संगीत क्षेत्रात अभिमानाचा क्षण-नाशिकच्या गुरू-शिष्यांचा पुण्यात सन्मान
मानाच्या पुरस्काराने विदुषी मंजिरी असनारे-केळकर आणि देवश्री नवघरे-भिडे यांचा गौरव

नाशिक, दि. ३१ ऑक्टोबर २०२५ – Marathi Music Awards संगीत क्षेत्रात नाशिकच्या परंपरेचा गौरव वाढवणारा एक अनोखा क्षण येत्या रविवारी पुण्यात रंगणार आहे. प्रतिष्ठित ‘पुणे भारत गायन समाज’ या शतकोत्तर संस्थेच्यावतीने दिला जाणारा पंडित भास्करबुवा बखले स्मृती पुरस्कार यावर्षी नाशिकच्या प्रसिद्ध गायनगुरू विदुषी मंजिरी असनारे-केळकर आणि त्यांच्या शिष्या देवश्री नवघरे-भिडे यांना जाहीर झाला आहे.
हा मानाचा सन्मान रविवार, दि. २ नोव्हेंबर २०२५ रोजी पुण्यातील प्रा. केतकर सभागृहात एका संगीत सोहळ्यात प्रदान करण्यात येणार आहे. नाशिकच्या गुरु-शिष्य जोडीचा एकाच मंचावर सन्मान होणे हा नाशिकसाठी अभिमानाचा क्षण मानला जात आहे.
या पुरस्कार सोहळ्याच्या निमित्ताने सकाळी १० वाजल्यापासून एकदिवसीय संगीत महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. या महोत्सवाची सुरुवात देवश्री भिडे यांच्या गायनाने होणार असून, महोत्सवाचा समारोप त्यांच्या गुरू विदुषी मंजिरी असनारे-केळकर यांच्या सुमधुर गायनाने होईल.
पुणे भारत गायन समाज’ ही संस्था गेली ११४ वर्षे भारतीय संगीत परंपरेच्या जतन आणि प्रसारासाठी कार्यरत आहे. संस्थेच्यावतीने दरवर्षी संगीत क्षेत्रातील मान्यवर कलाकारांना विविध पुरस्कारांनी(Marathi Music Awards) गौरवण्यात येते. यंदा प्रसिद्ध गायिका कै. माणिक वर्मा पुरस्कारासाठी विदुषी मंजिरी असनारे-केळकर यांची निवड झाली असून, त्यांच्या शिष्या देवश्री नवघरे-भिडे यांना कै. मालती पांडे-बर्वे पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.
या विशेष कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून पद्मश्री पं. सत्यशील देशपांडे उपस्थित राहणार आहेत. संगीत क्षेत्रातील अनेक मान्यवर, कलाकार आणि रसिक मंडळी या सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत.
नाशिकच्या सांगीतिक इतिहासात या पुरस्कारामुळे एक नवा मानाचा तुरा रोवला गेला आहे. गुरू-शिष्य या दोघींचा एकत्र सन्मान, शिष्येच्या गायनाने सुरुवात आणि गुरूंच्या गायनाने सांगता — हा संगीतविश्वातील दुर्मिळ आणि प्रेरणादायी योग ठरणार आहे.


