आता मी राष्ट्रीय राजकारणात : महाराष्ट्राचे नेतृत्व देवेंद्र फडणवीसांकडे – विनोद तावडे
नवी दिल्ली (निवेदिता मदाने-वैशंपायन) -राष्ट्रीय राजकारणात आता सक्रीय राहणार असून, महाराष्ट्रातील भारतीय जनता पक्षाचे नेतृत्व देवेंद्र फडणवीस करतील, अशी स्पष्टोक्ती राज्याचे माजी मंत्री आणि भारतीय जनता पक्षाचे नवनियुक्त राष्ट्रीय महासचिव विनोद तावडे यांनी नवी दिल्ली येथे केले. आपल्या सगळ्यांच्या सदिच्छा आशीर्वादाचे फलित ही नियुक्ती आहे. राष्ट्रीय सरचिटणीसपदी नियुक्ती झाल्याच्या आभार आणि स्वागताच्या पार्श्वभूमीवर .तावडे यांनी नवीन महाराष्ट्र सदन येथे पत्रकारांशी संवाद साधला.
ते म्हणाले, ‘‘ २०१९ मध्ये विधानसभेचे तिकिट मला मिळाले नाही परंतु पक्षाचं काम मी सुरु ठेवले, भारतीय जनता पक्षाने वेळोवेळी दिलेली जबाबदारी स्वीकारली. आता मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या टीमचा भाग झालो आहे. राष्ट्रीय पातळीवर माझी जवाबदारी वाढली आहे. केंद्रातील नेतृत्वाशी सन्मवय साधणे, त्यांच्या मार्गदर्शनाचा अनुभव मला पुढील कार्यात निश्चित होईल. महाराष्ट्रात देवेद्रं फडणवीस, चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली पक्षाचं कार्य चालेल. राज्यात जेव्हा माझे योगदान मागितले जाईल, तेव्हा मी ते नक्कीच देईल.’’
तीन कृषी कायदे रद्द केले म्हणजे सरकार घाबरले का, या प्रश्नावर श्री. तावडे म्हणाले, ‘‘कायदे मागे घेणे हे देशाच्या हिताचे वाटले म्हणून ते मागे घेण्यात आले आहेत.’’ पंकजा मुंडे या नाराज आहेत, त्यांना विधान परिषदेची उमेदवारी देणार का या प्रश्नावर, ‘‘पंकजा मुंडे यांना विधान परिषदेची आवश्यकता आहे, असे वाटत नाही.’