झी मराठीवर तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं हि मालिका नुकतीच प्रेक्षकांच्या भेटीस आली असली तरी प्रेक्षकांचा या मालिकेला भरगोस प्रतिसाद मिळतोय. सध्या एकत्र कुटुंब पद्धती लोप पावत आहे. विभक्त कुटुंब पद्धती फोफावत असताना पुन्हा एकत्र कुटुंबपद्धतीला नवसंजीवनी देणारी ही मालिका आहे. या मालिकेतील बयो आजी हि सगळ्यांना आपल्या घरातील एक वाटते. अशी आजी आपल्याला देखील असावी असं सगळ्यांना वाटतं. बायो आजीची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री सुरेखा लहामगे – शर्मा यांच्यासोबत साधलेला हा खास संवाद
१. बयो आजीची व्यक्तिरेखा खूपच गाजतेय, तुम्हाला प्रेक्षकांकडून कसा प्रतिसाद मिळतोय ?
– आजकाल कोणी मला फोन केला किंवा मला भेटलं तर ते मला बयो आजी म्हणूनच बोलावतात. माझं नाव सुरेखा आहे हे सगळे विसरून गेले आहेत. आता माझी बयो आजी हीच ओळख बनली आहे. मी या व्यक्तिरेखेच्या प्रेमात आहे आणि ती साकारायला मला खूप मजा येतेय.
२. मालिका प्रेक्षकांना आवडतेय, त्याबद्दल प्रेक्षकांच्या तुम्हाला मिळालेल्या प्रतिक्रिया कशा आहेत ?
– प्रेक्षकांना मालिका खूपच आवडतेय. मला बऱ्याच लोकांनी सांगितलं कि रात्री ९ वाजले कि आम्ही आधी टीव्हीसमोर जाऊन बसतो आणि संपूर्ण कुटुंबासोबत हि मालिका बघतो. विशेष म्हणजे या मालिकेत एकत्र कुटुंब पद्धती दाखवण्यात आली आहे हि गोष्ट प्रेक्षकांना सगळ्यात जास्त भावली आहे.
३. हि मालिका एकत्र कुटुंब पद्धती सुंदररित्या दाखवतेय त्याबद्दल काय सांगाल ?
– सध्या स्पर्धेच्या युगात विभक्त कुटुंबात रमणाऱ्या आणि एकत्र कुटुंबापासून लांब राहणाऱ्या अनेकांना कोरोना सारख्या महामारीनं हानी पोहोचवली. पण जाता जाता सगळ्यांची माणुसकीने वागणे किती गरजेचे आहे हे पटवून दिले आणि अशा वेळी लॉकडाऊन मधून अनलॉक होताना तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं हि एकत्र कुटुंबपद्धती, आपली नाती कशी जपावी, प्राणिमात्रांवर प्रेम करा असे अनेक संदेश देणारी मालिका प्रेक्षकांच्या भेटीस आली आणि ती प्रेक्षकांना आवडतेय याचा आनंद आहे. याचं सगळं श्रेय जात ते म्हणजे या मालिकेच्या संपूर्ण टीमला.
४. ऑफ कॅमेरा सेटवरचा काही किस्सा ?
– शूटिंग सुरु होऊन काहीच दिवस झाले आहेत पण अगदी थोड्याच दिवसात आम्हा सगळ्यांची गट्टी जमली आहे त्यामुळे आता कुठे धमाल मस्तीला सुरुवात झाली आहे, त्यामुळे इथून पुढे किस्से हळू हळू रंगतील.