सुप्रसिद्ध व्हायोलिन वादक,संगीतकार प्रभाकर जोग यांचे निधन

0

पुणे – सुप्रसिद्ध  व्हायोलिनवादक आणि संगीतकार प्रभाकर जोग यांचं आज सकाळी पुण्यात त्यांच्या राहत्या घरी निधन झालं आहे. ते ८९ वर्षांचे होते. प्रभाकर जोगांच्या व्हायोलिन वादनातून जणू शब्द ऐकू येतात, गाणाऱ्या व्हायोलिनचे जादूगार अशी त्यांची ओळख होती. त्यांनी या नावाने अनेक ठिकाणी कार्यक्रमही केले होते.जोग यांच्या निधनाने गाणारे व्हायोलिन अबोल झाले आहे.

संगीतकार, संगीत संयोजक आणि व्हायोलिन वादक म्हणून तब्बल सहा दशकांहून जास्त वर्षे कार्यरत असलेल्या प्रभाकर जोग यांचे मराठी आणि हिंदी चित्रपट संगीताबरोबरच भावसंगीतातही मोलाचे योगदान आहे. वयाच्या बाराव्या वर्षी त्यांनी पुण्यात वाडय़ांमधून सव्वा रूपया आणि नारळाच्या बिदागीवर व्हायोलिन वादनाच्या कार्यक्रमांना सुरूवात केली. पुढे ते संगीत दिग्दर्शक सुधीर फडके यांचे सहाय्यक झाले. बाबुजींबरोबर गीतरामायणाच्या जवळपास पाचशे कार्यक्रमांना त्यांनी साथ दिली.

आज दुपारी ११ ते २ या वेळात पुण्यातील त्यांच्या राहत्या घरी प्रभाकर जोग यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. तर दुपारी दोन वाजता वैकुंठ स्मशानभूमी येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत.

प्रभाकर जोग यांना मिळालेले पुरस्कार 

  • पुण्याच्या भारत गायन समाजातर्फे दिला जाणारा वसुंधरा पंडित पुरस्कार (२०१३)
  • महाराष्ट्र सरकारतर्फे दिला जाणारा गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार (२०१५)
  • कैवारी, चांदणे शिंपीत जा आणि सतीची पुण्याई या चित्रपटांना दिलेल्या संगीताला ’सूरसिंगार पुरस्कार’
  • अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या वतीने नेत्रदीपक ‘चित्रकर्मी’ पुरस्कार (जुलै २०१७)
  • २०१७ सालचा गदिमा पुरस्कार

गाणारे व्हायोलिन मूक झाले; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची ज्येष्ठ संगीतकार, व्हायोलिन वादक प्रभाकर जोग यांना श्रद्धांजली

प्रभाकर जोग यांच्या निधनाने गाणारे व्हायोलिन आता मूक झाले आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या शोकभावना व्यक्त केल्या.

व्हायोलिनला गायला लावणारा, शब्दांपलिकडे जाऊन त्यातून आर्त आणि हळव्या भावना व्यक्त करण्याची किमया साधणारा संगीत क्षेत्रातील एक सच्चा साधक आपण गमावला आहे. गदिमांच्या गीतरामायणातील अनेक प्रसंग जोग यांनी आपल्या व्हायोलिनच्या सुरावटींमधून जिवंत केले. त्यांच्या व्हायोलिनचे  सूर आजही अनेकांच्या मनात रुंजी घालतात. संगीतकार सुधीर फडके यांचे सूर आणि त्यांना व्हायोलिनद्वारे साथसंगत करणारे प्रभाकर जोग अशी अनोखी पर्वणी कित्येक पिढ्यांसाठी राहिली आहे. संगीत क्षेत्रातील सच्चा साधक कसा असावा याचे प्रभाकर जोग आदर्श होते. यापुढे संगीत क्षेत्राला त्यांचे गाणारे व्हायोलिन आणि त्यांचे मार्गदर्शन यांची उणीव भासत राहील, असे सांगून मुख्यमंत्र्यांनी ज्येष्ठ संगीतकार प्रभाकर जोग यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली आहे.

_________________

गाणारे व्हायोलिन अबोल झाले 
ज्येष्ठ संगीतकार आणि प्रसिद्ध व्हायोलिन वादक पंडित प्रभाकर जोग यांच्या निधनाची वार्ता ऐकून मन सुन्न झाले. एका क्षणात त्यांनी वाजवलेली कितीतरी मराठी हिंदी गाणी मनात गुंजन करून गेली. बाबूजी उर्फ सुधीर फडकेंच्या बरोबर संगीत संयोजन करतांना काव्यातील र्हस्व, दीर्घ, आकारादी व्यंजने वादनात तसेच्या तसे उमटवणारे जोग काकांसारखे वादक अति दुर्मिळच …… त्यांचे वादनावरील प्रभुत्व त्यांना ओळखल्या जाणाऱ्या Song Violinist मधून सिद्ध होते.
मराठी हिंदी चित्रपट संगीतातील तसेच भावसंगीतातील त्यांचे योगदान रसिकांच्या हृदयात कायम स्थान करून आहे. 
कलाकाराचा स्वभाव त्याचे कलेत उतरत असतो असे म्हणतात, त्याप्रमाणे जोग काकांचे सुरेल गोड वादन त्यांच्या मृदू, गोड,  साध्या व सरळ व्यक्तिमत्वाची ओळख देतो. जवळ जवळ सहा दशके चित्रपट संगीत क्षेत्रात मोलाचे योगदान देणारे जोग काका संगीत रसिकांना त्यांच्या “गाणाऱ्या व्हायोलिन” मधून सदैव स्मरणात राहतील.
जोग काकांना मी व माझ्या स्वरालीन व्हायोलिन अकादमी तर्फे साश्रुपूर्ण नयनांनी श्रद्धांजली ……. ओम शांती 
अनिल दैठणकर 
ज्येष्ठ व्हायोलिन वादक 

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.