नाशिक – नाशिकच्या क्रिकेट क्षेत्रासाठी अतिशय आनंदाची व अभिमानास्पद बातमी नाशिक जिल्हा क्रिकेट संघटनेच्या विविध पदाधिकाऱ्यांची महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन वर महत्वाच्या पदांवर निवड झाली आहे.
महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या अतिशय महत्त्वाच्या क्रिकेट ऑपरेशन कमिटी – सी ओ सी – वर नाशिकचे रणजी पटू प्रशांत राय यांची सलग दुसर्यांदा निवड झाली आहे. क्रिकेट ऑपरेशन कमिटी ही महाराष्ट्र क्रिकेटचा विकास होण्याच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे निर्णय घेण्याचे काम करते. प्रशांत राय यांनी यापूर्वी महाराष्ट्र रणजी संघाचे निवड समिती सदस्य तसेच २३ वर्षाखालील संघाचे निवड समिती सदस्य आणि १९ व १६ वर्षांखालील संघाचे निवड समिती चे चेअरमन म्हणून काम बघितले आहे.
नाशिक जिल्हा क्रिकेट संघटनेचे सेक्रेटरी समीर रकटे यांची सलग आठव्या वर्षी महाराष्ट्राच्या स्पर्धा समितीवर निवड झाली आहे.किरण उर्फ के व्ही जोशी यांची महाराष्ट्र रणजी संघाचे निवड समिती सदस्य पदी निवड झाली आहे. किरण जोशी ह्यांनी हयापूर्वी देखील महाराष्ट्र संघाचे १९ वर्षांखालील निवड समिती चे सदस्य म्हणुन बरीच वर्षे काम केले आहे.
तर नाशिकचे रणजीपटू भगवान काकड यांची सलग दुसऱ्यांदा महाराष्ट्राच्या १९ वर्षा खालील निवड समिती सदस्य म्हणून निवड झाली.तर रणजीपटु शेखर घोष ह्यांची देखील १९ वर्षाखालील महाराष्ट्र संघाचे प्रशिक्षक म्हणुन पुन्हा नियुक्ती झाली आहे. शेखर घोष ह्यांना हयापूर्वी देखील रणजी २३, १९ व १६ वर्षांखालील महाराष्ट्र संघाचे प्रशिक्षक म्हणून काम केल्याचा अनुभव आहे.
तसेच नाशिकच्या विनोद यादव ची महाराष्ट्राच्या २५ वर्षाखालील क्रिकेट संघासाठी फिजिकल ट्रेनर पदी निवड झाली आहे. हयापूर्वी देखील विनोद यादव यांनी १६ व २३ वर्षांखालील संघाचे ट्रेनर पद भूषविले होते. विनोद यादव गेल्या तीन वर्षांपासून नाशिक जिल्हा क्रिकेट संघटनेच्या पुरुष व महिला खेळाडूंना शारीरिक तंदुरुस्तीसाठी मार्गदर्शन करीत आहेत.
नाशिक क्रिकेटच्या सदर महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन वरील राज्यस्तरीय निवडींमुळे नाशिक जिल्हा क्रिकेट संघटनेत आनंदाचे वातावरण तयार झाले आहे. नाशिक जिल्हा क्रिकेट संघटनेचे चेअरमन विनोद शहा व जिल्हा क्रिकेट संघटनेच्या पदाधिकारी व सदस्यांनी सर्वांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या आहेत.