हवं उदाहरणार्थ, एखाद्या दिवशी तुमचं मुल त्याच्या मित्राची तक्रार घेऊन तुमच्याकडे आलं, तावातावाने मित्राचे गाऱ्हाणे करू लागलं आणि “आता मी पण त्याला मारेल, मी पण त्याच्याशी बोलणारच नाही” असं म्हणू लागलं तर ‘जशास तसं’ वागून तुझा काही फायदा होणार आहे का? कि यातून तुझं नुकसान होणार आहे? याचा सारासार विचार करायला आपण मुलांना शिकवायला हवं. “जसं तुला राग आला तसं तुझ्या मित्रालाही राग आला असेलच ना ? मग त्याने काय केलं?” हे मुलाला समजून सांगायला हवं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे “आता यापुढे तू त्याच्याशी कधीच बोलू नकोस किंवा त्याच्याशी खेळायला जाऊ नकोस” असं न सांगता “जे काय तुम्ही 2-4 तास एकत्र घालवाल ते आनंदाने घालवा” अशी समजूत घालून मुलांना सगळं विसरण्याची तयारी करायला शिकवा.
एखाद्या प्रसंगी जर आपलं मुल आत्मसंयम ठेवतो आहे असं तुमच्या लक्षात आलं तर त्याला लगेच शाब्बासकी द्या. म्हणजे ‘माझी आजची कृती योग्य होती आणि यापुढेही मी असंच वागणं अपेक्षित आणि योग्य आहे’ हे मुलांच्या लक्षात येईल. आपल्या भावनांवर, आपल्या रागावर आवर घालणं सोपं असतं पण एखाद्या वादावर पडदा टाकण्यासाठी आपलं मूल जेव्हा संयम दाखवतं त्यावेळेला निश्चितच मुलाच्या सामंजस्याचं आणि त्याच्या संयमाचे कौतुक करायला हवं. एखाद्या भांडणाच्या प्रसंगी, समोरचा अद्वातद्वा बोलत असताना, आपण व्यक्त न होता, समोरच्याला उत्तर न देता, शांततेचे धोरण पत्करलं तर होणारे कित्येक वाद टळू शकतात आणि नात्यात निर्माण होऊ पाहणारं अंतर मिटतं, अशा वेळेला आपल्या मुलांनी किती धीराने तो प्रसंग निभावून नेला याबद्दल मुलांना मनापासून शाब्बासकी द्यायलाच पाहिजे.
मुलांच्या मनावर ताबा मिळवण्याच्या सवयीला खतपाणी घालण्यासाठी झालेल्या प्रसंगांवर खेळीमेळीच्या वातावरणात त्यांच्याशी चर्चा करा किंवा काही घरगुती खेळ मुलांसोबत खेळा. जसं कधी अनौपचारिक गप्पा चालू असतांना आपल्या आजूबाजूला घडलेला एखादा प्रसंग मुलांना सांगा. त्या गोष्टीतली पात्र त्या प्रसंगात कशी वागली, कशी व्यक्त झाली हे सगळं मुलांनी नीट ऐकावं अशा पद्धतीने त्यांच्या कानावर घाला. मग या प्रसंगात “तु असतास तर तू काय केलं असतं?” असा प्रश्न विचारून मुलांना त्या प्रसंगाचा नव्याने विचार करायला लावा. सहाजिकच जेव्हा एखादी गोष्ट आपण मुलांना सांगत असतो त्यावेळी त्यांचं मन आपोआपच न्यायनिवाडा करत असतं. या प्रसंगांमध्ये कोण चुकलं, कुठे चुकलं आणि कसं चुकलं याचा अवलोकन तुम्ही गोष्ट सांगत असतांनाच मुलांनी केलेलं असतं. जेव्हा तुम्ही मुलांना त्या प्रसंगात नेऊन ठेवता, त्यावेळी मुलांना नव्याने त्या प्रसंगाचा विचार करावा लागतो आणि मग खरंच ‘माझ्यावर अशी वेळ आली असती तर मी काय केलं असतं?’ असे प्रश्न स्वतःला विचारून जिथे ‘खऱ्या प्रसंगांमध्ये जो माणूस चुकला होता ते मी नक्कीच केलं नसतं’ हे तो स्वतःलाच परत परत समजावतो आणि एका प्रकारे त्या प्रसंगांमध्ये स्वतःच्या मनावर ताबा मिळवण्याचा तंत्र आत्मसात करत असतात.
मनावर ताबा मिळवण्यासाठी तुम्ही मुलांची घरगुती ‘मार्शमेलो टेस्ट’ घेऊ शकता. तसं तर आपण मुलाला कळायला लागल्यापासून त्याची मार्शमेलो टेस्ट घेत असतो. “तू अमुक केलं तर मी तुला तमुक देईल, तू अभ्यास नीट केला तर मी तुला चॉकलेट देईल, इतके टक्के मार्क मिळवले की मी तुला सायकल देईल, दहावीला 80 टक्क्यांच्या वर गेला तर तुला मोबाईल देईन” ही सगळी मार्शमेलोची गाजर लहानपणापासूनच आपण त्यांना दाखवत असतो. कालांतराने हे आपल्याला कधीही मिळणार नाही याची खात्रीही मुलांना झालेली असते आणि मग मुलं आपल्यावर विश्वास ठेवणंच बंद करतात. जर तुम्ही त्यांना त्यांच्या वागणुकीसाठी काही बक्षीस कबूल केलं असेल तर ते मोकळ्या मनाने द्या. बक्षिसाच्या अपेक्षेने नाही पण ‘मी हे करून दाखवलं तर माझ्या आई वडिलांना आनंद होणार आहे’ या जाणिवेने मुलं मनापासून ‘ती’ गोष्ट साध्य करण्याचा प्रयत्न करत असतात. जेव्हा आपण आपला शब्द मोडतो तेव्हा “प्रॉमिसेस आर मेन्ट टु बी ब्रोकन” अर्थात शब्द हे मोडण्यासाठीच असतात हा एक शिरस्ता आपणच मुलांना घालून देतो. असे प्रसंग वारंवार घडायला लागले कि मुलांचा संयम सुटायला लागतो अर्थातच मनावर ताबा राहत नाही. घरगुती मार्शमेलो टेस्ट घेण्यासाठी तुम्ही जर तयार असाल तर त्याचा उपयोग तुमच्या घरातील लहानग्यांना त्यांच्या भावी आयुष्यासाठी नक्कीच होणार आहे.
आपल्याला अपेक्षित असणारा बदल एका रात्रीत घडून येईल अशी अपेक्षा ठेवणंच गैर आहे. कित्येक वेळा मुलांमध्ये बदल घडत असतांना आपल्या सहनशक्तीचा अंत बघितला जातो. ‘टिच यूअर चिल्ड्रन वेल’ या पुस्तकात म्हटल्याप्रमाणे “मुलांची शिकण्याची प्रक्रिया मंदगतीने चालत असली तरी तुम्हाला मुलात बदल होताना दिसतील. कधीतरी मूल पुन्हा पूर्वीसारखं वागू लागेल पण हळूहळू स्वतःवर ताबा ठेवायला शिकेल. अशी जी मुलं लहानपणापासूनच स्वतःवरचा ताबा ठेवायला शिकतात ती युवा अवस्थेत कुठल्याही व्यसनाला ठामपणे नकार द्यायला शिकतात.”
आपला हेतू साध्य करण्यासाठी मुलांना त्यांच्या मनावर ताबा मिळवता येण्यासाठी नक्कीच काही वेळ जाऊ द्यावा लागेल. मुलांच्या मनावर ताबा ठेवायला किंवा संयम शिकवायला अमुक वय योग्य आणि अमुक वय अयोग्य असं कुठलंही मोजमाप लावता येत नाही. अगदी लहान बाळांनासुद्धा आपण संयम ठेवायला शिकवू शकतो. दुकानात असतांना तुमचं मूल हट्ट करून, जोरजोरात हात पाय आपटून, रडून-रडून चॉकलेट मागतं आणि तुम्ही मुलाला समजावून न सांगता पटकन त्याला ते चॉकलेट विकत घेऊन देता तेव्हा “रडल्यावर हवी ती गोष्ट आपल्याला मिळू शकते” अशी शिकवण तुम्ही मुलाला नकळत दिलेली असते. मग पुढच्या वेळी मुलाला एखादी गोष्ट हवी असेल तर ते परत रडून ओरडून हट्ट करुन ती गोष्ट मिळवतात. त्याला माहित असतं कि मागच्या वेळेला मी रडल्यावर माझी आवडती गोष्ट मला लगेच मिळाली होती. कुठलीही शिकवण मुलांना देतांना तुम्हाला मुलांचं नीट निरीक्षण करावं लागेल. एखाद्या प्रसंगांमध्ये तुमच्या मुलांनी हट्ट केला नाही, रडणं अपेक्षित असून, न रडता प्रसंग निभावून नेला तर त्यांच्या या वागण्याचं त्यांना योग्य ते बक्षीस द्या आणि ते बक्षीस देण्यामागचं कारण प्रसंगासहित स्पष्ट करा. ज्यायोगे मूलं पुढच्या प्रसंगाला सामोरे जाताना मागच्या अनुभवांची शिदोरी वापरतील. काही पालक मुले रडायला लागली की त्याला हवं ते हातात देतात कारण तो मार्ग पालकांना सोपा वाटतो , मूलं मागत असलेली गोष्ट न देऊन आपण मुलांवर अन्याय करतो आहोत असंही काही पालकांना वाटतं, काही ठिकाणी ‘आम्हाला मिळालं नाही ते सगळं आमच्या मुलांना द्यायचं आहे’ या विचाराने काही पालक मुलांचे अवास्तव हट्ट पूर्ण करत असतात. खरंतर पालकांच्या अशा वागण्यामुळेच पुष्कळदा मुलं चांगल्या सवयी लागण्यापासून दूर राहतात. आपल्या प्रयत्नांना प्रतिसाद देत मुलं जर मनावर ताबा ठेवायला शिकली तर मुलांचा आत्मसंयम सुद्धा चांगला होतो ज्यामुळे काही गोष्टी मिळवण्यासाठी थांबून राहणं, आपल्या इच्छांवर आळा घालणं, कधीकधी न आवडणारे काम देखील मनापासून करणं आणि आपल्यापेक्षा जास्त महत्त्व इतरांच्या गरजांना देणं मुलांना जमायला लागतं.
ज्या मुलांमध्ये आत्मसंयम हा गुण असतो ते कुठल्याही मोहाच्या आहारी जात नाहीत आणि मोहाचा चांगल्या प्रकारे प्रतिकार करू शकतात. आत्मसंयम नसणारी मुलं पुढे जाऊन रागीट बनतात. त्यांना नैराश्य फार लवकर येतं. कुठल्यातरी व्यसनाच्या आहारी जाण्याची भीती असते.
“सगळ्यांसमोर हट्ट करून किंवा रडून आई-वडिलांच्या धीराची परीक्षा घेतली तर आई वडील आपल्या समोर हात टेकतात आणि आपल्याला हवे ते सगळे मिळते” या ऐवजी “आपल्याला जे हवं असतं ते नेहमीच मिळत नाही. कधीतरी आपल्याला तडजोड करावी लागते.” हा धडा मुलांना द्यायला हवा. ज्यांनी हा धडा मिळवला आहे ते इतर मुलांपेक्षा जास्त सुखी असतात.
आपल्या वागण्या बोलण्याचा परिणामांना पुढे जाऊन आपल्यालाच सामोरं जायचं असतं आणि आत्मसंयम बाळगून मनावर ताबा ठेवला नाही तर त्याचे वाईट परिणाम दिसू शकतात हे मुलांना समजणे गरजेचे आहे. जेव्हा तुमचं मूल हट्टीपणा न करता एखादी गोष्ट मागतो तेव्हा त्याच्या या कामाबद्दल त्याला बक्षीस द्या कारण असं करून तुम्ही मुलाला समाजात व्यवस्थित वागायचे धडे देत असतात आणि त्याच बरोबर स्वतःच्या मनावर ताबा ठेवायलाही शिकवत असता. आत्मसंयम म्हणजे फक्त वाईट गोष्टी करण्यापासून स्वतःला थांबवण असं नाही तर मनावर ताबा ठेवून गरजेच्या गोष्टी प्राधान्याने करणं असा देखील घेता येईल. जी गोष्ट अत्यावश्यक आहे, ती गोष्ट आपल्याला करायला आवडत नसेल तरीही ती गोष्ट मनापासून करता यायला हवी.
एक लक्षात ठेवा, वादविवादाच्या परिस्थितीत किंवा राग उत्पन्न करणाऱ्या प्रसंगात तुम्ही कसे वागता हे तुमची मुलं बघत असतात आणि अशा परिस्थितीत जेव्हा तुम्ही मनावर ताबा ठेवून आत्मसंयम बाळगता तेव्हा त्याचे चांगले परिणाम देखील तुमची मुलं बघत असतात.
मन उधाण वाऱ्याचे
गूज पावसाचे
का होते बेभान
कसे गहिवरते
या ओळींमध्ये मनात एक सोसाट्याचा वारा सुटलेला असतो, त्याचवेळी मनात पावसाचा ओलावाही असतो, आपलं मन का, कसं आणि कुठे बेभान होतं ते आपल्या लक्षात येत नसतं आणि जेव्हा लक्षात येतं तेव्हा परत आपलं ते बेभान मनच क्षणात गहिवरून येतं हे किती गंमतीशीर आहे! तितकंच गंमतीशीर मुलांना मनावर ताबा ठेवायला शिकवणंही आहे. चला, तर मग या न दिसणाऱ्या मन नामक अवयवावर आपले प्रयोग सुरू करूया!
तुमच्या मुलांबद्दलचे प्रश्न तुम्ही ई-मेल किंवा व्हाट्सअप करून मला विचारू शकता. भेटूया मग पुढच्या सदरामध्ये एका नवीन विषयासह!
आदिती मोराणकर (शिक्षण विश्लेषक)
संचालिका : ईस्कुलिंग व्हर्च्युअल डिजीस्मार्ट किंडरगार्टन.
eskooling2020@gmail.com | 8329932017 / 9326536524
https://www.instagram.com/theblooming.minds/
खूपच मार्मिक लिखाण व वाचनिय लेख. लेखिकेने ज्या बारकाईने मुद्दे मांडले आहेत त्यामुळे ते समजण्यास सहज व अवलोकनिय वाटतात. आज पालक म्हणून आपण स्वतःला व आपल्या पाल्यातील उद्याचा सुजाण पालक घडविण्यास उपयुक्त असा हा लेख डोळ्यात अंजन घालणारा ठरतो. लेखिकेचे विशेष कौतुक व या विषयासंबंधी वरचेवर प्रसारीत केलेल्या माहितीबद्दल मनःपूर्वक आभार.