ज्येष्ठ साहित्यिक चंद्रकांत महामिने यांचे निधन
नाशिक – आपल्या विनोदी लेखनाने खळखळून हसवणारे ज्येष्ठ साहित्यिक चंद्रकांत महामिने यांचे आज सकाळी ११ :३० वाजता निधन झालं ते ८७ वर्षांचे होते. काही दिवसापासून ते आजारी होते.नुकतेच त्यांच्या पत्नीचेही निधन झाले होते. आज सायंकाळी त्याच्यावर नाशिक मध्ये अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.त्यांच्या पश्चात २ मुले २ मुली सुना नातवंडे जावई असा परिवार आहे.
त्यांचा जन्म लोणी प्रवरा या गावी झाला. भारत संचार निगम मधून ते सेवा निवृत्त झाले.तरुणपणा पासूनच त्यांना साहित्याची गोडी होती. त्यांच्या लिखाणात विनोदावर भर होता. महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमधून प्रसिद्ध होणाऱ्या जवळपास १०० च्यावर दिवाळी अंकात त्यांच्या कथा प्रसिद्ध झाल्या आहेत. आतापर्यंत त्यांची अनेक पुस्तके प्रसिद्ध झली आहेत. नाशिक च्या पीएनटी कॉलनीतील ज्येष्ठ नागरीक संघाचे ते पदाधिकारी होते. तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक संघटनेचे ते अध्यक्ष होते. नाशिकच्या सार्वजनिक वाचनालयासह अनेक सामाजिक आणि सांस्कृतिक संस्थेचे ते आधारस्तंभ होते. त्यांच्या निधनाने नाशिकच्या साहित्यक्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झालीय आहे.
सायंकाळी ५ वाजता त्याची अंतयात्रा सार्वजनिक वाचनालयाच्या आवारात येणार आहे. त्यावेळी वाचनालयाच्या वतीने त्यांना पुष्पचक्र अर्पण करण्यात येणार असून त्यांना आदरांजली वाहण्यासाठी रसिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन सार्वजनिक वाचनालया तर्फे करण्यात आले आहे.
___________श्रद्धांजली___________
फक्त विनोदीच नाही तर साहित्य वर्तुळातील सर्व क्षेत्रात आपला ठसा उमटविणारे ज्येष्ठ साहित्यिक चंद्रकांत दादा महामिने आज आपल्यात नाही हे पचवणे कठीण आहे.विनोदी साहित्य, ललितलेखन, नाट्यलेखन, बालकांसाठी कथासंग्रह, व्यंगकाव्ये असे विपुल लेखन केलेले दादा शंभरहून अधिक पुस्तके प्रकाशित होऊनही त्यांच्या लेखनातील प्रयोगशीलता वाखण्याजोगी होती.दुःखाचे, अडचणीचे प्रतिकूल क्षण टिपतानाही त्यांच्या लिखाणातील मिश्कीलपणा त्यांच्या प्रसन्न, समाधानी आणि चैतन्यमयी स्वभावाचे दर्शन घडवितो. सहजता हा त्यांच्या लेखनाचा स्थायीभाव होता.एका अतिशय प्रतिकूल परिस्थितीत जन्मलेले दादा मराठी साहित्यातील नामवंत लेखकांच्या मांदियाळीत त्यांनी आपले वेगळे स्थान निर्माण केले ह्या वरूनच त्यांची प्रतिभा लक्षात येते.सावाना च्या जिल्हा साहित्यिक मेळाव्याला दरवर्षी त्यांची उपस्थिती हुरूप वाढवणारी ठरायची. साहित्यिक मेळाव्याचे अध्यक्षपदही त्यांनी भूषविले. सावाना ने त्यांना पहिला जीवन गौरव पुरस्कार देऊन त्यांचा यथोचित गौरव केला होता.दादांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन.~जयप्रकाश जातेगांवकर
__________________
चंद्रकांत महामिने यांची पुस्तके
आपल्याच बापाचा माल (विनोदी कथांचा संग्रह)
एक दिवसाचा मुख्यमंत्री (कथासंग्रह)
कोंडवाडा (कादंबरी)
गंगाराम गांगरेच्या गमती (बालसाहित्य, विनोदी)
गंगू आली रे अंगणी (कथासंग्रह)
खानावळ ते लिहिणावळ (आत्मचरित्र)
तिसरी पिढी (कादंवरी)
प्रवराकाठची माणसं (कथासंग्रह)
मदनबाधा मराठीने केला बिहारी भ्रतार (कथासंग्रह)
साहित्य पालखीचे बेरके भोई (विनोदी लेख)
सिडको ते सिडनी (विनोदी)
हातचं सोडून पळत्यापाठी
Bhavpurna shradhanjali 🙏❤️🙏