‘आई कुठे काय करते’ मालिकेत नव्या पात्राची होणार एण्ट्री
मुंबई – स्टार प्रवाहवरील आई कुठे काय करते मालिका सध्या अतिशय उत्कंठावर्धक वळणावर येऊन पोहोचली आहे. अविनाशला पैशांची मदत करण्यासाठी अरुंधतीने समृद्धी बंगला गहाण ठेवला. ही गोष्ट देशमुख कुटुंबाच्या लक्षात आल्यानंतर प्रत्येकाकडूनच उलट सुलट प्रतिक्रिया मिळाल्या. अनिरुद्ध आणि संजनाने तर समृद्धी बंगला विकण्यासाठीचाच प्रस्ताव मांडला. मात्र या कठीण प्रसंगातही खचून न जाता अरुंधतीने ठामपणे उभं रहायचं ठरवलं आहे.
घरात एकीकडे तणावाचं वातावरण असताना मालिकेत लवकरच एका नव्या पात्राची एण्ट्री होणार आहे. आशुतोष असं या नव्या पात्राचं नाव असून अभिनेता ओंकार गोवर्धन आशुतोष ही व्यक्तिरेखा साकारणार आहे. आशुतोष हा अरुंधतीचा कॉलेजमधला मित्र असून तो एक यशस्वी बिझनेसमन आहे. बऱ्याच वर्षांनंतर अरुंधती आणि आशुतोषची एका कार्यक्रमाच्या निमित्ताने भेट होणार आहे.
अभिनेता ओंकार गोवर्धन आशुतोष ही व्यक्तिरेखा साकारण्यासाठी खूपच उत्सुक असून आई कुठे काय करते आणि स्टार प्रवाह कुटुंबाचा भाग होण्याची संधी मिळाल्याचा आनंद त्याने व्यक्त केला. आई कुठे काय करते ही मालिका गेली दोन वर्ष प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवते आहे. या मालिकेतलं प्रत्येक पात्र लोकप्रिय झालं आहे. त्यामुळे आशुतोष ही व्यक्तिरेखा साकारणं माझ्यासाठी जबाबदारीचं आणि तितकंच आव्हानात्मक आहे. हे पात्रं मला अतिशय आवडलं आहे. दिवाळीच्या मुहूर्तावर माझी आई कुठे काय करते मालिकेत एण्ट्री होणार आहे. त्यामुळे यंदाची दिवाळी माझ्यासाठी खूप खास आहे असं ओंकारने सांगितलं.
आशुतोष या पात्राच्या एण्ट्रीने मालिकेतही नवं वळण येणार आहे. त्यासाठी पाहायला विसरु नका आई कुठे काय करते सोमवार ते शनिवार सायंकाळी ७.३० वाजता स्टार प्रवाहवर.