नाशिक– गेल्या २४ तासात नाशिक जिल्ह्यात काही भागात प्रचंड पाऊस झाला असून, काल रात्रीपासून सर्व शासकीय व निमशासकीय यंत्रणांशी समन्वयाने माहिती संकलनाचे काम सुरू आहे. शासन-प्रशासनाला मनुष्यासह सर्व जिवीतांची काळजी असून अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच नागरिकांनीही प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन राज्याचे अन्न नागरी पुरवठव व ग्राहक कल्याण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केले आहे.
आज २८ आणि २९सप्टेबर या दिवशी झालेल्या अतिवृष्टीमुळे पूरग्रस्त भागाची नाशिक शहरातील मालेगाव स्टॅण्ड पंचवटी परिसरात पाहणी करतांना पालकमंत्री श्री. भुजबळ बोलत होते. यावेळी महानगरपालिका आयुक्त कैलास जाधव, पोलीस उपायुक्त अमोल तांबे, जलसंपदाचे कार्यकारी अभियंता सागर शिंदे व विविध यंत्रणांचे अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी बोलतांना पालकमंत्री भुजबळ म्हणाले की, गेल्या अनेक वर्षांपासून अतिवृष्टीमुळे गोदावरी नदीला महापूर येण्याचे प्रसंग वेळोवेळी उदभवतात. त्या पार्श्वभूमीवर महानगरपालिका, जिल्हा महसूल प्रशासन, जिल्हा पोलीस प्रशासन व जलसंपदा विभाग आपआपल्या आदर्श कृती आराखड्याप्रमाणे काम करत असतात. काल रात्रीपासून जिल्ह्यात विविध ठिकाणी होत असलेल्या अतिवृष्टी व परिस्थितीचा आढावा वेळोवेळी यंत्रणांच्या संपर्कातून घेतला जात असून, जिल्ह्यात कुठेही मनुष्यहानी झाल्याची माहिती दिसून येत नाही. काही भागात दुकाने व घरांमध्ये पाणी शिरले आहे. मात्र काही ठिकाणी चार ते पाच जनावरे मृत्यूमुखी पडलेले आहेत.
लासलगाव, येवला, नांदगाव, मालेगाव परिसरात रात्री मोठ्या प्रमाणावर पावसामुळे जनजीवनावर परिणाम झाला असून, लासलगाव येथे हॉस्पिटल्समध्ये पाणी शिरून डॉक्टर्स, पेशंटस व परिचारिका अडकून पडले होते. ज्या ज्या ठिकाणी नुकसान झाले आहे, त्या जिल्ह्यातील प्रत्येक ठिकाणचे पंचनामे करण्यासाठी माहिती संकलनाचे काम संबंधित यंत्रणांमार्फत सुरू असून अतिवृष्टी आणि त्यामुळे रस्त्यांमध्ये निर्माण झालेल्या अडथळ्यांमुळे यंत्रणा हळूहळू पोहचते आहे. अशाही परिस्थितीत झालेल्या नुकसानीचे पंचनामे तात्काळ करण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत असेही यावेळी पालकमंत्री श्री. भुजबळ म्हणाले.
गोदावरी नदीला असलेली महापुराची पार्श्वभूमी पाहता नागरिकांनी अधिक सतर्क राहून स्व:ताची काळजी घ्यावी. पाऊस अजून संपलेला नाही, धरणक्षेत्रात अद्यापही पाऊस सुरू आहे. त्यामुळे जिल्ह्यातील धरणातील पाण्याचा विसर्ग परिस्थितीनुसार हळूहळू सुरू आहे. मनपा, महसुल, पोलीस व जलसंपदा विभागसह जिल्हा प्रशासन नागरिकांच्या मदतीसाठी कार्यरत आहे. असेही यावेळी पालकमंत्री श्री. भुजबळ यांनी सांगितले.