६० मुलींना समाजातून मिळाले शिक्षणासाठी पालकत्व

0

नाशिक मनपा शिक्षिकेचा अभिनव सामाजिक उपक्रम..!!

नाशिक – अन्न,वस्त्र,निवारा इतकीच शिक्षण सुद्धा मुलभूत बाब असून मुलांच्या उज्वल भविष्यासाठी उच्च शिक्षण घेणे खूप आवश्यक असते परंतु गरीब कुटुंबातील आणि कोविडच्या संकटकाळात जगणंच अवघड झालेल्या पालकांची परिस्थिती अजूनच वाईट झालेली असल्याने त्यातही मुलगी असल्यामुळे दुर्लक्षित केल्या गेलेल्या आपल्या विद्यार्थिनी शिक्षणापासून वंचित राहत आहेत हे चित्र बघून व्यथित झालेल्या नाशिक मनपाच्या कुंदा बच्छाव या शिक्षिकेने मुलीच्या शिक्षणासाठी एक अभिनव सामाजिक उपक्रम हाती घेऊन तो यशस्वी केला आहे.

नाशिक महानगर पालिकेच्या शाळेतील शिक्षिका कुंदा बच्छाव शिंदे ह्या मनपा शाळा क्रमांक १८ आनंदवल्ली येथे शिक्षिका असून आपल्या शाळेतील आठवीपर्यंत शिक्षण घेऊन गेलेल्या विद्यार्थिनी पुढे पदवीपर्यंत शिकून नोकरी व्यवसाय करून स्वावलंबी तर होत नाहीच उलट शिक्षण मधेच बंद होऊन कमी वयातच त्यांचे लग्न लावून दिले जात आहे हे विदारक चित्र त्यांना समाजात दिसले. त्यांचे शिक्षण बंद होण्याची कारणे शोधल्यावर त्यातील मुख्य कारण होतं ते त्यांची बिकट आर्थिक परिस्थिती आणि यामुळे या विद्यार्थिनींची शिक्षणातील गळती व बालविवाह अशा दोन्ही समस्या समाजात निर्माण झालेल्या त्यांना दिसल्या. आपल्या या गरीब पण हुशार ,होतकरू विद्यार्थिनीसाठी काहीतरी करायचे असे ठरवून त्यांनी या विद्यार्थ्यांना शैक्षणिक पालकत्व देवून त्यांची शैक्षणिक जबाबदारी उचलण्याचे ठरवले.

त्यासाठी सुरुवातीला त्यांनी स्वतः तीन विद्यार्थिनी व त्यांचे पती किरण शिंदे यांनी एक विद्यार्थिनी शिक्षणासाठी दत्तक घेतली. पण त्यांच्या सभोवती अशा अनेक हुशार व गरजू विद्यार्थिनी होत्या ज्यांना शिकण्याची जिद्द होती परंतु आर्थिक परिस्थितीमुळे त्यांचे शिक्षण बंद होण्याची वेळ आली होती या विद्यार्थिनींना शैक्षणिक मदतीची गरज होती. अशा विद्यार्थिनीसाठी मदत म्हणून त्यांनी शैक्षणिक पालकत्व.. एक हात मदतीचा..!! हे अभियान सामाजिक स्तरावर मोठ्या पातळीवर राबवायचे ठरवले.

श्रीमती बच्छाव यांना त्यांच्या अभियानात त्यांच्या मैत्रिण शिक्षिका श्रीमती वैशाली भामरे ह्याळीज याही जोडल्या गेल्या. त्यांनीही दोन विद्यार्थीनीना शिक्षणासाठी दत्तक घेतले. मनपा शिक्षक श्री.प्रशांत पाटील हे ही या अभियानास जोडले गेले.या सगळ्यांनी हे अभियान मोठ्या स्तरावर राबवून जास्तीत जास्त विद्यार्थीनीना समाजातून मदत मिळवून द्यायचे ठरवले.

त्यानंतर कुंदा बच्छाव यांनी सोशल मीडियाचा वापर करत समाजातून या विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी मदत करण्याचे आवाहन केले व त्यांच्या या विनंतीवजा आवाहनाला समाजातून भरभरून प्रतिसाद मिळाला. नाशिक जिल्ह्याचे जिल्हाधिकारी मा.श्री.सुरज मांढरे यांनी पाच विद्यार्थिनी, मा.सौ पुजा राम लिपटे यांनी पाच विद्यार्थिनी,विभागीय आयुक्त मा. राधाकृष्ण गमे ,मा.श्री.विलास आण्णा शिंदे यांनी तसेचमा. श्री उदय गायकवाड,श्री.किरण विधाते,श्री.आशिष जैन, सौ.सोनल पाटील,श्री.किशोर ललवाणी, सौ.रीना चौरे यांनी सगळ्यांनी माणुसकीच्या नात्याने पुढे येऊन या विद्यार्थ्यांना त्यांच्या शिक्षणासाठी शैक्षणिक पालकत्व दिले.

 

त्याचबरोबर रोटरी क्लब ऑफ नाशिक यांनी ८ विद्यार्थिनी तर मा. नयनाताई गांगुर्डे यांच्या पुढाकाराने ‘इनरव्हील क्लब जेन नेक्स्ट, नाशिक’ यांनी वीस विद्यार्थ्यांची पुढील चार वर्षासाठी शिक्षणाची जबाबदारी घेवून त्यांचे शैक्षणिक पालकत्व स्वीकारले. रणरागिणी मराठा ग्रुप यांनीही काही गरजू विद्यार्थीनीना शैक्षणिक साहित्य वाटप केले. अशाप्रकारे श्रीमती कुंदा बच्छाव यांनी सुरू केलेल्या शैक्षणिक पालकत्व या अभियानास समाजातून एकेक दानशूर व्यक्ती जोडले जाऊन माणुसकीची मोठी साखळी तयार झाली आहे.

 

या अभियाना अंतर्गत ६० गरजू व हुशार विद्यार्थीनीना शैक्षणिक पालकत्व मिळाले असून या आर्थिक मदतीतून नुकतेच कोरोनाचे नियमांचे पालन करून काही विद्यार्थीनीना प्रातिनिधिक स्वरुपात शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. पाटील लॉन्स ,सोमेश्वर येथे आयोजित या कार्यक्रमास नाशिक मनपा शिक्षण समितीच्या शिक्षण सभापती मा.संगीता गायकवाड, शिक्षण विभागाच्या प्रशासनाधिकारी मा.सुनिता धनगर ,असिस्टंट चारिटी कमिशनर मा.श्री राम लिप्ते, आनंदवल्ली प्रभागाचे नगरसेवक तथा गटनेते शिवसेना श्री विलास अण्णा शिंदे, नगरसेवक श्री संतोषभाऊ गायकवाड, नगरसेविका नयनाताई गांगुर्डे, नगरसेविका राधाताई बेंडकुळे, सकाळ तनिष्का समूहाचे जिल्हा समन्वयक श्री विजयकुमार इंगळे, मनपा शाळा क्रमांक १८ आनंदवलीचे केंद्रमुख्याध्यापक श्री कैलास ठाकरे,सुनीलभाऊ हांडगे,संजय काकड,विष्णुपंत बेंडकोळी व पालक उपस्थित होते..

 

भविष्यात मनपा शाळेतून शिकून बाहेर पडलेल्या नाशिकमधील जास्तीत जास्त गरीब पण हुशार व होतकरू विद्यार्थ्यांना त्यांचे उच्च शिक्षण घेवून स्वतःच्या पायावर उभे राहता यावे व एक आदर्श व शिक्षित समाज निर्माण व्हावा यासाठी कर्मदान फाउंडेशन च्या माध्यमातून हे अभियान राबविले जाणार असून समाजातून जास्तीत जास्त दानशूर व्यक्तींनी, त्याचप्रमाणे या गरीब लेकरांसाठी आपल्याला हवे त्या माध्यमातून योगदान देवू इच्छिणाऱ्या व्यक्तींनी या अभियानाचा भाग जरूर व्हावे असे आवाहन कुंदा बच्छाव, वैशाली ह्याळीज व श्री.पाटील यांनी केले आहे.

 

नाशिक शहरातून प्रथमच राबविले जाणारे शैक्षणिक पालकत्व या प्रशंसनीय अशा अभियानाद्वारे उच्चशिक्षित नागरीक घडविला जाणार असून त्यायोगे समाजाच्या व परिणामी भारत देशाच्या विकासास नक्कीच हातभार लागणार आहे यात शंकाच नाही. जास्तीत जास्त नागरिकांनी समाजऋणफेडण्याची संधी असलेल्या या अभियानात नक्की सहभागी व्हावे.तसेच इच्छुकांनी ९४२०६९५०६५ या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन कुंदा बच्छाव यांनी केले आहे.

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.