मुंबई,दि,२७ ऑगस्ट २०२४ –राज्यासह देशभरात श्रीकृष्ण जन्माष्टमी देशभरात मोठ्या थाटामाटात साजरी केली जात आहे.आज दिवसभर थरांचा थरार रंगणार असून सर्वत्र दहीहंडी उत्सवावाचा जल्लोष सुरू आहे.जन्माष्टमीच्या रात्रीनंतर दहीहंडी उत्सवावाचे साऱ्यांनाच वेध लागलेले असते. आज लेझर लाईटचा झगमगटात आणि साऊंड सिस्टीमचा दणदणाट अशा उत्साही वातावरणात दहीहंडीचा उत्सव न्हाऊन निघत आहे. एका गोविंदा पथकामध्ये सरासरी २०० ते २५० गोविंदा असतात. या सर्वाना टी-शर्ट वाटप करण्यासह दिवसभर त्यांच्यासाठी खाण्यापिण्याची सोय, प्रवासासाठी वाहने, वैद्यकीय किट, याचा खर्च सुमारे ५ लाख रुपयांच्या घरात जातो.
मुंबईत विविध ठिकाणी दहीहंडी कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. ठाणे, विक्रोळी, जोगेश्वरी, दादर अशा विविध ठिकाणी गोविंदा पथकं दहीहंडीचे थर लावत सलामी देत आहेत. मुंबईत जय जवान गोविंदा पथक हे अतिशय लोकप्रिय गोविंदा पथक असून या पथकाने विक्रोळीतील कार्यक्रमात नऊ थरांची सलामी दिली आहे. यंदा जय जवान गोविंदा पथ दहा थरांची सलामी देणार असल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे या पथकाकडे अनेकांच्या नजरा आहेत.
मुंबई-ठाण्यासह राज्यभरात दहीहंडीचा उत्सव साजरा केला जात आहे. गोविंदा पथकांकडून रचल्या जाणाऱ्या थरांवर थरांना विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दहीहंडीच्या उत्साहाचा एक थर जोडला गेला असल्याने या उत्सवात कोट्यवधी रुपयांच्या बक्षिसांची उधळण होणार आणि त्यासाठी जिवाची बाजी लावणारे चित्तथरारक पराक्रम गोविंदा करून दाखवतील. आज ठाणे, मुंबई, पालघर आणि रायगड या मुंबई महानगरप्रदेशात खासगी, सार्वजनिक आणि लहान मंडळांच्या सुमारे दोन तीन हजारांच्या घरांत दहीहंड्या लागणार आहेत. दहीहंडी फोडण्यासाठी मुंबईतील ताडवाडी गोविंदा पथक व जोगेश्वरी जय जवान पथकासह मोठी गोविंदा पथके उंचच्या उंच थर लावून दहीहंडी फोडण्यासाठी सज्ज झाले आहेत.
राज्यातल्या सत्ताकारणाची झळ गेल्या वर्षापासून दहीहंडी उत्सवाला बसली असून, गोविंदा पथके आणि राजकीय आयोजकही विभागले गेले आहेत. उच्च न्यायालयाने या उत्सवावर घातलेल्या कडक निर्बंधांमुळे दहीहंडी उत्सवातून काही मोठे राजकीय आयोजक बाहेर पडले आहेत. मात्र शिवसेना शिंदे गट आणि भारतीय जनता पक्ष यांचा या उत्सवातील शिरकाव गेल्या २ वर्षात वाढला आणि बक्षिसांची लयलूट सुरू आहे.
मात्र बदलापूर येथील बालिका अत्याचार प्रकरणात डीजे ऑपरेटर यांनी सुद्धा साउंड सिस्टम आणि डीजे उत्सवासाठी देण्यास नकार देऊन संवेदनशीलतेचे दर्शन घडविले. बदलापूरवरून तापलेल्या राजकारणात मनसेने केवळ बदलापुरातच नाही तर डोंबिवलीतही यंदा दहीहंडी उत्सव साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे.
दहीहंडी आयोजनाचा खर्च सुमारे १० लाख रुपये ते २ कोटी रुपयेपर्यंत येतो. काही राजकीय पक्ष हा खर्च ५ ते ६ कोट पेक्षा जास्त असल्याचे सांगतात. त्यात बक्षिसांसह डीजे, स्टेज व रोषणाई, खानपान, सेलिब्रिटींचे मानधन, ऑर्केस्ट्रा व अन्य खर्चाचा समावेश आहे.
जय जवान गोविंदा पथकाची ९ थरांची सलामी
जय जवान गोविंदा पथकाने मागील अनेक वर्षांपासून आतापर्यंत अनेक बक्षिसं जिंकली आहेत. यंदाच्या दहीहंडी उत्सवात जय जवान पथकाने सर्वात आधी विक्रोळीतील आयोजित कार्यक्रमात ९ थरांची सलामी दिली. त्यानंतर ते १० थर लावणार असल्याचं बोललं जात आहे. हे गोविंदा पथक मुंबईतील विविध ठिकाणी जात एकावर एक मानवी थर रचून सलामी देतात. शेवटच्या थराला या गोविंदा पथकाने चार एक्के लावत सलामी दिली. जय जवान पथकासाठी यंदा ही दहीहंडी खास आहे, कारण या वर्षी त्यांनी पहिल्यांदाच शेवटच्या चार थरांना चार एक्के लावले आहेत. मागील दोन ते तीन महिन्यांपासून हे पथक दहीदंडीचा सराव करत होते. त्यानंतर दहीहंडीच्या दिवशी या पथकाने पहिलीच नऊ थरांची सलामी विक्रोळीतील टागोरनगरमध्ये आयोजित कार्यक्रमात दिली. दहीहंडीसाठी सर्वत्र उत्साहाचं वातावरण असून गाण्यांच्या तालावर ठेका धरत आनंद व्यक्त केला जात आहे. विक्रोळीतील या आरंभ दहीहंडी कार्यक्रमासाठी आशिष शेलार देखील उपस्थित होते. जय जवान पथकाने नऊ थर लावल्यानंतर या पथकाला बक्षिस देत आशिष शेलार यांनी पथकाचं कौतुक केलं. दादर येथील आयडियल गल्लीत महिला पथकाने दहीहंडीचे थर लावत सलामी दिली, तर ठाण्यात रणझुंजार गोविंदा पथकाने सलामी दिली. ठाण्यातही दहीहंडीचा उत्साह जोरात आहे. अनेक पथकांनी संकल्प प्रतिष्ठान दहीदंडीमध्ये थर लावत सलामी दिली.