ज्येष्ठ पत्रकार दिनकर रायकर यांचे निधन

0

मुंबई – ज्येष्ठ पत्रकार आणि संपादक दिनकर रायकर यांचे आज पहाटे अल्पशा आजाराने निधन झाले. ते ८० वर्षांचे होते. दिनकर रायकर हे तब्बल पन्नास वर्षांहून अधिक काळ पत्रकारितेत सक्रिय होते.काही दिवसांपूर्वी  दिनकर रायकर यांना डेंग्यू आणि कोरोनाची लागण झाली होती.डेंग्यू बरा झाला मात्र फुफुसात इन्फेक्शन झाले होते. त्यांच्यावर नानावटी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु होते  अखेर आज पहाटे त्यांची प्राणज्योत मालवली.

दिनकर रायकर हे लोकमत वृत्तपत्राचे समन्वयक संपादक  होते. सक्रिय मराठी पत्रकारितेत त्यांचं दीर्घकाळ योगदान राहिलं. गेली काही वर्षे त्यांनी दैनिक लोकमतमध्ये समूह संपादक म्हणून जबाबदारी सांभाळली.रायकर यांची गुरुवारी रात्री आरटी-पीसीआर टेस्ट निगेटिव्ह आली होती. मात्र पहाटे श्वास घेण्यासाठी त्रास होऊ लागला. पहाटे तीन वाजता त्यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे.

रायकर यांनी इंडियन एक्स्प्रेसमधून पत्रकारितेला सुरुवात केली होती.दैनिक लोकसत्तामधून निवृत्त झाल्यावर त्यांनी लोकमत समूहामध्ये संपादकपदाची जबाबदारी सांभाळली. रायकर हे मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघ तसेच मुंबई प्रेस क्लबचे माजी अध्यक्ष देखील होते. त्यांना मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाच्या कृ. पां. सामक जीवनगौरव पुरस्काराने रायकर यांना सन्मानित करण्यात आले होते. महाराष्ट्र शासनाचा जीवनगौरव पत्रकारिता पुरस्कारही त्यांना मिळाला होता.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची ज्येष्ठ पत्रकार दिनकर रायकर यांना श्रद्धांजली

पत्रकारितेच्या क्षेत्रात मूल्यांचे जतन व्हावे आणि आधुनिक प्रवाह रूजावेत यासाठी योगदान देणारा संपादक गमावला, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ज्येष्ठ पत्रकार, संपादक दिनकर रायकर यांना  श्रद्धांजली  वाहिली आहे.

इंग्रजी, मराठी पत्रकारितेच्या क्षेत्रात काम करताना दिवंगत रायकर यांनी जुन्या आणि नव्या पिढ्यांना सांधणारी मार्गदर्शकाची भूमिका उत्तमरीत्या बजावली. त्यामुळे मराठी पत्रकारितेच्या मूल्यांचे जतन आणि जगभरातील आधुनिक प्रवाह रूजावेत यासाठीचे त्यांचे प्रयत्न यशस्वी ठरले. नवनवीन आशय संकल्पना, विषयांची मांडणी यासाठी त्यांनी होतकरू तरुणांना संधी दिली. यामुळे पत्रकारितेत एक नवी प्रयोगशील पिढी उभी राहिली, असेही  मुख्यमंत्र्यांनी शोकसंदेशात म्हटले आहे.

दिनकर रायकर साक्षेपी, संयत पत्रकार, संपादक- राज्यपाल भगतसिंह कोश्यारी 

ज्येष्ठ संपादक व पत्रकार दिनकर रायकर यांच्या निधनाबद्दल राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी दुःख व्यक्त केले आहे.
दिनकर रायकर हे अभ्यासू, साक्षेपी व संयत पत्रकार व संपादक होते. पत्रकारितेच्या प्रदीर्घ वाटचालीत अनेक वृत्तपत्रांमध्ये काम करताना रायकर यांनी आपल्या कार्याचा वेगळा ठसा उमटवला. संपादक म्हणून वाचकांचे प्रबोधन करताना त्यांनी टोकाच्या भूमिका घेतल्या नाही. राज्यातील अनेक पत्रकारांच्या जडणघडणीत त्यांचे योगदान अत्यंत मोलाचे होते. त्यांच्या निधनामुळे महाराष्ट्राच्या माध्यम जगतातील एका व्यासंगी पत्रकार – संपादकाला तसेच समाजाशी बांधिलकी जपणाऱ्या मनमिळावू व्यक्तीला आपण मुकलो आहोत, असे राज्यपालांनी आपल्या शोकसंदेशामध्ये म्हटले आहे.

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!