नाशिक जिल्हा नागरी सहकारी बॅंक्स असोसिएशनच्या अध्यक्षपदी विश्वास ठाकूर यांची बिनविरोध निवड

0

नाशिक (प्रतिनिधी) –  नाशिक जिल्हा नागरी सहकारी बँक्स असोसिएशन, नाशिकच्या अध्यक्षपदी विश्वास को-ऑप.बँकेचे संस्थापक अध्यक्ष श्री. विश्वास जयदेव ठाकूर यांची बिनविरोध निवड करण्यात आलेली आहे. सदर बैठकीत कार्याध्यक्षपदी देवळा मर्चंट्स को-ऑप.बँकेचे संचालक श्री. राजेंद्र नामदेवराव सुर्यवंशी  यांची तर उपाध्यक्षपदी सरस्वती को-ऑप.बँक ओझरचे संचालक श्री.दत्तात्रय निवृत्ती गडाख यांची निवड करण्यात आली. ही नेमणूक श्रीमती मनिषा खैरनार अध्यासी अधिकारी तथा सहायक निबंधक (1) अधिन-जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था, नाशिक यांच्या अध्यक्षतेखाली झाली. बँक असोसिएशनच्या कार्यालयात ही निवड करण्यात आली.

विश्वास ठाकूर यांनी बँक्स असोसिएशनवर कार्याध्यक्ष म्हणून 2010, 2012 मध्ये तर अध्यक्ष म्हणून सन 2011-2012 मध्ये यशस्वीरित्या कार्य केले आहे. संचालक म्हणून सन 2012 ते आजपावेतो कार्यरत आहेत.

केंद्र शासनाने 2020 मध्ये बँकींग रेग्युलेशन कायदा 1949 मध्ये सुधारणा करून त्याअन्वये नागरी सहकारी बँकांवरील रिझर्व्ह बँकेचे नियंत्रण वाढवले आहे. बँकींग रेग्युलेशन कायद्यामधील सदर बदलांचा राज्यातील नागरी सहकारी बँकांच्या कामकाजावर तसेच एकूणच बँकींग क्षेत्रावर कशा पद्धतीने परिणाम होईल, याबाबतचा अभ्यास करून त्यादृष्टीने उपाययोजना सुचविण्यासाठी महाराष्ट्र शासन सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागातर्फे समिती गठीत करण्यात आली असून, त्या समितीवर ठाकूर यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे.

यापूर्वी विश्वास ठाकूर यांनी सहकार क्षेत्रातील विविध समित्यांवर यशस्वीपणे काम केले असून, सहकारातील आधुनिक बदलांसाठी, सुधारणांसाठी महत्वपूर्ण योगदान दिले आहे. सहकारातील विविध प्रश्नांची सोडवणूक करून विकास घडविण्यासाठी ते कार्यरत आहेत. भारतातील मोजक्याच सहकार नेतृत्वात त्यांचा नामोल्लेख केला जातो. त्यात माजी कार्याध्यक्ष, महाराष्ट्र राज्य सहकारी बँक्स् असोसिएशन लि., मुंबईचे माजी कार्याध्यक्ष व विद्यमान संचालक, नॅशनल फेडरेशन ऑफ अर्बन को-ऑप.बँक्स अ‍ॅन्ड क्रेडीट सोसायटीज् लि. (नॅफकब, दिल्ली). माजी विशेष निमंत्रित दि महाराष्ट्र अर्बन को-ऑप.बँक्स फेडरेशन लि., मुंबई. युनो (दि युनायटेड नेशन्स जनरल अ‍ॅसेंब्ली)ने 2012 हे ‘आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष’ म्हणून जाहीर केले. त्यानिमित्ताने केंद्र शासनाच्या कृषि व सहकार विभागाने एक उच्चस्तरीय समितीची स्थापना केली होती. या समितीत संपूर्ण देशातून एकमेव ‘अशासकीय सदस्य’ म्हणून नियुक्ती करण्यात आली होती.

सहकारी संस्थांच्या कामकाजात सुसूत्रता आणणे व गुणात्मक मूल्य वाढविण्याच्या दृष्टीने सहकारी धोरणांचा आढावा घेणार्‍या सुखठणकर समितीमध्ये ‘सदस्य’ म्हणून नियुक्ती. मा. सहकार आयुक्त व निबंधक, सहकारी संस्था, महाराष्ट्र राज्य, पुणे यांनी नागरी सहकारी बँकांच्या विविध कार्यपद्धतींचा अभ्यास करण्यासाठी स्टडी ग्रुप या समितीवर ‘सदस्य’ म्हणून काम पाहिले. मा. सहकार आयुक्त व निबंधक, सहकारी संस्था, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या विचारमंच सभेत ‘सदस्य’ म्हणून कार्य., यशवंतराव चव्हाण विकास प्रबोधिनी (यशदा), महाराष्ट्र शासन, पुणे येथे मा. महासंचालक यांनी सहकार विचार मंचच्या सभेवर त्यांची ‘सदस्य’ म्हणून नियुक्ती केली होती.

स्वयंसहाय्यता गटांचे स्वसंवर्धन व विकास करण्याच्या दृष्टीकोनातून राज्यातील सहकारी बँकांकडून अर्थसहाय्य व बँकिंग सुविधा प्राप्त करुन देण्यासाठी  मा. सहकार आयुक्त यांनी कोअर ग्रुपची स्थापना केली होती. या ग्रुपमध्ये विश्वास ठाकूर यांनी ‘सदस्य’ म्हणून कार्य. समाजातील दारिद्रय रेषेखालील व ग्रामीण भागातील जनतेचे आर्थिक पुनर्वसन करण्यासाठी ‘स्वयंरोजगार सहाय्यता गट’ ही योजना विश्वास ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली व नाशिक महानगरपालिकेच्या मदतीने तातडीने कार्यान्वित केली होती. याबाबत मा.महानगरपालिका आयुक्तांनी गौरव केला आहे.

शनिवार दि. 22 व रविवार दि. 23 जानेवारी 2011 रोजी नाशिकमध्ये महाराष्ट्र राज्य नागरी सहकारी बँक परिषद संपन्न झाली. मा. विश्वास ठाकूर हे परिषदेचे निमंत्रक होते. यात महाराष्ट्रातून सुमारे 2500 हून अधिक नागरी सहकारी बँकांचे चेअरमन, संचालक यांनी उस्फुर्त सहभाग नोंदवला.

विश्वास ठाकूर यांच्या कार्यकुशल नेतृत्वाची पावती म्हणजे गेल्या 24 वर्षात त्यांना अनेक नामांकित पुरस्कारांनी गौरविण्यात आलेले आहे. त्यात विश्वास बँकेला 13 राष्ट्रीय, 21 राज्यस्तरीय, 9 जिल्हास्तरीय असे एकूण 43 पुरस्कार व विश्वास ठाकूर यांना 3 राष्ट्रीय, 18 राज्यस्तरीय,24 जिल्हास्तरीय असे एकूण 45 पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलेले आहे.

विश्वास ठाकूर यांच्या या नियुक्तीबद्दल सामाजिक, सांस्कृतिक, सहकार, शिक्षण, क्रिडा अशा विविध क्षेत्रातील मान्यवरांनी अभिनंदन केले आहे.

याप्रसंगी नाशिक जिल्हा नागरी सहकारी बँक्स असोसिएशनचे संचालक अजय ब्रह्मेचा, नानासाहेब सोनवणे, संजय वडनेरे, अशोक व्यवहारे, अशोक झंवर, यशवंत अमृतकर, भरत पोफळे, डॉ.शशीताई अहिरे, वसंतराव खैरनार, मिर्झा सलीम बेग, रविंद्र गोठी, अलीमुद्दीन वाहिद, व्यवस्थापक रामलाल सानप आदी उपस्थित होते.

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.